दिवाळीचे महत्त्व

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 16, 2017 in   Festivals

आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो.

पहिला दिवस: धनत्रयोदशी


दिवाळीच्या पाच दिवसांतील पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्याकरिता धन्वंतरीची जयंती साजरी करून आपण या सणाचा शुभारंभ करतो. खरेच आहे. आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घ्यायचा असेल, दारिद्र्य, चिंता, अस्वस्थता अशा गोष्टींचा काळोख दूर करावयाचा असेल, तर आधी प्रकृती चांगली असली पाहिजे, पुरेसे आयुष्य लाभले पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी प्रत्यक्ष यमराजा आणि देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे स्मरण करतो.

दुसरा दिवस: नरक चतुर्दशी


दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान पराक्रम आपण आठवतो, नरकासुराचा वध करून! अमंगल, अशुचि प्रवृत्तीच्या दुष्टदुर्जनांचे निर्दालन करण्याचा संकल्पच आपण एक प्रकारे मनोमन सोडतो.

तिसरा दिवस: लक्ष्मीपूजन


त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस. चिरकाल अर्थसंपन्नता लाभावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहावी म्हणून आपण लक्ष्मीचे पूजन करतो, प्रार्थना करतो.

चौथा दिवस: बलिप्रतिपदा / दीपावली पाडवा


बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकऱ्याचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. व्यापार, उद्योग याचे नवे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यापारे वसते लक्ष्मी । हे वचन ‘ सार्थ ‘ करण्यासाठी लक्ष्मीपूजनानतर लगेचच लक्ष्मीने व्यापारात यश द्यावे म्हणून आपण व्यापाराच्या नव्या वर्षाचे नवे पर्व सुरू करतो.

पाचवा दिवस: भाऊबीज / यमद्वितीया


बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दिवे लावून आपण यमराजाचे एकप्रकारे स्मरण केले. आपण भाऊबीजेला यमद्वितीया असे म्हणतो कारण यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनास गेला अशी श्रद्धा आहे. या दिवशी बहीण असलेल्या कोणाही भावाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे, अशी परंपरा आहे.

म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम असे पाच दिवस जणू काही आपण विभागून घेतले आहेत. या पाच दिवसांच्या पंचविध उत्सवाने आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीत धार्मिक आचाराला महत्त्व तसे कमी असले, तरी धार्मिक श्रद्धेचा पाया आरोग्याच्या, धन-स्वास्थ्याच्या, व्यापार- उद्योगाच्या आणि कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने मजबूत होण्यासाठी दिवाळीच्या सणातील प्रत्येक गोष्ट ही जणूकाही आखून ठरवून दिली आहे. या सर्व उत्सवांमध्ये अधिक महत्त्व आहे ते दिव्याच्या रोषणाईला, दिव्याच्या सजावटीला, दीपांच्या मालिकांना, दीपावलीला. म्हणून या सणाला आपण ‘ दिवाळी’ चं म्हणतो दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी. दिवाळी हा चिंता-विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे. विक्रम संवताचे नवे वर्ष सुरू होताना सर्व आसमंत तेजाने उजळून टाकणारा, दाहीदिशातून दरवळणाऱ्या सुगंधाने मनामनात प्रसन्नतेची कारंजी फुलविणारा सण आहे. फराळांच्या गोड पदार्थांनी गोड झालेल्या तोंडाने परस्परांना गोड गोड शुभेच्छा देण्याघेण्याचा हा आणि यासारखा हाच असा सण आहे.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)