श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 25, 2017 in   श्रावणमास

श्रावणी मंगळवार :


श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो.

श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवार सकाळी चौरंगाला चार बाजूंना केळीचे खांब बांधून मखर करावे. ते मखर उपलब्ध होतील त्या पानाफुलांनी सजवावे. नंतर चौरंगावर गौरीच्या मूर्तीची स्थापना करावी. चौरंगाशेजारी पाटा-वरवंटा ठेवावा. व्रतकर्त्या नवविवाहित मुलीने स्नान करून चांगली साडी नेसून अलंकार घालून प्रारभी संकल्प करून मग गौरीची षोडशोपचारी पूजा करावी. यथाविधी पूजा करून मग प्रथम पूजा करणाऱ्या पुरोहितास सौभाग्यवायन दिले जाते . नंतर सोळा वातींच्या दिव्याने किंवा सोळा निरांजने ताटात घेऊन त्यानी देवीची मंगलारती करावी. आरतीनंतर त्या व्रतकर्तीने आणि इतर स्त्रियांनीही हातात अक्षता घेऊन मंगळागौरीची कथा ऐकण्यासाठी बसावे. असा आहे श्रावणी मंगळवार

मंगळागौरीची कथा:


ही कथा साधारण सत्यनारायण कथेप्रमाणेच आहे. साधूवाण्याप्रमाणे इथेही एक धनपाल वाणी आहे हे विशेष! (काही ठिकाणी धनपाल ब्राह्मण असा उल्लेख आहे.) त्या कथेचा सारांश असा की धनपाल वाण्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येई. पण अपत्यहीन वाण्याकडची भिक्षा नाकारून तसाच परत जाई. एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली. त्यामुळे गोसावी रागावला. परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचविला. त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले. पार्वतीमातेला त्याने आपली व्यथा सांगितली. पार्वतीमातेने त्याला दीर्घायुषी आंधळा अथवा गुणी पण अल्पायुषी ह्या दोघापैकी कसा मुलगा हवा ते विचारले. त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सागितले. मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खावयास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला. तिने तो खाल्ला.gowri pooja items | gowri pooja wedding | श्रावणी मंगळवार

पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव ‘शिव’ ठेवले. यथाकाल त्याची मुंज केली. तो दहा वर्षांचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या. तो ससेमिरा चुकविण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशीयात्रेला पाठविले. वाटेत एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडण होत होते. ते मामांनी ऐकले. त्यातील एका मुलीने सुशीला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकविला. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, ‘माझ्या आईने गौरीव्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही. ‘ ते ऐकून शिवाच्या मामाने ह्या मुलीशी शिवाचे लग्न करून द्यायचे असे मनाशी ठरविले. पुढे यथाकाल विविध अडचणींचा परिहार होत होत त्यांचा विवाह, वियोग आणि पुनर्मिलन होते.

काहीशी सत्यनारायण आणि वटपौर्णिमेच्या कथानकाशी मिळतीजुळती ही कथा मंगलागौरीच्या पूजेच्या पुस्तिकेत सविस्तरपणे दिलेली असते. तिचे वाचन झाल्यावर सर्व स्त्रियांनी हातातील तांदूळ गौरीला वाहून तिला नमस्कार करावा. नंतर मौन धारण करून जेवावे. रात्रौ उपवासाचे, फराळाचे पदार्थ खाऊन विविध गाणी आणि खेळ खेळावेत. एकमेकींना हळदकुंकू द्यावे-ध्यावे. पाच अथवा सात वर्षांनी उद्यापन करावे ह्या सर्व पूजेमध्ये चण्याच्या डाळीचे, धण्याचे, जिऱ्याचे आणि तांदळाचे प्रत्येकी सोळा दाणे देवीला वाहिले जातात तसेच सोळा पत्रींबरोबर बेलाची पाच पाने वाहिली जातात. दुसऱ्या दिवशी अग्निस्थापना केल्यानंतर तीळ, खीर आणि तूप ह्यांचा होम करावा. सुपामध्ये साडीचोळी, गोड पदार्थ आणि फळे घालून ते वायन मुलीने आईला, आई नसल्यास माहेरच्या दुसऱ्या सवाष्णीला द्यावे. त्यानंतर गौरीचे विसर्जन करावे.

सद्य: स्थिती


नवविवाहितांना एकत्रितपणे पूजा करण्यासाठी बोलाविणे आणि मंगळागौर जागविणे ही काळाची गरज आहे. सामाजातील दुरावा, दरी नाहीशी होण्यास त्यामुळे बरीच मदत होईल. आता काळ बदलला आहे. त्यामुळे ह्या व्रताची जी कहाणी आहे ती व्रतकर्त्या मुलीलाही काहीशी न पटणारी, अंधश्रद्धेकडे झुकणारी वाटू शकेल.

श्रद्धा कधीही चांगलीच, परंतु अंधश्रद्धादेखील तेवढीच वाईट! त्यामुळे शक्यतो पूर्वापार चालत आलेली एक कहाणी ह्या दृष्टीनेच ह्या कहाणीचे महत्त्व मानावे.

पतीला-कुटुंबाला सौख्यदायी ठरणारे हे व्रत म्हणून या व्रताकडे बघितले जावे. ज्यांना ह्या पूजेसाठी बोलाविले जाईल त्यांच्याशीही विविध खेळांमधील सहभागातून अधिक जवळीक निर्माण होऊ शकेल. म्हणूनच ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने गणपतीप्रमाणे शेजारी, सोसायटीतील मंडळी, कार्यालयातील सहकारी महिलावर्ग, रोज कामाला येणाऱ्या बाई, त्यांच्या घरच्या लेकीसुना ह्या साऱ्यांनाही न विसरता आग्रहाने बोलाविले जावे. मुळात ह्या मंगळागौरीच्या कहाणीतील काही भाग हा खोडसाळपणे नंतर कोणीतरी घातलेला आहे. तो वगळून ह्या व्रताची पुस्तिका नव्याने निघणे आवश्यक आहे.