रोग-भोग-योग
सांप्रतच्या काळात ‘रोग-भोग-योग’ या त्रिकूटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर उक्तीचा अर्थ सर्वांना आता उमगून चुकला असेल, असे भोवतालच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर वाटते. भोगांनी माणसाचा पिच्छा कधीच सोडला नाही. सदा सर्वकाळ – सर्व युगांतून भोगांनी सातत्याने माणसाभोवतीचा आपला पाश आवळला आहे. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली तशी रोगांची बाधा आणि भोगबाधासुद्धा वाढलेली पाहायला मिळते. आजच्या दीर्घायु मानवाला रोग-भोग विमुक्ती अधिकच महत्त्वाची वाटत आहे. रोगाने ग्रासल्यावर गंडेदोरे, देवर्षी, जडीबुटी, आजीबाईंचा बटवा या प्राचीन-पुरातन उपचारांपासून नवीन आधुनिक वैद्यक उपचारापर्यंत सर्व उपाय अवलंबले जातात. तर भोगाने त्रस्त झाल्यावर जे उपाय केले जातात ते म्हणजे मंत्र-तंत्र-उपासना-अध्यात्म-बाबा-बुवा-स्वामी-महाराज इ. इ. पण या सर्वांवर हमखास इलाज आहे, तो म्हणजे ‘योग!’ आज योग हा भोगासाठी नाही, तर रोग-भोग यांचा प्रतिपक्षी म्हणून आला आहे. आपण या संज्ञा प्रसिद्धार्थाने समजून घेतो, पण त्याआधी या परिभाषा नीट समजून घ्यायला हव्यात.
‘रोग’ याचा अर्थ आपल्याला व्याधिग्रस्तता असा वाटतो. याबद्दल थोडा शास्त्रीय विचार आधी पाहू या. सुश्रुतात रोगग्रस्त होण्याची तीन कारणे सांगितली आहेत. ‘अतियोग’ (Overuse), ‘अयोग’ (nonuse), ‘मिथ्यायोग’ (abuse). आजचे जीवन म्हणजे overuse – nonuse-abuse यांचे थैमान असलेले पाहायला मिळते. हे रोगांना दिलेले आमंत्रणच नाही का? सुश्रुतांनी चतुर्विध व्याधी सांगितल्या आहेत. पहिला प्रकार आगंतुक म्हणजे अपघाती. दुसरा शारीरिक. हा प्रकार हीन-निकृष्ट-बाधित आहाराने संभवतो. अतिसेवनाचा प्रकारसुद्धा येथे परिगणित होतो. तिसरा प्रकार मानस म्हणजे लोभ, क्रोध, मोह, शोक, मात्सर्य आदी कारणांमुळे जो बिघाड होतो, तो होय. चौथा स्वाभाविक प्रकार म्हणजे क्षुधा, तृष्णा, वार्धक्य आदी प्रकाराने होणारा. योगशास्त्रात व्याधीचा अर्थ स्पष्ट करताना धातू (वात-पित्त-कफ), रस (अन्नरस, शारीरगत रस) आणि करण (शारीरमानस इंद्रिये) यातील समतोल ढळून वैषम्य येणे असा आहे. पुन्हा सुश्रुताकडे वळलो तर रोगाचे एक मार्मिक वर्गीकरण हाती लागते, ते असे : १) आदिबल प्रवृत्त : हा प्रकार आनुवंशिक असा असतो. २) जन्मबल प्रवृत्त : हा प्रकार जन्मजात असतो. ३) दोषबल प्रवृत्त : हा प्रकार त्रिदोषोत्पन्न असतो. ४) संघातबल प्रवृत्त : हा अपघाती प्रकार असतो. ५) कालबल प्रवृत्त : हा प्रकार जीवनाच्या अवस्थांनुसार म्हणजे बाल्य ते वार्धक्य या अवस्थांमुळे संभवणारा आहे. ६) दैवबल प्रवृत्त म्हणजे दैववशात व प्रारब्ध कारणे. ७) स्वभावबल प्रवृत्त म्हणजे भूक, तहान
वा नैसर्गिक ऊर्मींमुळे उद्भवणारे दोष.
