नवरात्र : प्रेमांकित जननी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   September 24, 2017 in   Festivals

आपण या वर्षीच्या नवरात्रात ज्या काव्याच्या आधारे नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत त्या काव्याच्या कर्त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान असावे, असे वाटते. कारण कुंडलीतील पंचमस्थान हे मुलांचे, संततीचे स्थान होय. पाचव्या दिवशी देवीचे स्मरण करताना कवीने तिच्या माता या स्वरूपावर अधिक भर दिला आहे आणि तो देताना तिचे आपल्या मुलांवर कसे प्रेम असते ते सांगितले आहे. हा ललितापंचमीचा दिवस असल्यामुळे ती माता पालन करते म्हणजेच जोपासते, लाड करते आणि जणू काही प्रेमाच्या उद्यानात आपल्या मुलांना रमविते, खेळविते म्हणूनच कवीने तिचा प्रेमरुपिणी‘, प्रेमांकित जननी या शब्दांत गौरव केला आहे.

पंचमदिनीं ती त्रिपुरीसुंदरी राजेश्वर राज्ञी । लावण्याची अनुपम शोभा ठाव नसे सुवनी ।

लालन करि ती ललिता माता लय प्रेमोद्यानीं । नमन करूया प्रेमरुपिणी प्रेमांकित जननी ।।

तिला त्रिपुरसुंदरी असे म्हटले आहे. त्रिपुरसुंदरी हे देवीचे एक नाव आहे आणि या नावाने आद्य शंकराचार्यांनी लिहिलेले तिचे एक स्तोत्रही प्रचलित आणि प्रसिद्ध आहे. देवी इतकी सुंदर आहे की, ती जणू राजेश्वर राज्ञीसारखी भासते. मागील वर्षी महाराज भवानी या सूरदासांच्या भजनावर विचार करताना आपण अधिकाराधिष्ठित राणीला महाराज म्हणण्याची प्रथा आहे, हे पाहिले होते. इथेही राजेश्वर राज्ञी असे म्हटले आहे म्हटल्यास ते राजेश्वराची राणी अशाही अर्थाने घेता येते. तिचे लावण्य केवळ अनुपम आहे. इतके अनुपम आहे की त्याच्या तुलनेसाठी जगात दुसरे काही नाही. सर्व जगात एकमेवाद्वितीय असे तिचे स्वरूप आहे. तिच्या सौंदर्याच्या ऐश्वर्याशी कशाचीच तुलना होऊ शकत नाही. अशा त्या ललितामातेला कवीच्या सुरात सूर मिळवून आपणही नमन करूया आणि माता म्हणून ती कशी परमश्रेष्ठ आहे त्याचे स्मरण करूया.

शंकराचार्यांनीच लिहिलेल्या एका स्तोत्रात कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति । असे म्हटले आहे. म्हणजे कुपुत्र जन्माला येऊ शकतो. कुपुत्र निर्माण होऊ शकतो, संतती वाईट असू शकते, पण माता मात्र कधीही वाईट नसते असे सांगितले आहे. माता तर ममतेची, प्रेमाची असाधारण अशी जणू खाणच तिची माया, ममता अथांग आहे, अपार आहे जगन्माता, जगज्जननी हेच तिचे खरे स्वरूप आहे. ललितापंचमीच्या दिवशी उपांगललितेचे व्रत आचरले जाते. कुलपरंपरेप्रमाणे अनेक ठिकाणी हे व्रत करतात.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर