आघाड्याचे पराठे | रिझा गडकरी | रानभाज्या

Published by रिझा गडकरी on   August 3, 2021 in   रानभाज्या

आघाड्याचे पराठे

मराठी नाव :  आघाडा

इंग्रजी नाव :  Pricky Chaf Flower

शास्त्रीय नाव :  Achyranthes arpera

आढळ :  ओसाड जमीन, शेत, रस्त्याच्या कडेने आढळते.

कालावधी :  जून ते सप्टेंबर

वर्णन :  गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ पत्रींपैकी एक असल्याने आघाडा ही परिचयाची वनस्पती आहे. आघाडा हे एक मीटरभर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने साधी, लंबगोलाकार फिकट हिरव्या रंगाची असतात. पानांची मागील बाजू पांढरट राखाडी असते. आघाड्याची कोवळी पाने भाजी करण्यासाठी वापरतात.

साहित्य :  १ जुडी आघाडा, २ मध्यम वाट्या गव्हाचे पीठ, १/४ वाटी बेसन, प्रत्येकी १ छोटा चमचा हळद, तिखट, ओवा, १ छोटा चमचा धणे, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, २ चमचे साजूक तूप.

कृती :  आघाड्याची पाने धुऊन बारीक कापून घ्यावीत. गव्हाच्या पिठात बेसन, हळद, तिखट, मीठ, ओवा, धणे-जिरे पावडर आणि चिरलेली भाजी घालून चांगले मळून घ्यावे. हे पीठ घट्ट मळावे. दहा मिनिटे पीठ भिजू द्यावे आणि मग पराठे करायला घ्यावे. गोल, चौकोनी, त्रिकोणी असे आपल्याला हव्या त्या आकाराचे पराठे लाटावेत. तव्यावर साजूक तूप सोडून दोन्ही बाजू मंद आचेवर खमंग भाजाव्यात. दही, सॉस किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत खायला द्यावे.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रिझा गडकरी