गुरुगोविंदसिंग – दहावे शीख गुरु

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   December 24, 2017 in   Festivalsव्यक्तीचरित्र

‘जो कोणी मला परमात्मा म्हणेल, तो अधोगतीला जाईल. मी फक्त देवाचा दास असून या जगाचा खेळ पाहण्यासाठी आलो आहे’

हे उद्गार आहेत शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंह यांचे !

जन्माची कथा


गुरु तेगबहाद्दूर हे शिखांचे ९ वे गुरु, गुरुगोविंदसिंह हे त्यांचे पुत्र. पाटण्यात २६ डिसेंबर, १९६६ला माता गुजरीच्या पोटी गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला. ‘हा साक्षात ईश्वराचा अंश आहे,’ असे या नवजात अर्भsकाला पाहून एका मुसलमान फकिराने भाकित केले. पंजाबातील घुडम या खेडेगावात सय्यदशाह नावाचा विख्यात साधुपुरुष राहत होता. गुरुगोविंदसिंहांचा जन्म झाला त्या दिवशी त्याने नतमस्तक होऊन पूर्वेला वंदन केले. त्याच्या या कृतीने शिष्यांना आश्चर्य वाटले. कारण सच्चा मुसलमान पवित्र काबा ज्या दिशेला आहे त्या दिशेव्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेला वंदन करीत नाही. सय्यदशाहबाबाने आपल्या या कृतीचा खुलासा केला, ‘पूर्वेला परमेश्र्वराने नवजात अर्भकाच्या स्वरुपात दर्शन दिले. म्हणून मी नतमस्तक होऊन पूर्वेला वंदन केले.’

बालपण व शिक्षण


गुरुगोविंदसिंहांचा जन्म जेथे झाला तेथे, आज शिखांचे मंदिर उभे आहे. गुरुगोविंदसिंहांचे नाव गोविंददास असे ठेवले गेले. अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेले गोविंदसिंह लहानपणी अतिशय व्रात्य होते. कृष्णासारखेच खोडकर होते. लुटूपुटुची लढाई हा त्यांचा आवडता खेळ होता. खेळांशिवाय छोटया गोविंददासाला काहीच सुचत नसे. शिखांच्या सायंप्रार्थनेला रहिदास म्हणतात. लहानग्या गोविंददासाची ही सायंप्रार्थना कधीच वेळेवर होत नसे. विशेष म्हणजे पाटणा येथे जे साहेब गुरुव्दार आहे, तेथे ही सायंप्रार्थना आजही नित्याची वेळ टळून गेल्यावर विलंबानेच करण्याची प्रथा आहे.

संस्कृत, फारशी, हिंदी, पंजाबी, व्रज या भाषांवर लहानपणीच गोविंदसिंहांनी प्रभुत्व मिळविले होते. औरंगजंबाच्या जिझिया कराला विरोध करुन गुरु तेगबहाद्दूर १६७५ मध्ये मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या वधानंतर २९ मार्च, १६७६ च्या वैशाखीच्या दिवशी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी गोविंदसिंह गुरुपदी विराजमान झाले. गुरुपदी बसल्यानंतरही गुरुगोविंदसिंहांच्या शिक्षणात कधीच खंड पडला नाही. सर्व विद्यांमधील त्यांचे नैपुण्य केवळ असाधारण होते. तलवार चालविण्यात व तिरंदाजीत तर ते केवळ अजेय होते.

साहित्यसंपदा व तलवार


त्यांची प्रतिभा आणि व्यासंग त्यांच्या साहित्यातून सहजपणे जाणवतो. त्यांचे हस्ताक्षरही अतिशय सुंदर होते. ते सहीदेखील फार सुरेख करीत. चंडी-दी-वार हे महाकाव्य त्यांनी लिहिले. त्यात प्रामुख्याने दुर्गेची वीरवृत्ती त्यांनी चित्रित केली आहे. १९व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. गुरुगोविंददासांनी आपल्या अनुयायांना तलवारीचे एक नवे समर्थ प्रतीक दिले. ‘प्रथम तलवारीचे स्मरण करुन गुरुनानकांचे चिंतन करा’, असा संदेश त्यांनी आपल्या शीखबांधवांना दिला. एवढेच नव्हे तर स्वतःच्या जीवनात युद्ध आणि शस्त्र यांना परमेश्र्वराचे प्रतीक मानले. म्हणूनच त्यांना आदराने ‘भारताचा संतसैनिक’ म्हणून मान दिला गेला. कृष्णावतारावरही त्यांनी काव्यरचना केल्या. दशमग्रंथ म्हणजे दहाव्या गुरुचा ग्रंथ. या महाग्रंथात जपसाहेब ही एक प्रार्थना आहे. ती आदिग्रंथ या धर्मग्रंथात समाविष्ट केली आहे. जपसाहेबाची एकूण आठशे श्लोकसंख्या आहे. ही श्लोकरचना एकूण १० वृत्तांमधून केली आहे. जेव्हा अन्य सर्व मार्ग खुंटतात, तेव्हा तलवारीचा उपयोग करणे हेच धर्म्य ठरते, असे मत व्यक्त करणाऱ्या गुरुगोविंदसिंहांचे अवघे जीवन लढाया आणि साहित्यनिर्मिती या दोन गोष्टींनी व्यापले होते.

‘ग्रंथसाहेबांचे मार्गदर्शन मानणारे व त्यानुसार वर्तन करणारे पाच शीख जेथे एकत्र येतात तेथे मी आहेच. गुरुनानाकांपासून आजतागायतच्या सर्व गुरुंचा इतिहास वाचा, नीट समजून घ्या. यानंतर ग्रंथसाहेब हाच तुमचा गुरु. खालसात मी माझा आत्मा विलीन केला आहे’, असे ते निर्वाणीचे बोलले.

अखेर ७ ऑक्टोबर, १७०८ला पहाटे अकालाच्या परमतत्त्वात या मानवतेच्या महान उपासकाचा आत्मा विलीन झाला.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी

संदर्भ टीप –

प्रस्तुत लेखासाठी प्रामुख्याने गुरुगोविंदसिंह – लेखक – हरबन्ससिंह, अनु. माधव मनोहर, प्रका. हरबन्ससिंह, गुरुगोविंदसिंह फाउंडेशन, चंदिगड, पंजाब, आ. १ ली, १९६६ या ग्रंथाचा आधार घेतला आहे.