बलिप्रतिपदा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 18, 2017 in   Diwali EditionFestivals

हिंदू पंचांगातील महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे ‘बलिप्रतिपदा’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी होय. संपूर्ण भारतात ‘बलिप्रतिपदा’ सण म्हणून साजरी केली जाते. दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असलेल्या बलिप्रतिपदेला आपण महाराष्ट्रात ‘दिवाळीचा पाडवा’ असे संबोधितो. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची, तसेच त्यावेळी पतीने आपल्या ऐपतीनुसार एखादी भेटवस्तू ‘ओवाळणी’ म्हणून देण्याची एक गोड प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते. (ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात विशेषकरुन आहे.)

बळीराजाची पूजा


हा दिवस विशेषत्वाने शुभ मानल्यामुळे वैयत्किक कार्याचा प्रारंभ तसेच विवाहासारखे मंगलकार्य ह्या दिवशी आवर्जून केले जाते. परंतु त्याबरोबरच सामाजिक, लोकोपयोगी कार्यांचादेखील आरंभ करावा, असे सांगितले गेले आहे. (शाळा, दवाखाने, पाण्याची टाकी, सार्वजनिक बगिचे, रस्ते अशा कामांना या दिवशी सुरुवात करण्याची प्रथा आहे.) रात्रौ बळीराजाचे त्याच्या पत्नीसह चित्र काढून ते खास बनविलेल्या एका गादीवर (कारण बळी हा राजा होता, त्यामुळे राजाला राजगादीच हवी-) ठेवून त्या चित्राची पूजा करावी. त्याला दीपदान करावे. रात्रभर त्याच्यासाठी जागरण करावे. त्यावेळी गीत-नृत्याचे कार्यक्रम आयोजित करुन सर्वांनी एकत्रितपणे ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा.

ह्याच दिवशी सकाळी अभ्यंगस्नान, पूजाअर्चा, गोडधोडाचा फराळ केल्यानंतर शक्य असल्यास थोडा वेळ द्यूत खेळावे. (ही द्यूतक्रीडा शिव-पार्वतीच्या द्यूतक्रीडेचे स्मरण म्हणून खेळण्याची प्रथा आहे.) ह्या प्रथेमुळे ह्या प्रतिपदेला ‘द्यूतप्रतिपदा’ असे आणखी एक विशेष नाव प्राप्त झाले आहे. (मात्र आता ही प्रथा फार थोडी मंडळी पाळताना दिसतात.) ह्या दिवशी अग्नी आणि ब्रह्मा ह्यांची रथयात्रा काढावी.

सद्यःस्थितीः


पूर्वी प्रथम घरातील केरकचरा काढून तो एका पाटीत भरुन त्या कचऱ्यावर एक पणती पेटवून ठेवीत. तिच्याबरोबर एक केरसुणी आणि एक चलनी नाणेही ठेवीत असत. नंतर ती टोपी गडीमाणसांकरवी घरापासून दूर उकिरडयावर नेऊन ठेवण्यास सांगितले जाई. त्यावेळी घरातील एका मुलीने थाळी वाजवून ‘इडापिडा टळो-बळीराजाचे राज्य येवो-’ असे म्हणण्याची प्रथा होती. (आता ती शहरी भागातून पूर्णतः लुप्तप्राय झालेली दिसते.)

बळी राजाची सुपरिचित कथा:


दैत्यांचा राजा बळी हा नावाप्रमाणे बलवान होता. मात्र तो जसा महाप्रतापी होता तसाच परमदयाळूदेखील होता. आपल्या प्रजेवर त्याचे अपत्यवत् प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा तो नातू. ह्या बळीने तपश्र्चर्या करुन त्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्गदेखील जिंकला. त्याने प्रल्हादाला ते स्वर्गाचे राज्य देऊ केले. परंतु प्रल्हादाने बळीलाच राजगादीवर बसविले. त्यावेळी ‘धर्माने राज्य कर’ असा उपदेशही केला. बळीने स्वर्ग जिंकल्याने देव घाबरुन आपली रुपे बदलून स्वर्गापासून दूर गेले होते. एवढा हा पराक्रमी होता. ह्याने आपल्या आयुष्यातील जो शेवटचा अश्वमेध केला त्यावेळी ती संधी साधून इंद्राने विष्णूला बळीचा बीमोड करण्याची विनंती केली. त्यानुसार भगवंतांनी वामनावतार धारण करुन बटुवेषात बळीकडे जाऊन तीन पावले ठेवता येतील एवढी जमीन (त्रिपादभूमी) मागितली. दातृत्वाबद्दल ख्याती असलेल्या बळीने बटूची ती इच्छा मान्य केली. त्याबरोबर श्रीविष्णूने भव्यरुप धारण करुन दोन पावलांमध्ये त्रिभुवन व्यापून तिसरे पाऊल बळीच्या सांगण्यावरुन त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. (काही पुराणांच्या मते त्यावेळी प्रल्हादाने केलेल्या विनंतीवरुन देवाने बळीला समपाताळापैकी ‘सुतल’ पाताळात जाऊन राहण्याची आज्ञा केली.) मात्र त्याचवेळी बळीची भक्ती आणि दातृत्व ह्यामुळे प्रसन्न होऊन त्याला ‘ह्या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील, तसेच ही तिथी तुझ्या नावाने (बलिप्रतिपदा म्हणून) ओळखली जाईल’ असा वर दिला. ही कथा सुपरिचित आहे.

बळीच्या प्रजाप्रेमाचे द्योतक म्हणून ह्या दिवशी समाजाभिमुख अशा कार्याचा प्रारंभ केला जातो. आपणही एखाद्या सामाजिक संस्थेला आपल्या ऐपतीनुसार थोडीफार मदत करावी. परिसरातील मंडळींनी एकत्रितपणे आपल्या परिसरात निदान एखाद्या सावली देणाऱ्या वृक्षाचे रोपण करावे. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाला काही ग्रंथ अथवा खुर्ची-टेबल अशा त्यांच्या गरजेनुसार ज्याची आवश्यकता असेल अशा वस्तू पुरविल्या तरीही ते उचित होईल.

गोकुळ व गोवर्धन पर्वत:


ह्याच दिवशी श्रीकृष्णाने गोकुळवासीयांना इंद्रपूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रागावून इंद्राने गोकुळावर अतिपर्जन्यवृष्टी केली. त्यावेळी सर्व गोकुळवासीयांच्या संरक्षणार्थ कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर पेलून धरला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून ह्या दिवशी विविध पदार्थ, गोडाचे अनेक प्रकार करुन देवळात ह्या मिठायांची रास करुन तिचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. ही रास म्हणजे गोवर्धन पर्वताचे प्रतीक असते. एवढी अति मधुर प्रथा भक्तमंडळींनी पाळली नसती तरच नवल ! आपणही घरी नेहमीपेक्षा वेगळे जेवढे आणि जे शक्य होतील ते पदार्थ करून भगवान श्रीकृष्णांना प्रेमाने नैवेद्य दाखवावा. आजूबाजूच्या मंडळींना तो प्रसाद म्हणून वाटावा.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून)