बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक टोस्ट | निलेश लिमये | Baked Vegetable With Garlic Toast | Nilesh Limaye

Published by निलेश लिमये on   March 3, 2022 in   Tiffin Box

बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक टोस्ट

बेक्ड व्हेजिटेबल

भाज्यांना बटर आणि चीजचा तडका दिला तर या चिजी भाज्या खाण्याची लज्जत काही औरच. रंगीबेरंगी भाज्या, चीज, ब्रेड व बटर यांसारख्या पदार्थांपासून बनविलेली बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक टोस्ट ही सोपी रेसिपी म्हणजे पोषणमूल्यांनी युक्त अशी फ्यूजन रेसिपी!

साहित्यः१ कप फ्लॉवरचे तुरे, १/२ कप गाजराचे लहान चौकोनी तुकडे, १/२ कप स्वीट कॉर्न, १/४ कप फरसबी, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १/२ कप हिरवी ढोबळी मिरची (लहान चौकोनी तुकडे), चवीपुरते मीठ.

व्हाइट सॉससाठी साहित्य: २ चमचे बटर, १/२ छोटा चमचा काळीमिरी पूड, २-३ लवंगा, १ तमालपत्र, १/२ चमचा मैदा, ११/२ कप गरम दूध, थोडे चीज.

कृती: सर्वप्रथम एका पातेल्यात चवीनुसार मीठ घालून सर्व भाज्या वाफवून घ्या. दुसरीकडे पॅनमध्ये बटर घेऊन त्यात तमालपत्र, लवंग, कांदा घालून गुलाबी होईस्तोवर परतवा. नंतर त्यात थोडी काळीमिरी पूड व मैदा घालून तांबूस रंग होईस्तोवर परता. आता यात गरम दूध घालून शिजू द्या. मिश्रण जास्त घट्ट वाटत असल्यास थोडे आणखी दूध घाला.तयार सॉसमध्ये वाफवलेल्या भाज्या घालून मिश्रण नीट एकत्र करून घ्या. परतलेल्या भाज्या ओव्हनसेफ काचेच्या भांड्यात काढा. व्हाइट सॉसमध्ये भाज्या पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यात चीज घाला. तयार मिश्रण ओव्हनमध्ये ८ ते ९ मिनिटे किंवा चीजचा वरचा थर हलका लालसर होईस्तोवर बेक करा.

गार्लिक टोस्ट

साहित्य: ४-५ ब्रेडचे स्लाइस, २-३ चमचे बटर, ३-४ लसूण पाकळ्या, १ चमचा मिरपूड, १ चमचा कोथिंबीर, १ वाटी किसलेले चीज.

कृती:  ब्रेड स्लाइसला बटर लावून तव्यावर टोस्ट करून घ्या. एका भांड्यात बटर, लसूण, मिरपूड व कोथिंबीर घालून चमच्याने फेटून घ्या. तयार गार्लिक बटर ब्रेडला लावून घ्या. स्लाइसवर चीज पसरवून ६-७ मिनिटे बेक करा. तयार गार्लिक टोस्ट बेक्ड व्हेजिटेबलसोबत सर्व्ह करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


निलेश लिमये