१) अंगत पंगत
मराठी पाक संस्कृतीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की आपल्या खाद्य संस्कृतीविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नाही. घरातल्या काकू-मावशी-आजींशी बोलून देखील केवळ आपल्या खाद्य संस्कृतीमधील विशेष अशा मोजक्या पाककृती किंवा पद्धती कळतात. परंतु महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये किती तरी आगळ्या वेगळ्या भाज्या उगतात, ऐतिहासिक, भौगोलिक प्रभाव आहेत, किती तरी जुन्या स्वयंपाकाच्या पद्धती, गोष्टी, वाक्प्रचार,भांडी देखील आहेत, जे आज आपण विसरून जात आहोत. अंगत पंगत ग्रुप सुरु होण्यामागे याच गोष्टी शिकण्याचा स्वार्थ हेतू होता.
ग्रुप जसा-जसा वाढत गेला, तसे लक्षात येऊ लागले की, आपल्या खाद्य संस्कृतीला जपायचे असले तर तिच्या बद्दलची चर्चा केवळ मराठीतच नव्हे तर जगाची भाषा मानल्या जाणाऱ्या इंग्रजी मध्ये जर झाली तर ती जगातील अधिक लोकांपर्यंत पोहचेल. थालीपीठ, पिठलं, सांजोऱ्या, चैत्रातील पन्हं आणि आंब्याची डाळ, वाळवणं, पाण्याचे झाकण ठेऊन शिजवण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या स्वयंपाक घरातील रोजच्या शब्द संग्रहातील पदार्थ असले तरी ते महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचतील अशी भावना होती. मराठी जेवण हे केवळ वडा पाव, मिसळ, झणझणीत कोल्हापुरी, आणि मालवणी नाही, त्यात सूक्ष्म असे हजारो प्रकार आहेत, ह्याची जाणीव स्वतःला आणि जगाला व्हावी असा उद्देश मनात घेऊन अंगत पंगत ची सुरुवात झाली.
अंगत पंगत वर विविध ऋतू, सण यानुसार महाराष्ट्रातील विविध खाद्यप्रकार पोस्ट करायचा प्रयत्न केला जातो. बरेचदा, सभासदांच्या आठवणीमधून असे किती तरी पदार्थ, पद्धती, प्रथा समोर येतात आणि खूप शिकायला मिळतं. इथे केवळ पारंपरिक मराठी पदार्थांबद्दल चर्चा होते. बेकिंग, इतर प्रांतीय पदार्थ, खाद्य संस्कृती सोडून इतर विषयांवर बोलणे हे पूर्णपणे वर्ज्य आहे. चर्चा कधी इंग्रजी माध्यमातून होते, कधी मराठीत. परंतु मराठीतच व्हावी असा आग्रह नाही. किंबहुना इंग्रजीत बोलल्यामुळे आपली खाद्य संस्कृती मराठी न बोलणाऱ्या इतर प्रांतीय खवैय्यांपर्यंत पोहोचते आणि तिचा अभ्यास अधिक होतो, असे अंगत पंगतच्या ग्रुप अॅडमिनना वाटते.
फक्त फेसबुकवर महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची रेसिपी पोस्ट करणे, चर्चा करणे एवढ्यावरच न थांबता येत्या काळात प्रत्यक्ष वर्कशॉप, चर्चासत्रे , सहली , पॉटलक , ऑनलाईन व्हिडीओ अशा विविध माध्यमातून ही खाद्यसंस्कृती अधिक स्वादिष्ट करण्याचा “अंगत पंगत” ग्रुपचा मानस आहे.
२) आम्ही सारे खवय्ये
साधारण पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपली जावी, वाढावी तसेच विविध मराठी खाद्यपदार्थांची पाककृती यांचे संवर्धन व्हावे, तसेच लोकांना त्यांची खवय्येगिरीची आवड पूर्व करण्यासाठी चांगल्या जागा सुचवणे या विचारांनी या “आम्ही सारे खवय्ये” ग्रुपची सुरुवात झाली.
या ग्रुपवर विविध पदार्थांचे फोटोज व त्यांच्या पाककृती (रेसिपीज) सभासदांकडून नियमितपणे पोस्ट केल्या जातात. एका सुप्रसिद्ध रेसिपी शोच्या नावावरून सुरु झालेल्या या ग्रुपला खूपच छान व उदंड प्रतिसाद सभासदांकडून मिळतो. त्याचप्रमाणे स्वयंपाक करत असताना येणाऱ्या शंका आणि प्रश्न (मग तो कितीही साधा वाटला तरी) लोक या ग्रुपवर निसंकोचपणे विचारतात आणि बहुतेक वेळी इतर सभासदांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळतं. सभासद या विषयांवर आपले विचार यानिमित्ताने मोकळेपणाने मांडतात.
सध्या “आम्ही सारे खवय्ये” ग्रुपचे फेसबुकवर २,५०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत. जे दररोज ग्रुपमध्ये खाद्यपदार्थांचे , फोटोज, व्हिडिओज आणि पाककृती पोस्ट केल्या करतात आणि तितकेच लोकंही या पोस्टना उदंड प्रतिसाद देतात. तसेच एकमेकांना उत्स्फूर्तपणे मदत करतात. हेच ग्रुपचे वेगळेपण म्हणायला पाहिजे.
खाद्यसंस्कृतीला सीमांची बंधने नसतात म्हणूनच आपल्या मराठी पदार्थांसोबत आता इतरही प्रांतातील पदार्थांच्या रेसिपीज सभासदांना इथे वाचायला/ पाहायला मिळणार आहेत . तसेच उत्तमोत्तम खाद्यपदार्थ कुठे मिळतील अशा ठिकाणांची माहिती या ग्रुपच्या माध्यमातून यापुढे लोकांसमोर आणण्याचा मानस आहे. सभासद ज्याप्रमाणे खाण्यावर प्रेम करतात त्याचप्रमाणे या ग्रुपवर देखील भरभरून प्रेम करतात. जर तुम्हाला ही जेवण बनविण्याची, नवनवे पदार्थ खाण्याची आवड असेल तर या ग्रुप्सचे सभासद व्हायला विसरू नका.