नवरात्र : नटली ती रमणी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 26, 2017 in   Festivals

आज नवरात्रीचा सातवा दिवस. आज आपण श्रृंगारमयी अशा देवीचे स्तवन करणार आहोत. आपण शब्दफुलांची आरास मांडून नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या रूपात पाहत आहोत. तिचे स्तवन करून तिला विनम्र भावाने वंदन करीत आहोत. नवरात्रीनिमित्त हा शब्दोत्सव मांडलेला असल्यामुळे इथे श्रद्धेचा भाग आहेच, पण देवीकडे पाहण्याचा विविध स्वरूपांचा दृष्टिकोन रोज वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त होत असल्यामुळे देवीची विविध रुपे आपल्या अंतर्मनाला पाहता येतात. सर्व जग निर्माण करणारी जी कोणी शक्ती असेल ती शक्तीच जगदंबा. अंबा म्हणजे आई, जगाची आई ती जगदंबा, म्हणून तिचे स्मरण-पूजन केले जात आहे. केवळ जगदंबा असा जप केल्यामुळे किंवा जगदंब असे नाव उच्चारल्यामुळे पापनाशनाला ते साहाय्यकारी ठरते, अशी परंपरागत श्रद्धा.

जन्मकुंडलीतील सातवे स्थान हे संसारातल्या जोडीदाराचे स्थान. त्याला भार्या-स्थान अशीही संज्ञा आहे. म्हणूनच या ठिकाणी देवीचे कामरुपिणी, काममोहिनी कामेश्वरवशिनी अशा शब्दांत वर्णन केलेले असल्यामुळे आजच्या नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीचे हे स्वरूप विचारात घेणे मोठे औचित्यपूर्ण आहे, यात शंका नाही.

सप्तमदिनीं शृंगार मांडिला नटली ती रमणी । कामरूपिणी काममोहिनी कामेश्वरवशिनी ।

भक्त अनंगापासुनि करुनी मुक्त ठेविला अचल मनीं । नमन अनंगा अनंगरूपा अनंगरेखा मनोमनी ।।

सातव्या दिवशी देवी ही रमणी झाली आहे. ती मनातील इच्छा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या स्वरूपात आज प्रकटली आहे. याचा अर्थ आपल्या भक्ताने त्याच्या जीवनात कामविकारामध्ये रंगून जावे, असा नाही. देवीचे ‘षडरिपुदमना’ हे स्वरुप काल पाहिले आणि त्या षडरिपूमध्ये काम प्रथमस्थानी आहे, हेही पाहिले. म्हणून येथे देवी आपल्या भक्तांना कामविकारापासून मुक्त करून त्यांचे मन अचल म्हणजे स्थिर करीत आहे. तिने भक्तांचे मन अनंगापासून म्हणजे मदनापासून दूर ठेवले आहे आणि काम हा अतिरेक झाल्यावर वाईट, पण मर्यादित स्वरूपात तो जीवनासाठी आणि सृष्टिचक्र चालण्यासाठी आवश्यक असतो, हे ध्यानात घेऊन त्या कामदेवाला, अनंगाला मनोमनी वंदन करून त्याने मर्यादित राहावे, आपल्या मर्यादेचे उल्लंघन करू नये, अशी जणू सुप्त अपेक्षा व्यक्त केली आहे.

देवीला आपण माता म्हणतो पण मातृपदी विराजमान व्हावयाचे असेल, म्हणजेच नवनिर्मितीच्या वेगवेगळ्या पण आवश्यक अशा कार्यकर्तृत्वाच्या उच्च स्थानी आरुढ व्हावयाचे असेल तर प्रकृती आणि पुरुष यांचे मीलन तेवढेच आवश्यक आहे. म्हणून अनंगाला आवाहन करून वंदन तर केले पाहिजेच पण आपण त्याच्या आधीन होता नये, हा विचार महत्त्वाचा आहे.

भक्त अनंगापासुनि करुनी मुक्त ठेविला अचल मनीं । या ओळीचे त्या दृष्टीनेच विशेष आणि आगळेवेगळे असे महत्त्व आहे. काम म्हटला, अनंग म्हटला की तिथे रतीची उपस्थिती आवश्यक असते आणि श्रृंगाराशिवाय रती कशी शोभणार? या सर्व गोष्टी आपापल्या स्थानी जीवनात विराजमान झालेल्या असतातच, पण त्यांचा अतिरेक असू नये, त्यांनी आपापल्या लक्ष्मणरेषा ओलांडू नयेत, अशी अपेक्षा मात्र रास्तपणे बाळगली गेली पाहिजे.

मनातील षडविकारांना आपण रिपू म्हणतो ते केवळ याच भावनेने ते रिपू असले तरी मर्यादित स्वरूपात त्यांचे अस्तित्व प्रत्येकाच्या ठायी असतेच. त्यांना बेबंद होऊ देता नये, ते आपल्या अंकित असले पाहिजेत. आपण त्यांच्या अंकित होऊन चालणार नाही हाच विचार महत्त्वाचा!


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर