श्रावण शुक्ल अष्टमी ह्या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. ह्या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे.
- व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती ह्यांची पूजा करावी.
- पूजा झाल्यावर आठ गाठी मारलेला दोरा व्रतकर्त्या स्त्रीने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला बांधावा.
- शेवटी ‘त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। यथा शाखाप्रशाखाभिर्विस्तुतासि महीतले । तथा ममापि सन्तानं देहि त्वमजरामरम् ।। ‘ हा श्लोक म्हणून दूर्वांची प्रार्थना करावी. (ज्यांना संस्कृत श्लोकाचे उच्चारण नीटपणे करणे जमत नसेल त्यांनी ‘हे दूर्वे, तुझे अमर असे नाव आहे. तू देवांकडूनही पूजिली जातेस. (सर्व लहानथोरांना पूजनीय आहेस.)
- मला संपत्ती, सौभाग्य, संतती देऊन सर्वकार्य सिद्धीस जाण्यास साहाय्यकारी हो. असंख्य शाखांनी समृद्ध अशी तू बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस, तशीच सर्वदूर कीर्ती पसरविणारी संतती मला दे. माझी वंशवेलही तुझ्याचसारखी बहरत जावो. अशा अर्थाची प्रार्थना प्राकृतभाषेत केली तरी चालते. शेवटी भावभक्ती महत्त्वाची. पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दूर्वाविषयक कथा ऐकावी.
दूर्वांची कथा:
अमृतासाठी देव आणि दानव एकत्रितपणे समुद्राचे मंथन करीत होते. त्यावेळी भगवान विषांनी मंदार पर्वताला वर उचलून धरले होते. रवीसारखा हा मंदार पर्वत गरगर फिरू लागल्यावर त्याच्या घर्षणामुळे भगवान विष्णूच्या मानेवरील केस झडून ते समुद्रात पडले. समुद्राच्या लाटांबरोबर ते केस किनाऱ्यावर येऊन पडले. त्या केसांच्याच दूर्वा बनल्या. नंतर मंथनामधून जे अमृत निघाले ते ज्या कुंभात भरले होते, तो कुंभ ह्या दूर्वांच्या आसनावर ठेवला गेला. त्यावेळी त्या कलशातील अमृताचे काही थेंब दूर्वांवर सांडले. त्यामुळे दूर्वादेखील अमर झाल्या. (अमरत्वाचा गुण दूर्वांमध्ये आला.) नंतर सर्व देवपत्नींनी आणि मानवाच्या स्त्रियांनीही श्रावण शुक्ल अष्टमीला ह्या दुर्वाची पूजा केली. त्याचे फल म्हणून त्या सर्वांनाच संतती, सौभाग्य, संपत्तीचा लाभ झाला.
दूर्वाष्टमी व्रतास पर्याय:
सप्तमीला उपवास करावा. अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ, पवित्र अशा जमिनीवर दूर्वा उगवलेल्या असतील, अशा ठिकाणी जाऊन त्या दूर्वांवरच शिवलिंग ठेवून त्या दूर्वांची आणि शिवलिंगाची पूजा करावी. शिवपूजेत दूर्वा-रशमी तसेच इतर फुले असणे आवश्यक आहे. शेवटी खोबरे, खजूर आणि महाळुंग ह्यांचा नैवेद्य दाखवावा. अक्षता घातलेल्या दह्याचे अर्घ्य द्यावे. ब्राह्मणांना वेगवेगळ्या फळांची वायने द्यावीत. स्वत: व्रतकर्त्या स्त्रियांनी त्या दिवशी केवळ फलाहार ध्यावा. उद्यापनाच्यावेळी पूजा-हवन करावे. तीळ आणि कणीक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते. असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व स्नेही, नातलग आणि ब्राह्मणांना द्यावे.
सद्यःस्थिती :
आजकाल स्वच्छ जागी दूर्वा असलेले स्थान सापडणे तसे कठीणच! त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने पसरट कुंडीत स्वतःच्या घराच्या हद्दीत अथवा खिडकीतील जागेत दूर्वा वाढविणे अधिक उचित ठरेल. ती कुंडी पूजेसाठी घरात योग्य जागी ठेवून पूजा झाल्यावर पूर्वस्थानी ठेवता येईल. त्याचप्रमाणे मनासारखी पूजाही करता येईल. पूर्वी भूमीवर उगवलेल्या जागच्या दूर्वाच ता व्रतासाठी योग्य मानल्या जात. परंतु आता ते जवळपास अशक्य असल्यामुळे कालानुरूप थोडीशी परंतु योग्य अशी तडजोड तसेच बदल करावयास हवा. शिवाय अशा आपल्या देखरेखीखाली उगवलेल्या दूर्वा ह्या कोणाचाही पाय न लागलेल्या शुद्ध, स्वच्छ असल्याने चांगल्या दूर्वा पूजेला मिळाल्याचे मनालाही समाधान लाभेल. कुंडीत माती असतेच. त्यामुळे मातीत मुळे घट्ट रुजलेल्या दूर्वाच उपलब्ध होत असल्याने ही पूजा शास्त्रानुसारच होणार असल्याने ह्या पूजेतील कुठल्याही नियम-विधीला बाधा येऊ शकत नाही.
(बऱ्याच ठिकाणी हे दूर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते.)