बटरस्कॉच लाडू
कॅरॅमलसाठी साहित्य : ४ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे काजू (बारीक चिरून), १ मोठा चमचा लोणी, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स.
पनीरसाठी साहित्य : २ कप दूध, २ लहान चमचे लिंबाचा रस.
लाडूसाठी साहित्य : १०० ग्रॅम खवा, १२५ ग्रॅम साखर, २ ते ३ थेंब बटरस्कॉच इसेन्स, सजावटीसाठी केशराच्या काड्या, १० ते १२ बदामाचे काप.
कृती : एका परातीला तूप लावून घ्या. कॅरॅमलसाठी नॉनस्टिक पॅनमध्ये साखर मंद आचेवर गरम करा. सतत ढवळत राहा. साखर वितळून हलका तपकिरी रंग आला (करपू देऊ नये), की त्यात लोणी घाला. हे मिश्रण एकत्र करून मग त्यात काजू व इसेन्स घाला. आता गॅस बंद करा व हे मिश्रण तूप लावलेल्या परातीत काढा. गार झाले की कडक झालेले कॅरॅमल काढून खलबत्त्यात किंवा लाटण्याने ठेचा आणि भरडसर पावडर तयार करा. पनीर बनविण्यासाठी दूध गरम करून त्यात लिंबाचा रस घालून दूध फाडा. फाटलेले दूध गाळून पनीर काढून घ्या. तयार पनीर हलक्या हाताने धुऊन घ्या म्हणजे लिंबाची चव आणि वास निघून जाईल. हे पनीर आता सुती कपड्यात घालून घट्ट पिळा. लाडूसाठी मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅनमध्ये आधी साखर घ्या. त्यात साखर भिजेल इतपत थोडेसे पाणी घाला. साखर विरघळली की त्यात खवा मोकळा करून घाला. मंद आचेवर ढवळत राहा. दोन ते तीन मिनिटांनी पनीर आणि इसेन्स घालून ढवळत राहा. मिश्रण गोळा होत आले की त्यात तयार कॅरॅमलचा चुरा, केशर घालून एकत्र करा. गॅस बंद करा. मिश्रण एका परातीत काढा. थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून लाडू वळा. वरून बदामाचे काप व केशर काड्या घालून सजवा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सायली पवार, ठाणे (पश्चिम)