लोत ची भाजी
मराठी नाव : लोत, सुरणाचा पाला
इंग्रजी नाव : Elephant Foot Yam
शास्त्रीय नाव : Amorphophallus Paeoniifolius
आढळ : ओसाड माळराने, जंगले.
कालावधी : जून ते ऑगस्ट
वर्णन : लोत किंवा सुरणाची पाने ही मध्यम आकाराची, दातेरी कडा असलेली असतात. लांबट असलेल्या या हिरव्यागार पानांवरील शिरा ठसठशीतपणे दिसतात. पानांची वरची बाजू गुळगुळीत असून खालची बाजू त्यावर मऊ लव असल्याने मखमली असते. पानांचे देठ लांब असून वेलीसारख्या नाजूक खोडाला ही पाने जोडलेली असतात.
टीप : भाजी चिरताना हाताला तेल लावून घ्यावे. तसेच भाजी करताना कोकम, चिंच यांचा वापर करावा म्हणजे घशाला खवखवणार नाही.
साहित्य : १ जुडी लोतची भाजी, कांदा, ८ ते १० लसूण पाकळ्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ चमचे चिंचेचा कोळ, २ चमचे फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ, आवडीनुसार खोवलेले खोबरे.
कृती : लोतची पाने स्वच्छ धुऊन चिरावीत. चिरताना हाताला तेल लावावे म्हणजे खाजणार नाही. तेलाची फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेली लसूण आणि नंतर कांदा घालून परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात भाजी घालून शिजवून घ्यावी. शेवटी चिंचेचा कोळ, मीठ आणि खोवलेले खोबरे घालून एक वाफ येऊ द्यावी.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मानसी गावकर