श्रावणी रविवार : आदित्य राणूबाई व्रत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 29, 2017 in   श्रावणमास

आदित्य राणूबाई व्रत


श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. ह्या व्रताच्या देखील दोन कथा आहेत.

राणूबाई ही सूर्याची पत्नी, तिची पूजा ह्या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिने पश्चात्तापदग्ध होऊन आदित्य राणूबाईची पूजा केल्यावर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या ह्या कथा आहेत.

सद्यःस्थिती : आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल. आपण तुळशीचे, अश्र्वत्थाचे लग्न लावतो. तसे हे आदित्य- राणूबाईंचे लग्न म्हणावे लागेल. श्रावण मास हा उपवासांचा, व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच पहिला श्रावणी रविवार हा आदित्य-राणूबाईंच्या पूजेसाठी राखला गेला असावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्रजप करावा.