असे सांगतात की, या सृष्टीच्या प्रारंभी एक शब्द निर्माण झाला तो शब्द म्हणजे उकाराचा ध्वनी होय, असे आपण समजतो जगातील इतर ठिकाणी लोक आपआपल्या मतानुसार हा ध्वनी कोणता असेल याचे विविध अंदाज पूर्वापार वर्तवीत आलेले आहेत. एखादा मोकळा शंख कानाला लावला की त्यामधून ॐकाराचा ध्वनी उमटलेला ऐकू येतो. शंखात पाणी किंवा दुसरे काही भरलेले असेल तर असा आवाज ऐकू येत नाही. मात्र आत काही भरले नसल्यास शंखाच्या पोकळीतून निरंतर ॐ सदृश आवाज येत असतो, हे खरे अवकाशाच्या पोकळीतही याच ओम्काराचे अधिष्ठान आहे, असे मानले जाते.
ॐ हा पहिला ध्वनी, नंतर क्रमाक्रमाने माणसाच्या ध्वनींची संख्या वाढत गेली. तो पशुपक्ष्यांचे आवाज ऐकून त्याप्रमाणे स्वतःही आवाज निर्माण करू लागला आणि निसर्गतः बुद्धीचे लेणे असल्यामुळे त्याने अशा आवाजांची संख्या खूप वाढविली आणखी प्रगती झाल्यानंतर परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी अशा चारवाणी त्याने निश्चित केल्या.
नमूं शारदा मूळ चत्वारि वाचा । असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात किंवा अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून त्वं चत्वारिवाकपदानि असे म्हटले आहे, ते या चार वाणींना उद्देशूनच होय. शारदा सरस्वती ही आपल्या वाणीवर अधिष्ठित असून वाचाशक्ती, शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य, म्हणजे या चार प्रकारच्या वाणींची लीला आहे. या चार वाणींमधून शारदेचे म्हणजेच सरस्वतीचे अस्तित्व असते, असे समर्थांना सांगावयाचे आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीचे नमन पुढीलप्रमाणे केले आहे.
चतुर्थदिनी ती चतुर्थवाणी विस्मय होय मनीं । नादरुपिणी शब्द प्रकटिनी शब्दातीत ध्वनी ।
शब्दस्वरुपी होऊनि दिधला भक्तादेश मनीं । नमन करुया नादरंगिणी नादानंदा मनोन्मनीं ।।
चार प्रकारच्या वाणी निर्माण करण्याचे तिचे सामर्थ्य हे खरोखरच विस्मयकारक आहे. ती शब्द प्रकट करीत असली तरी शब्दातीत असा ध्वनी ती निर्माण करू शकते. शब्दातीत ध्वनी म्हणजे काय? शब्दातीत ध्वनी म्हणजे अनाहत नाद. कोणत्याही प्रकारचा आघात न करता आपोआप निर्माण झालेला ध्वनी तो अनाहत त्या नादावरही स्वामित्व श्रीशारदेचे, सरस्वतीचे म्हणजे देवीचेच आहे.
शारदीय नवरात्रात देवीच्या या स्वरूपाचे स्मरण करून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिच्यापुढे नतमस्तक होणे हे शब्दसामर्थ्य जाणणाऱ्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. देवीच्या मनात जे असेल ते ती भक्तांच्या मनीमानसी प्रकट करते भक्तांना ती शब्दांच्या माध्यमाशिवाय जणू काही आदेशच देते आणि आपले मनोगत शब्दांतून प्रकट करण्याबद्दल प्रेरणा देते. सरस्वती ही गानप्रवीण आहे ‘ वीणावरदंडमंडितकरा ‘ अशी आहे. ती वीणा-वादनात निरंतर रमणारी, म्हणूनच नादामधील आनंद अनुभवणारी, नादामध्ये रंगून जाणारी, विविध प्रकारचे नाद निनाद आपल्या अंकित करून घेऊन त्यांद्वारे त्रिभुवनाला मोहविणारी, अशी आहे. नादमय सरस्वती मातेला आपण नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नतमस्तक होऊन वंदन करूया आणि ‘जगदंब उदयोऽस्तु’ असे आपल्या वैखरी वाणीने म्हणूया.