अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! कारागीर या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतो. चातुर्मासासाठी लागणाऱ्या भाजीचे बी खेड्यापाड्यातील स्त्रिया या दिवसात परसातील वाफ्यात पेरतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. ब्राह्मणाला या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभते, असे विष्णूपुराणात म्हटले आहे. सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे.
व्यापारी व अक्षय्य पुण्य
एक सदाचरणी आणि दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्देवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली. दारिद्र्य आले. त्याला कुणीतरी अक्षय्य तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला. त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. त्याने खूप यज्ञ केले. राज्यसुख उपभोगले. पण अक्षय्य तृतीयेला त्याने केलेले पुण्य क्षय पावले नाही, अक्षय्य टिकले, अशी कथा भविष्यपुराणात आहे.
चैत्र शुद्ध तृतीयेला बसविलेल्या गौरीचे विसर्जन या दिवशी केले जाते. ” अक्षतृतीएं दिशी । विधेश्वरापाशी, बहुत मारिले तापसी, शिशुपाळे ” असा उल्लेख शिशुपाल वध या महानुभाव पंथाच्या ग्रंथात सापडतो.या तिथीला केलेले दान अक्षय्य राहाते म्हणून या तिथीस ‘ अक्षय्य तृतीया ‘ असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजाही केली जाते आणि ती अक्षय्यी फलदायिनी असते, असेही सांगतात.
अक्षय्य तृतीयेस दान करावे असा जो संकेत आणि परंपरा आपल्याकडे पाळली जाते आणि या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणांतरी वर्णिल्या आहेत, त्या माणसाच्या मनात दान करण्याची, त्यागाची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितल्या आहेत. वर्षभरात एका तिथीस केलेले दान अक्षय्य टिकते ही श्रद्धा जनमानसात रुजली तर निदान त्या तिथीला तरी माणसे दान करतील आणि एकदा दानाची प्रवृत्ती निर्माण झाली की देण्यातला आनंदही दात्यांना कळेल आणि अशा प्रकारे समाजात दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची, दुसऱ्याला काही देण्याची आणि त्यासाठी त्याग करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल असा यामागे हेतू असावा. या सणाच्या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आढळतो.