कुरडूच्या वड्या
मराठी नाव : कुरडू
इंग्रजी नाव : Silver Cock’s Comb
शास्त्रीय नाव : Celosia Argentea
आढळ : शेतात, ओसाड माळरानावर सर्वत्र आढळते.
कालावधी : जून ते सप्टेंबर
वर्णन : कुरडू हे मुख्यतः शेतात वाढणारे तण आहे. याला पांढरट गुलाबी रंगाची तुरेदार फुले येतात. या फुलांवरूनच या झाडाचे इंग्रजी नाव ष्टश्ष्द्मज्ह्य ष्टश्द्वड्ढ असे पडले आहे. तोरणांमध्ये या फुलांचा वापर करतात. साधारणतः दीड ते दोन फूट वाढणारे हे झुडूप आहे. याच्या फांद्या आणि खोड गोलाकार असते. पाने साधी, देठ विरहित आणि तळाकडे निमुळती होत जाणारी असतात. फुले येण्यापूर्वी कुरडूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.बाजारातही जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांत ही भाजी सर्रास उपलब्ध होते.
साहित्य : २ वाट्या कुरडूची चिरलेली भाजी, १ वाटी चणाडाळ, ४ हिरव्या मिरच्या, १ इंच तुकडा आले, ८ ते १० पाकळ्या लसूण, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा हळद, तिखट, १/२ वाटी नाचणीचे पीठ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : कुरडूची पाने स्वच्छ धुवून बारीक कापावी. चण्याची डाळ भिजवून वाटावी. हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे वाटून घ्यावे. चिरलेली भाजी, वाटलेली डाळ, वाटलेला हिरवा मसाला, नाचणीचे पीठ, मीठ एकत्र मळून घ्यावे. त्याचे उंडे बनवून घ्यावेत. चाळणी बसेल अशी पातेली घेऊन त्यात पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर त्या पातेल्यावर तेल लावून चाळण ठेवावी. त्या चाळणीत हे उंडे ठेवून साधारणतः पंधरा मिनिटे वाफवून घ्यावेत. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापून तळाव्यात.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
– रेखा पाटील