गुढीपाडवा व कथा

Published by Kalnirnay on   March 27, 2017 in   Festivals

गुढी कशी उभारावी?

  1. प्रत्येक नव्या संवत्सराचे स्वागत करताना म्हणजे नव्या वर्षाचा आरंभ करताना घराबाहेर पण दारातच बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून त्याच्यावर एक रेशमी वस्त्र (जमल्यास पीतांबर किंवा एक-दोन हात (वार) लांबीचे बाजारात मिळणारे ‘पामरी’ या नावाचे रेशमी वस्त्र) अगदीच काही नाही तरी नवीन रेशमी साडी निऱ्या काढून बांधावी.
  2. त्यावर चांदी, तांबे, पितळ यापैकी कोणत्याही एका धातूचे भांडे उपडी ठेवून त्याला फुलांची एक माळ, साखरेच्या बत्ताशांची एक माळ घालून तसेच कडुनिंबाची एक उहाळी बांधून ही काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय.
  3. ह्या गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात. अशी गुढी उभारून झाली की, तिला गंध-फुले वाहून तिची पूजा केली जाते, नैवेद्य दाखविला जातो.
  4. पूजा करताना प्रथम ‘ब्रह्मध्वजाय नमः’ असे म्हणून मग ‘ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।’ हा मंत्र म्हणावा.

सध्याच्या परिस्थितीत दारासमोर गुढी उभारण्यात अडचण येईल, असे वाटत नाही. जे लोक मुंबईसारख्या मोठ्या शहरात चाळीत राहातात त्यांच्या घराची प्रवेशव्दारे मधल्या बोळातून असतात. असे लोक खिडकीत गुढी उभारतात. ते तसे चालू ठेवण्यास हरकत नाही. गुढी हे आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे, याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि सन्मानाने उतरविली जावी. आपला दिवस सूर्योद्यापासून सुरु होतो म्हणून गुढी सूर्योद्याच्यावेळीच उभारली जावी तसेच ती सूर्यास्ताच्या साधारण १० मिनिटे आधी उतरवावी. आपल्याकडे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट राष्ट्रीय ध्वज असाच सूर्योद्याच्यावेळी उभारुन संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सन्मानाने उतरविला जातो हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते.

सध्या धर्मजागृतीचे वारे वाहू लागले आहेत त्यामुळे सामुदायिक रीतीने पारंपारिक वेशभूषा करुन हजारोंच्या संख्येने मंडळी प्रभातफेरीसारखी गुढीपाडव्याला मिरवणूक काढतात हे योग्यच आहे. त्यात अधिकाधिक मंडळींनी सहभाग घेतला पाहिजे.

पंचांग पूजन

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावीच; शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असे. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करुन संवत्सर फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडधोड करणे, तो दिवस आनंदात घालविणे असा रिवाज आहे. हा दिवस आनंदात घालविल्यानंतर संपूर्ण वर्ष आनंदी जाते अशी त्यामागची श्रद्धा आहे. आपण मराठी लोकांनी हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभमूहूर्त मानला जातो. साखरपुडा, विवाह, मुंज, गृहप्रवेश अशा सर्व मंगलकार्यांसाठी हा दिवस प्रशस्त समजतात.

आपल्याकडे प्रत्येक वर्षाला एक नाव आहे. प्रभाव, विभव, शुक्त, प्रमोद अशी ही साठ नावे असून, ही नावे पुन : पुन्हा त्याच क्रमाने येत असतात. म्हणजे पहिले संवत्सर प्रभव आणि साठावे क्षय. तर क्षय हे साठावे नाव झाल्यानंतर पुन्हा पहिले प्रभव. अशा रीतीने हे संवत्सरनामचक्र पुन : पुन्हा फिरत असते. सांप्रत गुढीपाडव्यापासून या चक्रातील बत्तीसावे ‘विलंबीनाम’ नावाचे संवत्सर गुढीपाडवा सणास सुरू होत आहे.

