वरदलक्ष्मी व्रत

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 4, 2017 in   Festivalsश्रावणमास

श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, असा ह्या व्रताचा विधी आहे.

वरदलक्ष्मी व्रत कथा :


एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होती. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला ह्याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला ‘तू कुष्ठरोगी होशील’ – असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वतीने ‘एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला.

श्रावणी शुक्रवार : जरा जिवंतिका पूजन

सद्यःस्थिती :


आता कोणी रोगमुक्तीसाठी धार्मिक विधी वा व्रत करील असे वाटत नाही. परंतु तरीही एक पारंपरिक व्रत म्हणून अनेक स्त्रिया हे व्रत आजही त्यात खंड पडू नये, एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात. घराबाहेर मंडप वगैरे घालून पूजा करणेही आजच्या जागेच्या अनुपलब्धीमुळे शक्य नाही. त्यामुळे ही पूजा देवळात वा घरी केली जाते.