शेतकरी सँडविच
बेससाठी साहित्य : प्रत्येकी १ वाटी ज्वारी व नाचणीचे पीठ.
सारणासाठी साहित्य : १ वाटी शेवग्याचा कोवळा पाला, १ वाटी बेसन, २ चमचे तेल फोडणीसाठी, थोडेसे जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ५-६ लसूण पाकळ्या.
ठेच्यासाठी साहित्य : ७-८ भाजलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, ७ ते ८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, चवीपुरते मीठ, थोडेसे जिरे.
चटणीसाठी साहित्य : १ किसलेली कैरी, चवीप्रमाणे तिखट, मीठ, जिरे, काळे मीठ व गूळ.
इतर साहित्य : लोणी, काळे मीठ, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो.
कृती : प्रत्येकी १ वाटी पाणी उकळून त्यात चवीपुरते मीठ घालून ज्वारी आणि नाचणीची उकड काढा. उकड मळून लाटून भाकरी चौकोनी कापून घ्या.तेलाची फोडणी करून त्यात जिरे, मोहरी, हिंग घाला. यात लसूण व शेवग्याचा पाला बारीक चिरून परतवा. मग बेसन परतून घ्या. यात आता हिंग, तिखट, मीठ घाला व थोडे थोडे पाणी घालून छान मऊ झुणका तयार करा. ठेच्याचे साहित्य वापरून थोडे पाणी घालून चटणी मिक्सरमधून फिरवून घ्या. कैरीच्या चटणीचेही सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्या. आता प्रथम ज्वारीची चौकोनी भाकरी घेऊन त्याला लोणी व त्यावर कैरीची चटणी लावा. त्यावर नाचणीची चौकोनी भाकरी घेऊन लोणी लावून ठेचा व चटणी लावा. आता याला झुणका लावून घ्या. मग पुन्हा नाचणीची भाकरी घेऊन लोणी लावून त्यावर बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो टाका. त्यावर काळे मीठ भुरभुरावे. त्यावर पुन्हा लोणी, ठेचा चटणी लावून ज्वारीची भाकरी त्यावर ठेवा. अशा प्रकारे दोन ज्वारी व दोन नाचणीच्या भाकऱ्या एकावर एक लावून घ्या. नंतर तव्यावर लोणी घालून हे सँडविच भाजून घ्या. मधोमध कट करून हे शेतकरी सँडविच चटण्यांसोबत खायला दया.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुषमा पोतदार, रायगड