भाऊबीज

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 18, 2017 in   Festivals

भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथेच जेवावे अशी प्रथा आहे. ह्यावेळी बहिणीने भावाला ओवाळावे. भावाने ऐपतीप्रमाणे तिला ओवाळणी घालावी. बहिणीनेही भावाला एखादी भेटवस्तू द्यावी, जेवणात भावाच्या आवडीचे पदार्थ करावेत. सख्खी बहीण नसलेल्यांनी चुलत, मावस, मामे, आत्ते अशा दूरच्या नात्यातील बहिणीकडे जाऊन ही भाऊबीज साजरी केली तरी चालेल, असा पर्यायही धर्मशास्त्रात दिला आहे.

सद्यस्थितीः


मूळ प्रथेमागील उद्दिष्ट गमावून बसलेले एक व्रत म्हणजे ‘भाऊबीज’ ! भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधातील गोडवा टिकविण्यासाठी, त्या नात्याचे बंध पुन्हा घट्ट करण्यासाठी, त्यानिमित्ताने दोन कुटुंबातील सर्व मंडळी एकत्रित येण्यासाठी ह्या सणाची योजना केली गेली. दोन्ही कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीत तफावत असली तरीही ती नात्याच्या आड येऊ नये. बहिणीला ह्या ओवाळणीच्या निमित्ताने भावाकडून सन्मानाने भेटवस्तू, साडीचोळी, पैसे अशी अप्रत्यक्षपणे मदत मिळावी, भावा-बहिणीच्या नात्यातील पावित्र्याचे अनोखे आणि मनोरंजन दर्शन सर्वांना पुनःपुन्हा घडावे, त्या नात्याची महती कळावी, ह्यासाठी ‘भाऊबीज’ रुढ झाली. ह्या निमित्ताने भाऊ घरी येणार, माहेरची माणसे येणार म्हणून बहिणीचे मनदेखील उभारी घेते. उत्साहाने तना-मनाला जणू नवसंजीवनीच मिळते.

वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या सणासाठी प्रसंगी तयारीसाठी एका दिवसाची सुट्टी काढा. आठवडाभर आधीपासून थोडी थोडी पूर्वतयारी करा. भाऊबीजेच्या दिवशी मोजकेच चार पदार्थ करा. पण ते आपल्या हाताने करा. भेटवस्तू महागड्याच हव्या असा आग्रह नाही. ‘आपल्या भावाने दिले’ ह्या आनंदाचे व्यावहारिक मोल होऊ शकत नाही. आपल्या माणसांकडून अपेक्षा ठेवावी ती अपार प्रेमाची, पैशाची नव्हे ! एकदा ह्या तऱ्हेने भाऊबीज स्वतः करून बघावी, इतरांना करावयास सांगावी, पुन्हा एकदा संपूर्ण दिवाळीचा सण पूर्वपरंपरा जपत करण्याची गरज आहे, त्याचा प्रारंभ भाऊबीजेने करण्यास हरकत ती कोणती ॽ मात्र तरीही ज्यांना बहीण वा भाऊ नाहीत, वा असूनही काही कारणांनी दुरावा आला असल्यास त्या मंडळींनी अनाथाश्रम, महिलाश्रम अशा ठिकाणी जाऊन वा त्यांना ओवाळणी म्हणून ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत पोहोचविणे हा सद्यःस्थितीनुरुप सर्वोत्तम मार्ग ठरेल ह्यात शंका नाही.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध पुस्तकामधून)