कढी मेघमल्हार
कढी पचायला हलकी असते आणि पोळी, भात किंवा खिचडीसोबत खाल्ली जाते. या पाककृतीमध्ये मी काही भाज्या घालून या पदार्थाला थोड्या वेगळ्या ढंगात सादर केले आहे.
साहित्य : १ कप दही, ४ मोठे चमचे बेसन, १ कप शिजलेल्या भाज्या (मटार, फरसबी, गाजर), १ मोठा चमचा साखर, १ मोठा चमचा मोहरी, १ मोठा चमचा जिरे, १ इंच आले किसलेले, १ हिरवी मिरची तुकडे केलेली, थोडासा कढीपत्ता चिरलेला, चिरलेली कोथिंबीर, १ चिमूट हिंग.
कृती : दही आणि बेसन एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या. त्यात १ कप पाणी घालून हे मिश्रण फेटून घ्या. गुठळ्या राहणार नाहीत, याची खातरजमा करा. कढईमध्ये तेल तापत ठेवा. त्यात मोहरी आणि जिरे घाला. १० सेकंद ते तडतडू द्या. त्यात हिंग, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने घाला आणि परतवा. आता दही आणि बेसनचे मिश्रण त्यात घाला आणि मंद आचेवर उकळी येऊ द्या. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता त्यात उकडलेल्या भाज्या घाला आणि नीट मिसळून घ्या. त्यात मीठ व साखर घाला. कढी तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि खिचडीसोबत गरमागरम वाढा.