उत्तर प्रदेशात झूलन यात्रा हा उत्सव म्हणून साजरा होतो. हा उत्सव श्रावण शुक्ल दशमी ते पौर्णिमा असा दीर्घकाळ चालतो.
कशी साजरी केली जाते झूलन यात्रा:
ह्यावेळी राधा-कृष्णांच्या मूर्ती झोपाळ्यावर ठेवून त्याला झोके दिले जातात. त्यावेळी जमलेल्या स्त्रिया एकत्रितपणे कृष्णगीते म्हणतात. ह्या निमित्ताने श्रीमंत मंडळींच्या घरी कृष्णचरित्रपर नाट्यप्रसंगही आयोजिले जातात.
सद्यःस्थिती :
आपल्या कौतुकाच्या देवांचे कोडकौतुक करण्याची भक्तांना कोण आवड! त्याचेच एक सुरेल उदाहरण म्हणजे ही ‘झूलन यात्रा ‘ होय. येथे एक विशेष गोष्ट म्हणजे, ह्या झूलन यात्रेत कृष्णाबरोबर राधा आहे, रुक्मिणीदेवी नाही. भगवान श्रीकृष्णांना सर्व माफ आहे. म्हणूनच हा सुगारिकतेकडे झुकणारा विधी ‘यात्रा’ स्वरूपात साजरा होऊ शकतो. पूर्वी एरवी स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडता येणेही दुष्कर होते. अशावेळी जीवनात काही वेगळे हवे, थोडा तना-मनाला विसावा हवा, म्हणून हे झुलन यात्रेसारखे उपाय अतिशय उपयुक्त ठरतात. उत्तर प्रदेशसारख्या शैक्षणिक-सांस्कृतिक- कौटुंबिक स्तरांवर पाठीमागे असलेल्या राज्यातील स्त्रियांसाठी ते बहुमोल आहे. स्त्रियांना अजूनही समाजाच्या कठोर नियमांनुसारच वागावे लागते. कौटुंबिक ताणतणाव, नैराश्य ह्यापासून काही काळ तरी सुटण्यासाठी विरंगुळ्याचे असे चार क्षण प्रत्येकाला हवे असतात. त्यादृष्टीनेही झूलन यात्रेकडे आपण पाहिले पाहिजे.