शारदीय नवरात्रीनिमित्त आपण सांप्रत प्रतिदिन देवीच्या विविध रूपांचे वेगवेगळ्या प्रकारांनी स्मरण करीत आहोत. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. ही सहावी माळ देवीच्या चरणी वाहताना आपण तिच्या वज्रधारिणी अशा पराक्रमी रूपाचे ध्यान करून तिला वंदन करणार आहोत. नवरात्रीनिमित्त जे काव्य आपण विवेचनासाठी घेतले आहे, त्या काव्याच्या रचनाकर्त्याला ज्योतिषाचे काही ज्ञान असावे, असे आधी म्हटले होते, त्याची प्रचीती देणारा हा सहाव्या दिवसाचा श्लोक आहे. कुंडलीत सहावे स्थान हे रिपुस्थान म्हणजे शत्रूचे स्थान म्हणून ओळखले जाते. या घरात पापग्रह असेल तर माणूस शत्रूवर विजय मिळविणारा होतो, असे फलज्योतिष सांगते. सहाव्या दिवशीच्या श्लोकात रिपुदमन करणाऱ्या देवीच्या चरणी कवीने वंदन केले आहे.
षष्टदिनीं षष्ट देवता वज्रेश्वरी माता । वज्रधारिणी षड्रिपुदमनी भक्ताऽभय देता ।
भक्तोल्हासिनी ती निजभक्ता वांच्छित कल्पलता । नमन करूया भक्तरक्षिता भक्तांकित माता ।।
इथे देवीला वज्रेश्वरी म्हटले आहे ते ती हातात वज्र हे अस्त्र धारण करणारी आहे म्हणून. वज्र या शब्दाचे अनेक अर्थ असून त्यात हिरा असाही एक अर्थ आहे. दक्षिणेकडे हिऱ्याला वज्रच म्हणतात. इंद्राचे आयुध म्हणून वज्र प्रसिद्ध आहे. इथे देवीच्या हातात इंद्राचे वज्र आहे, अशा कल्पनेने तिला वज्रधारिणी असे म्हटले आहे आणि म्हणून वज्रधारिणी माता असा तिचा उल्लेख केला आहे. वज्रेश्वरी हे देवीचे एक स्वरूप आहेच या स्तोत्ररूपी कवितेत प्रत्येक दिवशीच्या देवीचे स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केले
असल्यामुळेच प्रारंभी षष्टदिनीं षष्ट देवता वज्रेश्वरी माता । वज्रधारिणी षड्रिपुदमनी भक्ताऽभय देता । असा उल्लेख आहे. ती हातात वज्र धारण करून काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड्रिपूंचे दमन करते. हे षड्रिपू सह्या मानवजातीचेच शत्रू आहेत. देवीने वेगवेगळ्या अवतारांत विविध असुरांना नेस्तनाबूत केले हे सर्वश्रुत आहेच. हे झाले बाह्य शत्रू या बाह्य शत्रूंचे निर्दाळण करण्यासाठी देवीला विविध अवतार घ्यावे लागले. मधुकैटभ, शुंभनिशुंभ, महिषासूर इत्यादी मदोन्मत्त झालेल्या अनेक दैत्यांना देवीने यमसदनाला पाठविले. स्त्रीशक्तीचा एक अनोखा आणि वेगळाआगळा साक्षात्कारच जगाला तिच्या या रिपुदमनाच्या पराक्रमामुळे झाला. मानवजातीला कष्ट देणाऱ्या दृष्ट राक्षसांना देवीने योग्य शासन तर केलेच, पण आपल्या मनात वावरणाऱ्या षडरिपूंना, मनात निरंतर नांदणाऱ्या सहा शत्रूंना देवीने आटोक्यात ठेवावे, त्यांचे दमन करावे आणि मनात वसलेल्या या षडरिपूंचे दमन झाल्यानंतर तिचे भक्त हे सद्गुणमंडित झाल्यामुळे सर्वच लोकांना हवेहवेसे वाटतील आणि देवी त्यांना अभयदात्री अशी ठरेल. आपल्या अशा कृतीने देवी भक्तांना उत्साह देते, उल्हसित करते आणि ती जणू काही कल्पलतेचे स्वरूप धारण करून भक्तांच्या इच्छा, आकांक्षा आणि मनीच्या वांच्छा पूर्ण करते.
ही देवी कशी आहे? ती भक्तांकित आहे, ती मातृस्वरूप असल्यामुळे तिच्या मनात वात्सल्याचा झरा निरंतर झुळझुळत असतो तिला आपल्या भक्तांची नेहमीच काळजी, चिंता, कळकळ असते. आईला जसे आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटते, आईचे जसे मुलांवर सतत लक्ष असते, तसेच देवीचे आपल्या भक्तांवर प्रेम असते, लक्ष असते. तिला त्यांच्या हिताची कळकळ असते. म्हणून तर कवी नमन करुया भक्तरक्षिता भक्तांकित माता ।। या शब्दांनी तिच्या या वात्सल्यगुणाचा गौरव करतो. देवीने साकार रूप धारण करून अनेक राक्षसांना कंठस्नान घातल्याचे उल्लेख पुराणात असले तरी या ठिकाणी मात्र देवी निराकार, निर्गुण रूपात भक्तांच्या अंतर्मनात प्रवेश करते आणि त्यांच्या मनातच वावरणाऱ्या कामक्रोधादि रिपूंचे दमन करते, अशा श्रद्धेने तिला हे आवाहन करण्यात आले आहे.