वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे आहे. त्याला ‘वटसावित्री व्रत’ असे देखील म्हटले जाते. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे.
अश्र्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव ‘सावित्री’चं ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वत: वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वरसंशोधनासाठी निघाली. यथाकाळ शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन ह्याच्या सत्यवान नावाच्या मुलाला तिने वरले. (शत्रूंकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहात होता.) सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारदमुनींना अपार दु:ख झाले.कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते. ते विधिलिखित नारदमुनींनी राजाला सांगितले. त्याबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला. मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली.
राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी करून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगिकारली. सासू-सासरे तसेचं पतीची सेवा करण्यात वर्षाचा काळ संपण्यास केवळ चार दिवस उरले. त्यावेळी तिने संकल्पासह ‘त्रिरात्रसावित्री व्रत’ केले. शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला. नेमक्या त्यावेळीच यमदूत त्याचे प्राण हरण करण्यास तेथे पोहचले. मात्र सावित्रीच्या पतीव्रताच्या तेजामुळे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत. सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला. दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला. सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली. शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळविले.
त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर द्युमत्सेनाला दृष्टी आणि त्याचे राज्य परत मिळाले. मुळात हे व्रत द्वादशीपासून करण्याची प्रथा आहे. परंतु आजकालच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते पाळणे अशक्य आहे.
सद्यस्थिती :
एक वटवृक्ष शंभर माणसांना शंभर वर्षे पुरेल एवढा प्राणवायू देतो. अशा ह्या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत. तसेच मिळालेली अशी रोपे सर्व महिलावर्गांनी एकत्रित येऊन आपल्या परिसराजवळून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर १-२-४-८-११ ह्या संख्येने लावून पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा राखून धर्मकार्याबरोबर समाजकार्यही साधल्याचे समाधान मिळवावे. त्या रोपांचे वृक्षांमध्ये रुपांतर होताना आणि उन्हातान्हातून त्याच्या सावलीतून मार्गक्रमण करताना ‘आपली पुढची पिढी आपल्याला नक्की दुवा देईल’ ह्या कल्पनेने देखील जीव किती सुखावतो ते स्वत:चं अनुभविणे अधिक सयुक्तिक ठरावे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर । देवाचिये व्दारी पुस्तकामधून