सोपी बिर्याणी बनविण्यासाठी
- साहित्य :
१ वाटी बासमती तांदूळ, २ उभे कापलेले कांदे, २ टीस्पून उभे कापलेले आले-लसूण, ७ ते ८ कोलंबी, ७ ते ८ घोळ किंवा पापलेटचे किंवा इतर कोणत्याही माशाचे चौकोनी तुकडे किंवा ७ ते ८ बोनलेस चिकनचे चौकोनी तुकडे, आवडीप्रमाणे कोथिंबीर, पुदिना (जास्त), १ बटाटा, १ टोमॅटो, चिमूटभर गरम मसाला, १/४ टीस्पून लाल तिखट, ४ ते ५ टीस्पून तेल, मीठ सोपी बिर्याणी साठी.
- कृती :
तांदळाच्या दुप्पट पाणी उकळवून घ्यावे‧ त्यात चिमूटभर गरम मसाला, थोडे मीठ टाकून तांदूळ धुऊन टाकावे व ते भांडे त्यापेक्षा मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात ठेवावे‧ वरून झाकण ठेवावे‧ गॅस लहान करावा‧ दहा ते बारा मिनिटांत भात तयार होईल‧ एका कढईत तेल टाकून त्यात कांदा टाकावा‧ गुलाबी रंगावर तळून घ्यावा‧ त्याच तेलात बटाट्याचे उभे काप तळून घ्यावे‧ जास्तीचे तेल काढून टाकावे‧ दोन ते तीन टीस्पून तेलात आले-लसूण टाकावे‧ थोडे लाल झाल्यावर थोडा पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरेपूड टाकावी‧ चांगले एकत्र करून माशाचे किंवा चिकनचे तुकडे टाकावे‧ मीठ टाकून परतवून घ्यावे‧ थोडे पाणी टाकून झाकण ठेवावे‧ गॅस लहान करावा‧ नंतर झाकण काढून चिकन शिजल्यास गॅस मोठा करून मसाला थोडा सुका करावा‧ गॅस लहान करून त्यात तयार भात टाकावा‧ एकत्र करून तळलेले बटाटे, टोमॅटो उभे कापून टाकावे‧ एकत्र करून कांदा, पुदिना, कोथिंबीर टाकावी व एकत्र करावे.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
उमा अमृते