पूर्वी सर्व देवांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याच विनंतीवरून गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या अंगाची प्रचंड आग आग होऊ लागली. गणपतीने ताडले की, हा आपल्या उदरातील अग्नी त्रिभुवनही जाळून टाकील, म्हणून मग गणपतीला जाणवणारी तीव्र दाहकता शांत करण्यासाठी कोणी चंद्र, कोणी कमळ, कोणी पाणी अशा थंड उपचाराचा वर्षाव केला पण त्यांचा काहीच उपयोग होईना. तेव्हा ऐंशी हजार ऋषिमुनींनी प्रत्येकी २१ दूर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या. तेव्हा कुठे गणपतीच्या जिवाची तगमग थांबली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा आवडू लागल्या.
तसेच मिथिला नगरीत विरोचूना-त्रिशिरस हे दाम्पत्य अतिशय गरीब स्थितीत राहत होते. त्यांच्या गणेशोपासनेत कधीही खंड पडला नाही. एकदा गणपती त्याच्याकडे ऐनवेळी जेवावयास गेला पण घरात गणपतीला वाहून उरलेल्या दूर्वेशिवाय दुसरे काहीच शिल्लक नव्हते मग त्या दाम्पत्याने तो दूर्वांकुर गणपतीला भक्तीपूर्वक अर्पण केला गणपती तो दूर्वांकुर खाऊन तृप्त झाला आणि त्याने त्या दाम्पत्याला आपले खरे स्वरूप दाखविले.
या दोन्ही गोष्टी आपण पूर्वीच माहिती करून घेतल्या आहेत.
गणपतीभक्त कौंडिण्य :
स्थावर नामक नगरात कौंडिण्य नावाचा एक गणपतीभक्त राहत असे. तो रोज गणेशाची भक्तीपूर्वक पूजा करून त्याला दूर्वा वाहत असे. एक दिवस त्याच्या आश्रया नामक पत्नीने त्याला ‘ रोज एवढे भाराभर गवत’ गणपतीला वाहण्याचे कारण विचारले त्या वेळी कौंडिण्याने तिला दूर्वामाहात्म्य सांगणाऱ्या वरील दोन्ही गोष्टी सांगितल्या. पण आश्रया त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. तेव्हा तिला दूर्वेची महती कळावी म्हणून कौंडिण्याने एक दुर्वांकूर तिच्याकडे दिला आणि इंद्राकडे जाऊन त्या दूर्वांकुराएवढे सोने तोलून आणण्यास सांगितले
त्याप्रमाणे आश्रया इंद्राकडे गेली. तिने इंद्राकडे त्या दूर्वांकुराच्या वजनाएवढ्या सोन्याची मागणी केली. इंद्राने तिला कुबेराकडे पाठविले कुबेराला जरा आश्चर्यच वाटले. पण आश्रया मागणीप्रमाणे त्याने दूर्वांकुर तोलण्यास सुरुवात केली आणि अहो आश्चर्यम् । कुबेराचे सारे भांडार दुसऱ्या पारड्यात घालूनही दूर्वांकुराचे पारडे जराही हलेना तेव्हा मग कुबेराने स्वतःला आणि आपल्या नगरीलाच पारड्यात घातले पण व्यर्थ ! त्याने ब्रह्मादिकांचा धावा केला, पण तोही फोल ठरला.
तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे सत्य जाणल्यावर आश्रयाचा पतीच्या बोलण्यावर विश्वास बसला तिला दुर्वाचे महत्त्व कळले. तिने घरी येऊन गणेशाची उपासना केली त्यायोगे तिला सद्गती लाभली असे हे दूर्वांचे माहात्म्य!
दूर्वामाहात्म्याच्या आणखीही काही कथा श्रीगणेश पुराणात सांगितलेल्या आहेत. येथे आपल्याला रुक्मिणीने एका तुळसीदलाने कृष्णाला तोलते होते ती कथा आठवते. कथाविषय वेगळे असले तरी तिथे तुळशीचे आणि इथे दूर्वांचे महत्त्व भक्तांना या कथातून कळते एवढे मात्र खरे.