विनायक संकष्ट चतुर्थी व्रत-श्रावण कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. दिवसभराचा उपवास करु शकता. सायंकाळी स्नान करुन शुचिर्भूत होऊन मग नेहमीप्रमाणे श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत केले होते.
अधिक वाचा: दूर्वाष्ट्मी व्रत
सद्य स्थिती:
गेल्या पंचवीस वर्षांपासून संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याकडे खूप जणांचा विशेष कल असून तो दरवर्षी सातत्याने वाढताना दिसत आहे, ही एक आनंददायी बाब आहे. कितीही दगदग, धावपळ असली तरीही गणेशभक्त हा उपवास आणि गणपतीची पूजा, नैवैद्य हे सारे अगदी मनापासून करताना दिसतात. अशा गणेशभक्तांना श्रावणातील संकष्टीला गणपतीच्या ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करुन लाडवांचा नैवैद्य दाखविणे जड जाणार नाही ह्याबद्दल शंका नाही. विशिष्ट दिवशी विशिष्ट तऱ्हेने असलेली पूजा करण्यात उलट अधिक आनंद होतो असाच अनुभव प्रत्येकाला ह्या व्रताच्या आचरणातून मिळावा.