टाकळा कटलेट | मिताली साळस्कर | रानभाज्या

Published by मिताली साळस्कर on   August 5, 2021 in   रानभाज्या

टाकळा कटलेट

मराठी नाव : टाकळा, तरोटा

इंग्रजी नाव : Cassia Tora

शास्त्रीय नाव : Clerodendrum Multiflorum

आढळ : महाराष्ट्रात सर्वत्र शेतात, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला मुबलक आढळतो.

कालावधी : जून ते सप्टेंबर

वर्णन : एक ते दोन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या झुडपाची तजेलदार हिरवी गोलाकार पाने असतात. याच्या पानांना उग्र वास असतो. फुले येण्यापूर्वी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. ऑक्टोबरमध्ये टाकळ्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. डिसेंबरपर्यंत याच्या छोट्या गवारीसारख्या गोल शेंगा तयार होतात. सुकल्यावर त्यातून मेथी दाण्यासारख्या बिया निघतात. त्यांना कॉफीचा सुवास असतो. ग्रामीण भागात अजूनही टाकळ्याच्या बियांची पावडर करून कॉफी तयार केली जाते.

साहित्य : २ वाट्या टाकळ्याची पाने, ४ उकडलेले बटाटे, २ हिरव्या मिरच्या, छोटा तुकडा आले, १ छोटा चमचा जिरे, १/२ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, १/२ वाटी रवा, २ छोटे चमचे बेसन.

कृती : टाकळ्याची पाने धुऊन बारीक कापून घ्यावीत. बटाटा उकडून किसावा. हिरवी मिरची, आले, जिरे बारीक वाटून घ्यावे. उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकळ्याची पाने, वाटलेला हिरवा मसाला, बेसन, लिंबाचा रस, हळद, तिखट, मीठ, साखर घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे गोळे करून त्यांना चपटे करावे. रव्यात घोळवून हे कटलेट दोन्ही बाजूंनी तेलात खमंग भाजावेत.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


– मिताली साळस्कर