दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत
दूर्वागणपती व्रत:
दूर्वागणपती व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते. तशी ती नसल्यास जर दोन्ही दिवशी असेल तर पहिल्या दिवशीची ‘पूर्वविद्धा ‘ चतुर्थी ह्या व्रतासाठी ग्राह्य मानली जाते.
- व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे.
- नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी.
- तिला लाल वस्त्र वाहून षोडशोपचारांनी पूजा करावी.
- त्यावेळी गणेशचतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री, फुले असल्यास उत्तम. मात्र आघाडा, शमी ह्या पत्री असणे आवश्यक आहे.
- आरतीनंतर ‘गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन । व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ।। ‘ अशी प्रार्थना करावी.
- ह्या पूजेमध्ये दूर्वांना विशेष महत्त्व आहे. म्हणून इतर पत्रींप्रमाणेच दूर्वाही अर्पण कराव्या. एरवी गणपतीची नावे घेत सहा दूर्वा वाहाव्या. मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास एकवीस दूर्वा वाहाव्या.
- व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे.
हे व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते. ह्या व्रताच्या उद्यापनाच्यावेळी यवाच्या पिठाचे तुपात तळलेले अठरा मोदक लागतात. ह्या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक गणपतीसमोर ठेवावेत; उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक ब्राह्मणांना द्यावे. मग उरलेले सहा मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. (विशेष म्हणजे ह्या व्रतामध्ये सहा दूर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले आहे.)
सद्यःस्थिती :
पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्तीदेखील चालू शकेल. श्रावणात दूर्वा भरपूर उगवतात. तसेच इतर सर्व पत्री, फुले सहज मिळू शकतात. त्यादेखील महागाईमुळे घेणे परवडत नसेल तर संपूर्ण कुटुंबातील मंडळींनी वा स्नेहीमंडळीनी एकत्र येऊन एखाद्या देवळात अशी पूजा करण्याचे ठरवून तशी ती करावी. सात महिन्यांचे व्रत करावयाचे असल्यास सहा जणांनी एकेका महिन्यात पूजा करून उद्यापनाच्यावेळी एकत्रित पूजा करून एकत्रितच उद्यापन करावे. व्रत फारसे अवघड नाही. त्यामुळे बदल करून ते सहज करता येईल. अठरा मोदक ६ – ६ – ६ असे विभागून उरलेले सहा प्रसाद म्हणून एकेका कुटुंबाला एकेक मोदक ह्याप्रमाणे घेता येईल. एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याची आपल्या श्यामच्या आईची शिकवण आहे. वाटून खाण्यातील आनंद अनुभवण्याची ही सुवर्णसंधी ह्या व्रतामुळे मिळू शकेल. (सहा दूर्वा, सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे तसे खर्चीक वा कठीण नाही. हा विधी मात्र प्रत्येकाने वाटून न घेता वैयक्तिकरीत्या आचरावा.)
कपर्दी विनायक व्रत :
श्रावण शुक्ल चतुर्थीला हे व्रत केले जाते. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताला प्रारंभ करताना त्यावेळी गुरु आणि शुक्राचा अस्त नसावा एवढी एकच काळजी घ्यावी लागते. हे व्रत एकूण चार वेळा करता येते.
- व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे श्रावण शुक्ल तृतीयेला केवळ एकवेळ जेवावे.
- चतुर्थीच्या दिवशी शुचिर्भूत होऊन चंदनाने मंडल काढून त्या मंडलाच्या मध्यभागी अष्टदल काढावे.
- नंतर त्यावर गणेशाची मूर्ती वा प्रतिमा ठेवावी.
- नंतर त्या गणेशप्रतिमेची विधिवत षोडशोपचारे पूजा करून तिला पांढरी फुले आणि हळद लावलेल्या अक्षता वाहाव्या.
- पहिल्या आणि दुसऱ्या वेळी नैवेद्यात तांदळाच्या भाकऱ्या, तिसऱ्या वेळी, तांदळाची खीर आणि चौथ्या वेळी दहीभात असावा.
- या नैवेद्याचे प्रत्येक वेळी आठ भाग करून त्यातील एक भाग गणेशाला अर्पण करून उरलेल्या सात भागांचे केवळ एकट्या व्रतकर्त्याने सेवन करावे.
- हा दंडक कटाक्षपूर्वक पाळावा. एखाद्या बस्ता मूठभर तांदूळ आणि एक कवडी (आताच्या काळात २५ पैसे किंवा ५० पैशांचे एक नाणे) द्यावी.
- व्रताच्या उद्यापनानंतर मूर्ती वा प्रतिमेचे विसर्जन करावे.
सद्यःस्थिती:
ह्या पूजेसाठी घरात नित्य पूजल्या जाणाऱ्या मूर्ती वा प्रतिमेव्यतिरिक्त दुसरी एखादी प्रतिमा वा मूर्ती घ्यावी. शेवटी तिचे विसर्जन न करता एखाद्या कोऱ्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये ती मूर्ती तीन वेळा बुडवून बाहेर काढावी. नंतर नीट पुसून कोरडी करून पूर्ववत तिच्या नेहमीच्या स्थानी ठेवावी.