अंघोळीची गोळी – आठवड्यातून एकदा!

Published by Kalnirnay on   June 4, 2018 in   Celebrating Maharashtra

पाण्याची जागतिक समस्या, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी पाणीटंचाई, सातत्याने पडणारा दुष्काळ, पाण्यासाठी होणारी वणवण अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना युवक म्हणुन आपण काय करू शकतो असा प्रश्न पुण्यातील माधव पाटील या युवकाच्या मनी आला आणि त्यातूनचअंघोळीची गोळी’ ही संकल्पना उदयास आली. कालांतराने  याचे रुपांतर एका तरुणांच्या टीममध्ये झाले.

अंघोळीची गोळी म्हणजे नेमके काय?


सरळ सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास पाणी बचतीसाठी आपल्या सोयीने आठवड्यात किमान एक दिवस अंघोळ करायची नाही म्हणजेच अंघोळीची गोळी घ्यायची आणि पाण्याची बचत करायची! आठवड्यातून एक दिवस अंघोळीला दांडी मारली, तरी वैद्यकीयदृष्ट्या फरक पडत नाही़ हात, पाय, तोंड स्वच्छ धुतले, तरी चालू शकते़.  जरी आपल्यातील प्रत्येकाने हा प्रयत्न करुन पाहिला तर कित्येक कोटींच्या घरात पाण्याची बचत करता येईल.

आपला हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी ‘अंघोळीची गोळी’ गृपतर्फे पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि ठिकठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारे तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील फोटोंचे प्रदर्शन भरविण्यात आले. दिवाळीनिमित्त पाणीदार किल्ले स्पर्धा त्याचबरोबर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पावधीतच ही मोहीम अनेकांपर्यंत पोहोचवण्यात आली. विविध व्यासपीठ आणि शिबिरांच्या माध्यमातून पाणी बचतीची ही संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजही हे युवक सातत्याने करीत आहेत.

पुण्यामध्ये सुरु झालेली ही चळवळ आता महाराष्ट्रभर पसरु लागली आहे व नागरिकांचा या संकल्पनेला उदंड प्रतिसाद लाभतोय. परंतु पुणे मुंबईबरोबरच प्रत्येक शहरांत खेड्यापाड्यात युवकांनी पुढाकार घ्यावा आणि ही पाणी बचतीची गोळी घेवून युवकांनी समाजासाठी योगदान द्यावे, असेअंघोळीची गोळी’ टीम सर्वांना आवाहन करीत आहे .

खिळेमुक्त झाडे


वाढत्या शहरीकरणामुळे व्यवसायांचे प्रमाण वाढले आणि मग जाहिरातीसाठी सर्रास झाडांचा वापर होऊ लागला. रस्त्याकडेला असलेल्या झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावण्यात आल्या. या झाडांना मोकळा श्वास घेण्यासाठीअंघोळीची गोळीगेली तीन महिन्यांपासून खिळेमुक्त झाडे हा नवा उपक्रम महाराष्ट्रभर राबवत आहे. वृक्ष ही मौल्यवान संपत्ती आहे,पुढच्या पिढीसाठी ती राखून ठेवली पाहिजे. कॉन्क्रीटच्या वाढत्या जंगलात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात अशाप्रकारे खिळे मारल्यामुळे त्यांना इजा पोहचून आयुष्य कमी होते.

आतापर्यंत  १५० हून अधिक झाडे खिळेमुक्त झाली असून या मोहिमेदरम्यान टीमला खिळे, लोखंडी गज , स्क्रु ड्राइव्हर आणि लोखंडी पाण्याचे पाइप अशा विविध वस्तू झाडांत आढळून आल्या आहेत. या वस्तू काढल्यानंतर झाडांना पडलेले खड्डे  बुजविण्यासाठी मेणबत्ती वॅक्सचा वापर करण्यात येत आहे. यामुळे झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तसेच किड लागणार नाही. आता प्रशासनाच्या मदतीने या झाडांच्या भोवती संरक्षक जाळीदेखील लावण्यात येणार असल्याचे समजते.  .

आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्गाचा प्रत्येक अनमोल घटक जपण्याची शपथ घेऊया,

‘अंघोळीची गोळी’ सारख्या तरुणांच्या पर्यावरणस्नेही कार्यात सहभागी होऊया!