पौष मासातील विशेष महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती! मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. ही भारतात सर्वत्र आपापल्या परीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस! स्त्रिया ह्या दिवशी दिवाळीसारखेच अभ्यंगस्नान करुन साजशृंगार करतात. विविध भाज्या एकत्रित करुन (ह्या भाजीत तिळाचा वापर आवश्यक असतो) एक भाजी केली जाते.
ही ‘भोगीची भाजी’, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा देवाला खास नैवैद्य दाखविला जातो. ह्या दिवशी सासरी असलेल्या मुलींना माहेरी जेवावयास बोलाविले जाते.
भोगीची भाजी बनविण्यासाठी –
साहित्य –
१ वाटी मटार,
१ वाटी वाल पापडी,
१ वाटी भिजवलेले शेंगदाणे,
३ वांगी, २ बटाटे, २ शेवग्याच्या शेंगा, १ गाजर, २ कांदे,
अर्धी वाटी चिंचेचा कोळ, गुळ, २ लहान चमचे तीळ, अर्धी वाटी सुके खोबरे,
१ चमचा गरम मसाला, हिंग, जिरे, हळद, १ चमचा मिक्स मसाला, १ चमचा तेल,
मीठ, कोथिंबीर (सजावटीसाठी).
(तीळ व सुके खोबरे तव्यावर थोडया तेलात भाजून मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटावे.)
कृती – कढईमध्ये तेलाची फोडणी करावी. त्यात जिरे, हिंग घालावे. नंतर त्यात सुके खोबरे व तीळ यांचे मिश्रण घालावे. चांगले परतून त्यात कांदा बारीक चिरून घालावा. कांदा चांगला लालसर झाला की, त्यात भिजवलेले शेंगदाणे, मटारचे दाणे, वाल पापडी, बटाटे, गाजराचे मोठे तुकडे, वांग्याचे मोठे तुकडे, शेंगा घालाव्यात. वरून गुळ, चिंचेचा कोळ, मिक्स मसाला, गरम मसाला, हळद, मीठ घालावे. चांगले शिजू द्यावे. पंधरा मिनिटांनी वरून कोथिंबीर पसरून एक वाफ येऊ द्यावी.