महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’

Published by राहुल वेलापुरे, गोपाळ मदने, स्वप्नील पाटील on   April 30, 2017 in   Celebrating Maharashtra

असं म्हणतात फेसबुकच्या मानाने ट्विटर वापरणं तसं अवघडच. फेसबुक दिलखुलासपणे शब्दभांडार वापरण्याचं सामर्थ्य देणारं माध्यम तर ट्विटर कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त करायला लावणारं माध्यम. ट्विटर तसं कमी शब्दात जास्त व्यक्त होणाऱ्यांसाठी, जलदगतीने माहिती मिळविण्यासाठी हे माध्यम अल्पावधीच लाडकं बनून जातं. तुम्ही देखील आहात ना ट्विटरवर? नसाल तर नक्की या इथे तुमच्या मदतीसाठी अनेक ‘मराठी ट्विटर’ हॅंडल्स तयार आहेत.

१) मराठी रिट्विट (@MarathiRT)

‘मराठी रिट्विट’ (@MarathiRT) हे ट्विटरकरांना व्यक्त होण्यासाठी “आपल्या” हक्काचं व्यासपीठ बनलं आहे .लोकं हक्काने आपले विचार, लेख, ब्लॉग, छायाचित्र, कला, व्हिडीओ, गाणी @MarathiRT मेन्शन करून इतरांपर्यंत पोहोचवू लागली आहेत.

मराठी ट्विट्सचा टक्का वाढावा या हेतूने नेटिझन्सना मराठीतुन ट्विट्स करण्यास प्रोत्साहन देणारा एखादा उपक्रम असावा या संकल्पनेतून “मराठी रिट्विट”ची सुरुवात झाली. यात उद्देश साधा आणि सरळ तुम्ही आपल्या भाषेत म्हणजेच मराठीत व्यक्त व्हा आम्ही तुमचे ट्विट इतरांपर्यंत पोहोचवू, ही आगळी वेगळी संकल्पना मराठी मंडळींच्या मनात हळू हळू रुजू लागली, “ज्याला मराठीमध्ये कोणी नाही त्याच्यासाठी आम्ही आहोत” या उद्देशाने कार्य सुरू झाले. “मराठी रिट्विट”ला ट्विटर वर फॉलो केल्याने इथे असलेल्या इतर मराठी ट्विटरकरांना ओळखण्याची, विचारांचे आदान प्रदान करण्याची संधी तुम्हाला मिळते. ट्विटरवरील अनेक क्षेत्रातील व्यक्तीसोबत, दिगगजांसोबत सहजासहजी संपर्कात साधता येतो.

‘मराठी रिट्विटने’  सुरु केलेल्या उपक्रमामध्ये #दिनविशेष हा उल्लेखनीय उपक्रम! आपल्या मायमराठीतल्या कर्तृत्ववान व्यक्तींचं कर्तृत्व पहाल तर वर्षातल्या ३६५ दिवसातला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी विशेष दिवसच आहे. हेच साधून मराठीतील अनेक कर्तृत्ववान इतिहासकार, साहित्यिक, कवी, गायक, संगीतकार, नेता, कार्यकर्ता  अशा अनेक व्यक्तींचा जन्मदिवस, वाढदिवस किंवा स्मृतिदिन याबद्दल दररोज सकाळी माहितीपर ट्विट करून माहिती दिली जाते.

इतर लोकप्रिय हॅशटॅग : #महाराज्य, #मराठीदिन, #महाराष्ट्रदिन

२) मराठी विश्वपैलू (@MarathiBrain)

सर्वच क्षेत्रातील चालू घडामोडी मराठी लोकांना मराठीतून माहिती व्हाव्यात यासाठी #मराठीGK hashtag सुरू आहे.यात @MarathiBrain दर्जेदार माहिती व सामान्य ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत असतात.यासह चांगली माहिती देणार्‍या लोकांच्या ट्वीट्स RT स्वरुपात प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांत पोहोचवणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे.

सोशल मीडियावर मराठी लोकांच्या न्याय हक्कांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व जगाच्या पातळीवर मराठी भाषिक लोकं एकत्र दिसावीत हा दृष्टीकोन समोर ठेवून Twitterवर ‘मराठी विश्वपैलू’ अर्थात @MarathiBrain ने #मराठीमाणूसजोडाअभियान सुरू केले. मराठी विश्वपैलूचे तसे अनेक उपक्रम आहेत त्यातीलच आणखी एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे विचारधनच्या सोबतीने सुरू केलेला ‘ट्विटरकट्टा’ ,सर्वसामान्य व्यक्तिपासून ते विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना live chat साठी आमंत्रित करून त्यांचा तमाम महाराष्ट्रातील लोकांशी थेट संवाद घडवून दिला जातो.यासाठी @tweetkatta हे नवीन हॅंडल सुरू केले आहे. लवकरच @marathibrainचे संकेतस्थळ सुरू होत असून यातून अनेक नवीन कल्पना प्रत्यक्ष समोर आणण्याचा मानस आहे.

इतर लोकप्रिय मराठी ट्विटर हॅंडल्स :

  • आजचा शब्द (@MarathiWord) : जो रोज नवनवीन विस्मृतीत जाऊ पाहणारे शब्द देऊन लोकांच शब्दभांडार वाढवत आहेत.
  • कालनिर्णय(@Kalnirnay) :  रोजचा दिनविशेष, किचन टिप्स, आरोग्य सल्ला, रेसिपीज यासाठी उपयोगी
  • मराठी बोला चळवळ (@Marhathi) :  जे महाराष्ट्रात मराठीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहेत.
  • ज्ञानभाषा मराठी (@SarvatraMarathi) : जे महाराष्ट्रात मराठी भाषा व मातृभाषेतून शिक्षण यासाठी खूप उत्तम कार्य करत आहेत.
  • मराठी टेक(@marathitech) : हे तंत्रज्ञान मराठी मध्ये सोपं करून सांगत आहेत.
  • महास्पोर्ट(@maha_sports) व क्रीडाजगत(@kridajagat) : क्रीडा क्षेत्रातील ताज्या अपडेट्स मराठी मध्ये मिळविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
  • थोडक्यात(@thodkyaat) : कोणतीही बातमी असो थोडक्यात पण अर्थपूर्ण स्वरूपात इथे तुम्हाला वाचता येतील.
  • नवी अर्थक्रांती (@NaviArthkranti) : थोर व्यक्तींचे प्रेरणादायक विचार व कथांसाठी प्रसिद्ध.

“ज्या मराठी ट्विटरकराला ट्विटरवर कोणी नाही, त्याच्यासाठी आम्ही आहोत, एकदा संपर्कात येऊन पाहाच. मराठी भाषा,संस्कृती आम्ही आंतरजालावर वाढविण्यास कटिबद्ध आहोत, या माध्यामतून तमाम मराठी नेटीझन्सना एकच विनंती आहे कि एक आपलं छोटसं कर्तव्य म्हणून यात सहभागी व्हा. आपल्या मराठीचे झेंडे आपण अटकेपार फडकवू.” , असे या साऱ्या हॅंडल्सचं म्हणणं आहे, तेव्हा आता निर्धास्तपणे ट्विटरचा वापर मराठीजन सुरु करू शकतात.

(संकलन व लेखन साहाय्य : राहुल वेलापुरे, गोपाळ मदने, स्वप्नील पाटील )