चैत्र शुक्ल पंचमी ह्या तिथीला इतर अनेक व्रते शास्त्रात सांगितलेली असली तरीही ‘मत्स्यजयंती’ मुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार हा मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले असले तरीही पां. वा. काणे ह्यांनी चैत्र शुक्ल पंचमीला ‘मत्स्यजयंती’ केली जाते असे म्हटले आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूच्या मत्स्यावतारी मूर्तीची पूजा केली जाते. त्यामुळे संकट निवारण होते अशी परंपरागत समजूत आहे.
ह्याच तिथीला पंचमहाभूतांची पूजा तसेच शंख, चक्र, गदा, पद्म आणि पृथ्वी ह्यांच्या आकृत्या काढून त्यांची ‘पंचमूर्तिव्रत’ म्हणून पूजा केली जाते. शिवाय विष्णुप्रतिमेला हिंदोळ्यावर ठेवून झोके देण्याचा विष्णु-दोलोत्सवही काही ठिकाणी करतात. एकूणच ही तिथी लक्ष्मी आणि अधिककरुन विष्णूशी संबंधित अशा व्रतांनी अलंकृत झाली आहे.
सद्यस्थितीः
ह्या सर्व व्रतांमागे कामनापूर्ति, वैभवप्राप्ती अशा फललाभांचे सूचन केलेले असले तरीही ही फळे विष्णुभक्तीपुढे गौण आहेत. मनाला आनंद मिळावा, शांती मिळावी ह्यासाठी ज्याने त्याने आपापल्या इच्छाशक्तिनुरुप ही व्रते ‘स्वान्तःसुखाय’ (आत्मसुखासाठी) केल्याने त्यांचे बिघडणार काहीच नाही. आनंदाचे चार क्षण मात्र गाठीशी बांधले जातील हे निश्चित!