विश्रांती : चैन नव्हे, गरज! | परिणीता गणेश | Rest: Not Peace, But need! | Parinita Ganesh

Published by परिणीता गणेश on   May 21, 2021 in   2021Health Mantra

विश्रांती : चैन नव्हे, गरज!

विश्रांती घेण्याचा संबंध हा बहुधा आजारातून बरे होण्याशी असतो आणि त्यामुळेच आपल्याकडे ‘विश्रांती’ या घटकाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तुम्ही आजारी नसाल तर विश्रांती घेण्याची काय गरज आहे, असा सवाल सरसकट आपल्या सर्वांच्या मनात उभा राहतो. अनेकांच्या दैनंदिन कामांच्या यादीत शेकडो गोष्टी असतात, पण विश्रांतीला अजिबात स्थान नसते. एकतर कामाच्या व्यापातून विश्रांती घेणे म्हणजे अमूल्य वेळेचा अपव्यय अशी अनेकांची धारणा असते किंवा ते घेणे म्हणजे जणू एखादा गुन्हाच समजला जातो. परंतु हा दृष्टिकोन बदलून अन्न व झोपेइतकाच विश्रांती हासुद्धा शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे, हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. मानसोपचारतज्ज्ञ क्लॉडिया हॅमंड हिने लिहिलेले ‘आर्ट ऑफ रेस्ट’ हे पुस्तक वाचल्यानंतर तर विश्रांतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही. हॅमंड हिने या पुस्तकात जगभरातील लोकांसाठी विश्रांतीशी संबंधित विविध कृती आणि महत्त्व याविषयी माहिती दिली आहे.

पण विश्रांती म्हणजे नक्की काय? झोप आणि विश्रांती यात नक्की काय फरक आहे? हॅमंड हिच्या म्हणण्यानुसार, विश्रांती म्हणजे अशी कोणतीही कृती जी जागेपणी केली जाते आणि ती केल्याने त्या व्यक्तीला आराम मिळतो अथवा मन शांत होते. त्यामुळे विश्रांती म्हणजे ‘काहीच न करणे’ किंवा धावायला/चालायला जाणे इ. इ. एक रोचक बाब म्हणजे विश्रांतीचे पर्यवसान झोपेत होऊ शकते! ते घेतल्याने कार्यक्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, ऊर्जा, शारीरिक आरोग्य, हित इत्यादी साधले जाते. रोजच्या कामाच्या दगदगीत दोन मिनिटे डोळे बंद ठेवून खुर्चीत आरामात बसल्यानेही ते मिळू शकते.

पण अशा प्रकारे थोडीशी विश्रांती किती जण घेतात? आरामात बसून एखादा कप चहा घेतला किंवा आपले आवडते गाणे ऐकत बसलोय, असे किती वेळा तुम्ही करता? सध्या आपल्या आयुष्याला वेगवेगळ्या उपकरणांनी ग्रासलेले आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात आपण विश्रांतीचे अनेक क्षण वाया घालवत असतो. मोबाइलवर सतत येणारी नोटिफिकेशन्स, मित्रमैत्रिणींकडून विविध मेसेजिंग अॅप्सवर येणारे संदेश, कामाशी संबंधित ईमेल्स यामुळे आपले मन सतत इकडे-तिकडे धावत असते. कामाचे तास संपल्यावर आणि सुटीच्या दिवशीही लोकांच्या संपर्कात असणे, ‘कंटेन्ट’ पाहत राहणे किंवा काम करत राहणे नित्याचे झाले आहे. खरे तर या दिवशी तुम्ही ते घेणे अपेक्षित असते.

‘कोव्हिड-१९’च्या साथीमुळे २०२० साली आपण देशातील लॉकडाऊन पाहिला. लॉकडाऊनमुळे काही जणांनी विश्रांती घेतली असेल, तर काहींसाठी हा अत्यंत मानसिक ताणाचा कालावधी असेल. ज्या व्यक्ती आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासात रोजचे दोन-तीन तास घालवत असत त्यांना लॉकडाऊनमुळे दिलासा मिळाला असेल, पण दुसरीकडे काही व्यक्ती चार-चार जणांचे काम एकाच वेळी करत होत्या. ‘वर्क फ्रॉम होम’ परिस्थितीमुळे कामाचे असे निश्चित तास राहिलेले नाहीत. परिणामी, विश्रांतीचा वेळही हातातून निसटला आहे. जागेची टंचाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक जण शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे थकले आहेत. केवळ वैयक्तिक समस्याच नव्हे, तर रोजच्या रोज वाढणारे कोरोनाचे रुग्ण, मृत्यू, स्थलांतरित मजुरांच्या समस्या यामुळे मानसिक ताण वाढला. या कालावधीत विश्रांतीचे क्षण मिळणे अधिकच दुरापास्त झाले आहे.

ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे, कारण कार्यक्षमता हा व्यक्तिमत्त्वाचा मापदंड आहे. व्यग्रता हे व्यक्तीच्या यशाचे थेट प्रमाण मानले जाते. तसे असते तर घर सांभाळणारी गृहिणी किंवा शेतकरी हे सर्वात यशस्वी झाले असते. एकीकडे व्यग्र असणे ही सन्मानाची बाब मानली जात असली तरी दुसरीकडे विश्रांती घेणे म्हणजे एखादा अपराध किंवा असमाधानकारक मानले गेले आहे, असे हॅमंड म्हणते. अशा वेळी आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, आपली ‘टू-डू लिस्ट’ कधीच पूर्ण न होणारी आहे. एक काम पूर्ण केले, की लगेचच दुसरे काम डोळ्यांसमोर येते. तुमच्या यादीतील सगळी कामे संपेपर्यंत वाट पाहिली, तर तुम्हाला कधीच विश्रांती मिळणार नाही. सगळी कामे पूर्ण झाल्यावर विश्रांती घेण्याऐवजी कामाच्या मध्ये थोडी विश्रांती घेतली, तर कामात अधिक एकाग्र होऊ शकतो किंवा अधिक जोमाने राहिलेले काम पूर्ण करू शकतो. यावरून एक लक्षात येते की, आपल्या रोजच्या शर्यतीमधून थोडा वेळ विश्रांती घेणे गरजेचे आहे. मग ती विश्रांती काही मिनिटांची असो, एका दिवसाची असो, वेग कमी करण्याची असो किंवा थोडासा आराम करण्याची असो.

विश्रांती घेण्याचे १० सर्वात लोकप्रिय मार्ग / पर्याय पुढीलप्रमाणे : आपण काय करत आहोत त्याचा विचार करणे, टीव्ही पाहणे, दिवास्वप्ने पाहणे, अंघोळ करणे, फेरफटका मारणे, काहीच न करणे, संगीत ऐकणे, स्वतःमध्ये मग्न होणे, बागेत फेरफटका मारणे आणि पहिल्या क्रमांकाची पसंती लाभलेला मार्ग म्हणजे वाचन.

आपल्या आयुष्यात विश्रांती हा घटक कसा समाविष्ट करता येईल? स्वतःला विश्रांती घेण्याची परवानगी देणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. सिंकमध्ये पडलेली भांडी घासली जातील, ऑफिसमध्ये नव्याने आलेला प्रोजेक्ट पूर्ण होईल, मोबाइलवर आलेल्या मेसेजेसना नंतर प्रतिसाद देता येईल, पण विश्रांतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यग्र राहणे हा आपण बराच काळ आदर्श ठेवला होता, पण आता विश्रांती घेणे आपल्या फायद्याचे आहे, हे स्वतःला समजावून देण्याची वेळ आली आहे. स्वतःला पटवून दिल्यावर रोजच्या व्यग्र वेळापत्रकातून विश्रांतीचे क्षण शोधणे आणि त्या क्षणांचा आनंद घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

विश्रांती घेण्याचा केवळ एकच मार्ग नसतो. काही जणांना एकटे राहायला आवडत असेल, तर काही जणांना लोकांमध्ये मिसळणे. तर आणखी इतर कुणाला काय? त्यामुळे आपल्या विश्रांतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. हॅमंड म्हणते, दररोज विश्रांतीसाठी १५ मिनिटे दिली तर निश्चित तुमचे हित साधले जाईल. तिला बागकाम करणे सर्वात अधिक आवडते. त्यामुळे ती त्यात वेळ घालवते. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट करा.

फोमो (FOMO) – ‘फीअर ऑफ मिसिंग आउट’ ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आपण विद्युतवेगाने सतत ‘एंगेज’ (व्यग्र) राहतो, प्रतिसाद देतो, काहीतरी ‘कन्झ्युम’ करत (उपभोग घेत) असतो आणि त्यामुळे सतत कशाची तरी निर्मिती करत राहणे आपल्याला आवश्यक वाटते. सतत ‘उपलब्ध असणे’ किंवा ‘ऑन कॉल’ असल्याच्या भावनेमुळे अधिक थकवा येतो. ईमेल, कमेंट किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही तर समोरच्याला काय वाटेल, हा विचार सतत मनात असतो. थोडा वेळ ते सगळे बाजूला ठेवा, त्यामुळे चिंतातुरता कमी होईल. कदाचित त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुम्ही अधिक विश्रांती घेण्यासाठी प्रयत्न कराल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


परिणीता गणेश
(लेखिका प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ आहेत.)