अॅपल-ड्रायफ्रूट स्मूदी विथ कुसकुस सलाड
अॅपल - ड्रायफ्रूट स्मूदी
फळांचा रस आणि स्मूदी यातील महत्त्वाचा फरक म्हणजे स्मूदी घट्ट असते, ती गाळत नाही. त्यामुळे भाज्या व फळांमधील सर्व तंतूदेखील शरीराला लाभतात. पचनक्रियेसाठी ते गुणकारी असते. फळांची स्मूदी करताना त्यामध्ये दही, दूध, बर्फाचा वापर केला जातो.
साहित्य : १/२ कप बारीक चिरलेले सुके अंजीर, १/३ कप बारीक चिरलेले खजूर, १ बारीक चिरलेले सफरचंद, १ कप घट्ट दही,१/२ कप सोया दूध किंवा कोणतेही दूध, १ चमचा खारीक पावडर.
सजावटीसाठी : अंजीर.
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात बारीक चिरलेले सुके अंजीर, खजूर, सफरचंद, घट्ट दही, दूध आणि खारीक पावडर एकत्र करून मिश्रण चांगले एकजीव करा. नंतर सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्या. तयार स्मूदी ग्लासमध्ये ओता आणि अंजीरने सजवा. थंडगार सर्व्ह करा.
टीप : स्मूदी थंड हवी असल्यास मिक्सरमध्ये थोडा बर्फाचा चुरा घाला. अंजीर बारीक चिरताना पाण्यात भिजवून घ्या.
कुसकुस सलाड
साधारणतः वरीच्या तांदळाप्रमाणे दिसणारे हे धान्य. सलाड, कोशिंबिरीबरोबरच शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांमध्ये कुसकुस वापरले जाते. या धान्याला विशिष्ट चव असून शिजवून त्याचे छोटे गोळे तयार करून खाल्ले जातात.यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने व कार्बोहायड्रेटस असतात.
साहित्य : १०० ग्रॅम कुसकुस (बारीक लापशी), १/४ कप + १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, १ छोटा चमचा किसलेली लिंबाची साल, १ मोठा चमचा लिंबाचा रस, १/२ कप लांब चिरून वाफविलेली फरसबी, १/४ कप मनुका, १/४ कप बारीक चिरलेला पुदिना, १/४ कप अक्रोडचे तुकडे, १/२ चमचा कैरीचा कीस, १ कप पाणी, बारीक चिरलेले ४ पातीचे कांदे, आवश्यकतेनुसार मीठ व मिरपूड.
कृती : पॅनमध्ये एक कप पाणी उकळवून घ्या. त्यात एक चमचा तेल व मीठ घाला. उकळलेल्या पाण्यात कुसकुस घालून सतत ढवळत राहा. झाकण ठेवून कुसकुस पूर्ण शिजवून घ्या आणि शिजल्यानंतर एका मोठ्या भांड्यात तयार कुसकुस काढून घ्या.काट्याच्या चमच्याने कुसकुस मोकळे करून थंड करून घ्या. एका छोट्या भांड्यात लाइम झेस्ट व लिंबाचा रस फेटून घ्या.त्यानंतर पाव कप ऑलिव्ह ऑइल घालून ब्लेंडरने हे मिश्रण (इमल्शन) एकजीव करा. त्यात चवीनुसार मीठ व मिरपूड घाला. तयार कुसकुसच्या भांड्यात फरसबी, मनुका, पुदिना, पातीचा कांदा, अक्रोड आणि कैरीचा कीस घालून मिश्रण फोल्ड पद्धतीने चांगले एकजीव करा. आता यात तयार मिश्रण घालून चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. कुसकुस सलाड सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अलका फडणीस