आता आपण ‘भोग’ या संकल्पनेचा शास्त्रोक्त परिचय करून घेऊ या. भोग याचा सरसकट अर्थ दुःख असा ढोबळमानाने केला जातो, पण हे खरे नाही. भोगांकडे दोषदृष्टीने पाहणे योग्य नव्हे. धर्म-कर्म शास्त्रानुषंगाने हा विचार करायला हवा. आपल्या सर्वांचे जीवन भोगाने व्याप्त असते. भोगशून्य जीवन हे अपवादानेही पाहायला मिळत नाही. भोग हे त्रिविध असतात. ते म्हणजे ‘सुख-दुःख-मोह’ अशा स्वरूपाचे. अनुकूलवेदनीय सुखभोग, तर प्रतिकूलवेदनीय दुःखभोग तर दुःखात सुखाभास हा मोह असतो. म्हणजे सुखभोग, दुःखभोग आणि मोहभोग असे त्रिविध भोग असतात. आपल्या कर्मात जो धर्म असतो त्याने सुखभोग मिळतात, तर अधर्म कारणांमुळे दुःखभोग वाट्यास येतात. पूर्वकर्मातील धर्माने सुखभोग लाभतात, तर अधर्माने दुःखभोग वाट्यास येतात. सांप्रतकालीन कर्मातील धर्मकृत्ये पुढील काळात सुख देतील, तर तद्विरुद्ध कर्मे दुःख देतील. पातंजल शास्त्रात हा विचार सखोल आहे. धर्माधर्म -> पापपुण्य -> सुखदुःख -> धर्माधर्म -> पापपुण्य -> सुखदुःख असे कर्मचक्र अविरतपणे चालू असते. म्हणजे धर्माधर्मामुळे आपण पापपुण्ये करतो. पुढे पापपुण्य कारणांनी सुखदुःख मिळतात. पुन्हा सुखदुःख कारणे आपण धर्माधर्मरूप कर्मे करीत असतो. हे चक्र अनादी काळापासून चालू आहे. धर्म काय आणि अधर्म काय; विवेक असल्याशिवाय आपण कोणतेही सत्कृत्य-दुष्कृत्य करू शकत नाही आणि तोपर्यंत आपण या भोगाच्या चक्रापासून मुक्त होत नाही. या कर्मचक्रापासून वाचणे, हाच ‘मोक्ष’ असतो.
आता आपण ‘योग’ या संकल्पनेकडे वळू या. योगाचे सर्वांगीण शास्त्र म्हणजे गीताशास्त्र. म्हणून गीतेला ‘योगशास्त्र’ असे म्हटले आहे. गीताशास्त्र ही ब्रह्मविद्यासुद्धा आहे. गीतेतील योगव्याख्या लक्षणीय आहे. ती अशी –
‘तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्।’
याचा अर्थ असा की दुःखसंयोगाचा वियोग घडवितो तो योग होय!
रोगांचा विचार लक्षात घेतला, तर आज रोगोपचारांमध्ये योगाचाही अंतर्भाव होताना दिसतो. आज योगोपचारच योग ठरला आहे. त्यापलीकडे योग दिसत नाही किंवा योग हा ‘अनारोग्य प्रतिबंधक’ म्हणून प्रसिद्ध पावला आहे. खरा योग तर याच्या खूपच पलीकडे आहे.
अध्यात्मात भोग हा प्रकार भवरोग म्हणून पाहिला जातो. परमार्थाकडे झुकलेले साधक भोगनिवारक अस्खलित अभिजात योगाकडे वळतात. भोग सुसह्य होणे, भोगातून त्रस्तता-ग्रस्तता-परिताप न होणे यासाठी योग असतो. भोगव्यवस्थापन करणे, हा योग्यांचा हातखंडा असतो. अध्यात्माच्या स्वरूपात जरी चिमूटभर योग उरात बाळगला, तरी रोग आणि भोग या दोहोंना आपण अनुद्विग्नपणे ओलांडू शकतो.
आता शेवटी ‘भोग’ संदर्भात विचार लक्षात घेऊ या. अध्यात्म शास्त्रात हा विचार आला आहे, की भोग हे प्रारब्ध ठरते. कर्मफले विपाकाला प्राप्त झाले, तर त्यांना ‘प्रारब्ध’ म्हटले जाते. अध्यात्मात प्रारब्धाचे वर्गीकरण केले आहे. एका वर्गीकरणानुसार भोग हे दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार ‘आरब्ध’ म्हटला जातो. हे भोग आपण वर्तमानकाळात भोगत असतो. दुसरा प्रकार ‘अनारब्ध’ म्हणून ओळखला जातो. याचा अनुभव अनागत काळात म्हणजे उद्याच्या पुढे, पण मृत्यूपूर्वी होणार असतो – जो अटळ असतो. दुसऱ्या वर्गीकरणानुसार पहिला प्रकार ‘इच्छा प्रारब्ध’ म्हटला जातो. हे भोग आपल्याला अभिमत असतात आणि आपल्या इच्छेनुसार-अपेक्षेनुसार असतात, जशी सुखे वा सुखभोग. दुसरा प्रकार म्हणजे ‘अनिच्छा प्रारब्ध’. हे आपल्या इच्छेविरुद्ध किंवा अनिच्छेला धरून किंवा प्रतिकूल असतात, जशी की दुःखे. तिसऱ्या प्रकाराला ‘परेच्छा प्रारब्ध’ म्हटले जाते. हे भोग महामानवाच्या वाट्याला भगवदेच्छेने येतात. हे भोग भगवंताला अभिमत असतात म्हणूनच भागवतालाही अभिमत असतात. येथे अनुकूलता आणि प्रतिकूलता यांना स्थान नसते. अशा प्रकारे हा ‘योग-रोग-भोग’ यांचा शास्त्रोक्त विचार लक्षात घेता येतो.
शेवटी असे म्हणावेसे वाटते, की रोग म्हणजे केवळ शारीरमानस व्याधीच नव्हे तर भवरोगसुद्धा गणला गेला पाहिजे. यामुळे भोगांचाही विचार अंतर्भूत होतो आणि त्या सर्वांना उपायभूत योग म्हणून गणले जाते. आज योगाचा बोलबाला असल्याने या तिन्हींचा मेळ लागत नाही.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
(लेखक पुणे येथील रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत.)
-प्रशांत अय्यंगार