तंदुरी पर्णी (शोरबा)
साहित्य॒: १ कप मिक्स पालेभाजी (निवडलेली पालक, अंबाडी, कांदापात, शेवगा पाला व कोथिंबीर), १/२ कप लीमा बीन्स व कुळीथ मिक्स (शिजवून), २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १/४ चमचा मेथी पावडर, १ चमचा तूप, २ चिमूट हिंग, चवीप्रमाणे गूळ व मीठ, चार ते पाच कप पाणी, सर्व्हिंगसाठी पांढरे लोणी, जीरावन किंवा चाट मसाला व ब्रेड कृटॉन्स.
कृती॒: प्रथम चार ते पाच कप पाणी उकळत ठेवा. गॅस बंद करून त्यात धुतलेल्या पालेभाज्या दहा मिनिटांसाठी ठेवा. नंतर पाण्यातून या पालेभाज्या (पाणी फेकू नये) काढून मिक्सर/ब्लेंडरमध्ये घाला. सोबत शिजविलेले कुळीथ, बीन्स व मिरच्या घालून एकत्र वाटून पेस्ट करून घ्या. आता या वाटलेल्या पेस्टमध्ये बाजूला काढून ठेवलेले पाणी घाला व हे मिश्रण गाळून घ्या. एका पॅनमध्ये एक चमचा तूप तापवून त्यात मेथी पावडर व हिंग घालून गाळलेले मिश्रण ओता. चवीप्रमाणे मीठ व गूळ घाला. मिश्रण उकळत ठेवा, थोडे पातळसरच ठेवा. गॅसवर दुसऱ्या बाजूला कोळसा लाल करून घ्या. मिश्रणात एक वाटी ठेवून त्यात तापलेला कोळसा घालून त्यावर थोडे साजूक तूप टाकून त्यावर दोन मिनिटांकरिता झाकण ठेवा. आता कोळशाची वाटी काढून घ्या. गरमागरम तंदुरी पर्णी सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून त्यात पांढरे लोणी व जीरावन घालून ब्रेड कृटॉन्सबरोबर सर्व्ह करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
हेमलता बटले, नवी मुंबई