जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.
महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी.
ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.
Pingback: वरदलक्ष्मी व्रत | श्रावणी शुक्रवार | ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | कालनिर्णय