आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेसोबतच ‘भोंडला’ या खेळास सुरुवात होते. ‘भोंडला’ हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.
या खेळात समवयस्क मुली एकत्र येतात. संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे तसेच वर्षन शक्तीचे देखील! म्हणून एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. त्या चित्राभोवती फेर धरून गाणी म्हटली जातात. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’ ह्या गाण्यापासून सुरु होऊन रोज एक-एक गाणे वाढवत दसऱ्याला दहा गाणी म्हटली जातात. सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया या खेळात आनंद साजरा करीत असतात.
ज्या मुलीच्या घरी भोंडला असेल तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. गाणी म्हटल्यावर ‘खिरापत ओळखणे’ हा मोठा मजेशीर कार्यक्रम असतो. त्यामुळे पटकन न ओळखू येणारी खिरापत करणे ह्यात घरातील गृहिणीचे पाककौशल्य पणाला लागते.
‘भोंडला’ प्रमाणेच ‘हादगा’ हा देखील खेळ नवरात्रीच्या दिवसांत अनेक ठिकाणी खेळला जातो. ह्यात मात्र स्त्री-पुरुष दोघेही स्सःभागी होतात.
भोंडल्याचे प्रसिद्ध गाणे:
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी