आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठूराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्या वेळी ‘ उठी उठी गोपाळा ‘ म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्याच दिवशी तुलसी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुलसी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक म्हणावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते.
ज्याला नाही लेक । त्येनं तुळस लावावी । आपुल्या अंगनात देव करावे जावाई ।।
असा एका लोकगीताचा संदेश आहे. दुसऱ्या एका लोकगीतात तुळशीचे मोठे कौतुक केले आहे.
पंढरी पंढरी, नऊ लाखाचा कळस । देवा विठ्ठलानी, वर लाविली तुळस ।।
एका लोकगीतात तर वितुरायाबरोबर होणाऱ्या तुळशीच्या लग्नाचे मोठे रंगतदार वर्णन आहे.
पंढरपुरात ग काय, वाजतं गाजतं? सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागतं ।।
रत्नजडित पाटावरी, आली नवरी तुळस । सोनीयाच्या अक्षतांचा, चढे नगरीला कळस ।।
हाती घेऊनी वरमाला, देव विठ्ठल मंडपात । सारी पंढरी नगरी, निघे न्हाऊन आनंदात ।।
हे लग्न अगदी लोकांच्या आवडीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे साग्रसंगीत आणि दणक्यात पार पडत आहे. लग्नाची बोलणी-चालणी, याद्या सगळे काही अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीर आहे. रुक्मिणीच्या भावाने
रुक्मिणीला दिली, पंढरी पाहूनी । हळदी कुंकवाला, दिली आळंदी लिवूनी ।
नऊ लाख मोती, विठुरायाच्या कळसाला । चढता उतरता, गवंडीदादा आळसला ।।
असा हा सारा थाट! रुक्मिणीच्या माहेरच्यांनीही लग्नाचा बार मोठा जबरदस्त उडवून दिला. कारण रुक्मिणीबाय तशी गुणाची आणि तिला पती मिळाला तो तर कुठे शोधून सापडणार नाही असा! गुणवंत, धनवंत, पराक्रमी!
तुळस आणि तुळशीचा विवाह याबद्दल अनेक कथा आहेत.
महापराक्रमी दैत्य जालंधर हा थोर पतिव्रता वृंदा हिचा पती, वृंदेचे पातिव्रत्य जोपर्यंत अढळ राहील तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणार नाही, असा त्याला वर मिळाला होता. आधी असे वर द्यायचे आणि मग कपटाचरण करून त्यातून मार्ग काढावयाचा हा आपल्या देवांचा आवडता छंद. या प्रकरणात विष्णूनेही तसेच केले. त्याने जालंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. तिला परपुरुषाचा स्पर्श झाला आणि त्याक्षणी खऱ्या जालंधराचा मृत्यू झाला. वृंदा सती गेली. भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दु:खी झाले. देवांनी जिथे वृंदेचे दहन झाले होते तिथे तुळशीचे रोप लावले. आपल्या रूपागुणांनी तुळस देवांना आवडू लागली. वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांनी लग्न केले. तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा. आपण आता तो ‘ तुळसी विवाह प्रारंभ ‘ म्हणून साजरा करतो. तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी. वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याच्या प्रभावी गुणात तर या सम हीच! त्वचा-रोगावर रामबाण, रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तिची अनेकविध प्रकारची सद्गुणसंपदा आहे. म्हणूनच आपल्या पूजेत तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी, असा संकेत पूर्वापार रूढ आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालावी, तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळ गळ्यात घालावी इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे. एकनाथ म्हणतात,
नित्य वंदिता तुळसी । काळ पळे देशोदेशी ।।
असाध्य रोगावर खात्रीचा, सुलभ, स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा गुणसंभारनाथांनी या सहा शब्दांत भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध केला आहे.
तुळशीची आरती
जयदेवी जयदेवी जय तुळशी माते । पादपरुपे तुजला धरिलें भगवंतें ।।
सकळहि तीर्थे वसती तुझिये मुळी । मध्यभागी देव रहाती सकळीं ।।
अग्नि वेदशास्त्रें सुखरूप राहिली । ऐसी तूं तुळशी सकळा साउली ।।
दृष्टी तुज देखल्या अघें तीं पळती । स्पर्शमात्रें रिपुही पावन होती ।।
नमन करितां रोग सकळही शमती । उदक सिंपलिया अंतक नाशती ।।
नामस्मरणीं तुझ्या उपजें सद्भावो । एका तुळशीदळें संतुष्टे देवो ।।
काही सेवा घडल्या चुके रौख । मुक्तेश्वरी सदगुरूमुखें अनुभव ।।
– संत मुक्तेश्वर