नारद मुनीना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्यापताका उभारून आनंदोत्सव साजरा केला, अशी कला आहे. त्या वेळेपासूनच या नवीन संवत्सराचे स्वागत करताना घराबाहेर एक उंच गुढी आकाशात उभारण्याची परंपरा सुरू झाली. बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून तिच्यावर रेशमी वस्त्र आणि चांदीचे, तांब्याचे वा पितळेचे भांडे उपडे ठेवून तिला फुले वाहून काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे जग निर्माण केले आणि कालगणनाही सुरू केली, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात शेवग्याची लांब काठी आणून तिला तेल लावून पाण्याने न्हाऊ घालावयाचे आणि त्या काठीवर गुढी उभारावयाची अशीही प्रथा असल्याचे सांगतात.

महाभारतात एक कथा आहे. चेदी राजा वसू जंगलात गेला आणि त्याने कठोर तप आरंभिले देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसूला यशोदायी अशी वैजयंतीमाला दिली, तसेच अखंड भ्रमंतीसाठी एक विमान आणि राज्यकारभार सुरू करण्यासाठी राजदंडही दिला या दैवी प्रसादाने वसू आनंदित झाला आणि भारावूनही गेला. त्याने त्या राजदंडाच्या एका टोकाला जरीचे रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सोन्याचा चंबू बसविला आणि त्याची पूजा केली हेच आजच्या गुढीचे मूळ स्वरूप म्हटले पाहिजे. हा वर्षप्रतिपदेचा उत्सव नव्या वर्षाचा प्रारंभ करणारा असल्यामुळे हा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष आनंदात जाते, अशी समजूत आहे. आपली प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना याच दिवसापासून सुरू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येस चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात. आपण दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापासून मानतो.

ख्रिस्ती कालगणना दिवसाचा प्रारंभ मध्यरात्री बारा वाजल्यापासून मानते. तर इस्लामी कालगणना दिवसाचा प्रारंभ सायंकाळपासून मानते. आपला दिवस हा सूर्याच्या उदयाबरोबर सुरू होतो. त्यामुळे आपल्या दिवस प्रारंभास एक नैसर्गिक अधिष्ठान मिळालेले आहे. आपल्याकडे वाराच्या सुरुवातीला त्या वाराच्या देवतेचा पहिला होरा असतो. होरा म्हणजे ६० मिनिटे म्हणजे अडीच घटका, प्रत्येक घटका २४ मिनिटांची म्हणूनच अडीच घटकांचा १ तास. या तासाला इंग्रजीत ‘ HOUR ‘ म्हणतात? तो शब्द ‘ होरा ‘ वरूनच आलेला आहे. होरा म्हणजे अहोरात्र या चार अक्षरी शब्दातील मधली दोन अक्षरे. हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या आपल्या कालगणनेने खगोलीय चंद्र-सूर्याच्या स्थितीची सूक्ष्मता अधिकाधिक सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा एक प्रकारे आपल्या अभिमानाचा विषय आहे.

शालिवाहन राजा व शक 

या दिवसापासून ज्याचा शक सुरू होतो, तो राजा शालिवाहन हा पैठण येथे कुंभाराच्या वस्तीत वाढला. त्याने आक्रमक शकांना पराभूत केले आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने जी नवी कालगणना रूढ केली त्याला शक असेच नाव दिले.  शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. हा शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता. त्याचा शक आसेतुहिमाचल सर्वत्र चालतो. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत. शालिवाहन शकाच्या प्रारंभीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने किष्किंधावासीयांना वालीच्या छळातून मुक्त केले असे एक कथा सांगते. तर दुसऱ्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. एक गोष्ट खरी, प्रभू रामचंद्रांची जी रूढ आरती आहे त्यात  आनंदाची गुढी घेऊनिया आला असा एक संदर्भ आहे? या गुढीचा गुढीपाडव्याशी काही संबंध असेल काय?

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)