केशरी भात विथ मटण गोडे
केशरी भात
पाठारे प्रभू म्हणजे हाडाचे मांसाहारी! गुढीपाडवा अथवा दिवाळी पाडवा साजरा करताना पानात केशरी भात व मटण गोडे हे पदार्थ आवर्जून वाढले जातात.
साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ, २ वाट्या पाणी, ३/४ वाटी बारीक साखर, २ लवंग, १ दालचिनी, २ वेलदोडे, १ मोठा चमचा तूप, १०-१२ काड्या केशर.
कृती: तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी पूर्णपणे निथळून घ्या. नंतर एका जाडसर पसरट भांड्यात तूप, दालचिनी, लवंग व वेलदोडे घालून फोडणी तयार करा. निथळलेले तांदूळ घालून परतवून घ्या. त्यात केशराच्या काड्या घाला. आता यात दोन वाट्या उकळलेले पाणी घालून तांदूळ नीट शिजवून घ्या. साखर घालून त्याचा पाक होईस्तोवर मंद आचेवर ठेवा. पाक भातात मुरू द्या.
मटण गोडे
साहित्य: १/२ किलो मटण (१ इंच कापलेले तुकडे), १/४ किलो उभा पातळ चिरलेला कांदा, २-३ बटाटे (सोलून मोठ्या फोडी केलेले), २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, १/२ लहान चमचा हळद, १ मोठा चमचा लाल तिखट, २ लहान चमचे पाठारे प्रभू सांबार मसाला, २-३ लवंग, १ दालचिनी, १/२ लहान चमचा हिंग, ३ मोठे चमचे गोडेतेल, आवश्यकतेनुसार मीठ व पाणी.
कृती: सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये तेल तापवून घ्या. त्यात हिंग, लवंग, दालचिनी व उभा पातळ चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतवून घ्या. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट व मटणाचे कापलेले तुकडे घालून परतवून घ्या. मंदाग्नीवर हळद, लाल तिखट व पाठारे प्रभू सांबार मसाला घालून नीट मिक्स करा. आता यात बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ व एक कप पाणी घाला व दोन शिट्ट्या करून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा. रस्सा हवा तितका घट्ट करा. कुकर थंड झाल्यानंतर मटण सर्व्ह करायला तयार.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सौमित्र वेलकर