पोहा चिकन भुजिंग विथ सलाड | अर्चना आरते | Poha Chicken Bhujing With Salad | Archana Arte

Published by अर्चना आरते on   June 1, 2022 in   Recipes

पोहा चिकन भुजिंग विथ सलाड

पोहा चिकन भुजिंग

वसई-विरारमधील लोकप्रिय डिश म्हणजे ‘पोहा चिकन भुजिंग’.१९४० साली बाबू हरी गावड या व्यक्तीने चिकनमध्ये तेल जास्त पडल्यावर पोहे घालून तयार केलेली ही अनोखी रेसिपी.

साहित्य: १/२ किलो बोनलेस चिकन (मोठे तुकडे), १ मोठा चमचा हिरवे वाटण (आले, लसूण, कोथिंबीर), १/२ चमचा हळद, १ छोटा चमचा मिक्स मसाला, २ बटाट्याच्या सालीसकट चकत्या, २ बारीक चिरलेले कांदे, १ मोठा चमचा भरडलेला गरम मसाला (दालचिनी, लवंग, काळीमिरी, जिरे) १ वाटी सुके जाडे पोहे, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, कोथिंबीर व तेल.

ग्रीलसाठी: लांब सळई (skewer)

कृती: सर्वप्रथम एका बाउलमध्ये बोनलेस चिकन, हिरवे वाटण, हळद, मिक्स मसाला व  बटाट्याच्या चकत्या, मीठ घेऊन मिश्रण चांगले एकजीव करा.पंधरा मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.नंतर कढईत दोन मोठे चमचे तेल घेऊन तयार बाउलमधील मिश्रण व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करा.पाच ते दहा मिनिटे अर्ध कच्चे शिजवून घ्या.आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या.एका लांब सळईला तयार चिकन व बटाट्याचे काप लावून थोडा काळपट रंग होईस्तोवर गॅस फ्लेमवर भाजून घ्या.त्यानंतर कढईत दोन ते तीन मोठे चमचे तेल घेऊन बारीक चिरलेला कांदा, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, एक मोठा चमचा भरडलेला मसाला व चिमूटभर मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घाला.प्लेटला चिकटलेला उर्वरित मसाला कढईत घाला.पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या.

नंतर गॅस मंदाग्नीवर ठेवून सुके जाडे पोहे घालून परतवा.त्यात फ्लेम केलेले चिकन घालून ५ मिनिटे वाफ काढा.चवीनुसार कोथिंबीर घाला.गरमागरम सर्व्ह करा, पोहा चिकन भुजिंग.

सलाड

स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सर्वत्र तोंडी लावणे म्हणून सलाडचा वावर दिसून येतो.हिरव्या भाज्यांचा भरपूर समावेश असलेले सलाड हे व्हेज व नॉनव्हेज या दोन्ही प्रकारात मोडले जाते.

साहित्य: १ उभा पातळ चिरलेला कांदा, १ कप पातळ चिरलेला कोबी, १ कप पातळ चिरलेली सिमला मिरची (लाल, हिरवी, पिवळी), १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ छोटा चमचा चिली फ्लेक्स, १ छोटा चमचा काळीमिरी पूड, आवश्यकतेनुसार हब्र्स व मीठ.

सजावटीसाठी: चेरी टोमॅटो.

कृती: सर्वप्रथम एका भांड्यात पातळ चिरलेला कांदा, कोबी, सिमला मिरची घ्या.त्यात लिंबाचा रस घाला.मिश्रण चांगले एकजीव करा.नंतर त्यात चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड, हब्र्स व मीठ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करा.चेरी टोमॅटोने सजवा आणि सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


अर्चना आरते