नळीची पातळ भाजी | वेशाली कोरे | रानभाज्या

Published by वेशाली कोरे on   August 5, 2021 in   रानभाज्या

नळी ची पातळ भाजी

मराठी नाव : नळी

इंग्रजी नाव : Water Spinach

शास्त्रीय नाव : Ipomoea Aquatica

आढळ : पाणथळ, दलदलीच्या तसेच तलावांच्या काठी आढळते.

कालावधी : जून ते सप्टेंबर

वर्णन : जमिनीवर पसरत जाणारी ही वेल आहे. चिखलावर किंवा पाण्यावर तरंगण्यासाठी याची खोडे नाजूक आणि पोकळ असतात. म्हणूनच या भाजीला नळीची भाजी म्हणतात. या भाजीची जुडी देठाच्या बाजूने पाहिली असता नळीसारखी याची देठे स्पष्ट दिसतात. पाने साधी, एकाआड एक लांबट त्रिकोणाकृती असतात.

साहित्य : १ जुडी नळीची भाजी, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे बेसन, ८ ते १० पाकळ्या लसूण, १/२ वाटी आंबट ताक, २ चमचे फोडणीसाठी तेल, १ छोटा चमचा मोहरी, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, चवीनुसार मीठ-साखर.

कृती : ही भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. जाड बुडाच्या पातेलीत चिरलेली भाजी, वाटीभर पाणी व उभ्या चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून शिजवून घ्यावी. भाजी गार झाल्यावर अर्धी वाटी ताकात बेसन मिसळून भाजीत घालावे. आता भाजीला चांगली उकळी आणून बेसन शिजवून घ्यावे. जास्त घट्ट वाटले तर थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, ठेचलेली लसूण, हळद, तिखट या क्रमाने घालावे. शिजलेल्या भाजीवर ही फोडणी ओतावी आणि गरमागरम सर्व्ह करावे.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– वेशाली कोरे