घातक कोण? हार्ट अॅटॅक की स्ट्रोक?
बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये पक्षाघात (स्ट्रोक) आणि हार्ट अॅटॅक यांचा अग्रक्रम लागतो. हार्ट अॅटॅक आणि पक्षाघात या दोन्हीमध्ये क्रमशः हृदय आणि मेंदू यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणीमध्ये अडथळा येऊन, परिणामग्रस्त ऊतींना प्राणवायूची कमतरता भासते. मेंदूच्या बाबतीत अचानक मृत्यू येण्याचे प्रमाण कमी असले, तरी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
भरीस भर म्हणून कोरोनाचा विषाणू. कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यावरही रक्त गोठण्याची प्रक्रिया थोडे दिवस चालूच राहते. परिणामी, हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता असते.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय आणि तो का येतो?
१) रक्तवाहिनींच्या आतील बाजूस चरबीचे थर साठून रक्तवाहिनी निमुळती होते आणि हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो.
२) काही वेळा रक्ताची गुठळी शरीराच्या इतर कुठल्याही भागात तयार होते आणि रक्तप्रवाहाबरोबर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये अडकून हृदयविकाराचा झटका बसू शकतो.
लक्षणे:
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अचानक उद्भवू शकतात किंवा हळूहळू काही तासांमध्ये अथवा काही दिवसांमध्येही जाणवतात.
१) छातीत वेदना होणे अथवा छातीत घट्टपणा जाणवणे.
२) दंडात किंवा खांद्यामध्ये विनाकारण वेदना होणे.
३) पाठ, मान किंवा जबड्यामध्ये विनाकारण वेदना होणे.
४) धाप लागणे.
५) अचानक अशक्तपणा जाणवणे, भोवळ येणे किंवा चक्कर येणे.
६) काहीवेळा (विशेषतः स्त्रियांमध्ये) मळमळ आणि उलटी होणे अशी लक्षणेही दिसून येतात.
अशी लक्षणे असताना अपचन, आम्लपित्त किंवा पित्ताशयाचा दाह असेल अशी शंका घेतल्यास चुकीच्या निदानामुळे रोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही लक्षणे हृदयविकाराशी संबंधित नाहीत ना, याची खात्री करून घेणे आवश्यक असते.
प्रारंभिक उपचार॒:
हृदयविकाराचा झटका(अॅटॅक) असल्याची शंका आल्यास-
१) त्या व्यक्तीला बसवून, शांत राहण्यास सांगावे. मोकळ्या हवेची सोय करावी.
२) कपडे सैल करावे.
३) रुग्णाला खोल श्वास घेण्यास किंवा प्राणायाम करण्यास सांगावे.
४) आधीपासून असलेल्या हृदय-
विकारासाठी ती व्यक्ती नायट्रो-ग्लिसरीनसारखी औषधे घेत असेल तर त्यातील एक गोळी जिभेखाली ठेवावी. गरजेप्रमाणे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत गोळी पुन्हा द्यावी.
५) रोगी स्थिरावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवावी.
६) पीडित व्यक्ती श्वास घेत नसेल अथवा प्रतिसाद देत नसेल, तर योग्य मदत मिळेपर्यंत सीपीआर (ष्टड्डह्म्स्रद्बश्श्चह्वद्यद्वश्ठ्ठड्डह्म्४ ह्म्द्गह्यह्वह्यष्द्बह्लड्डह्लद्बश्ठ्ठ) सुरू ठेवावे.
हे करू नका:
१) रुग्णाला एकटे सोडू नका.
२) लक्षणे दिसत असताना, रुग्णाने तातडीची मदत बोलाविण्यास नकार दिला तरी त्याचे न ऐकता, मदतीसाठी प्रयत्न सुरू ठेवावेत.
३) रुग्णाची लक्षणे थांबण्याची वाट पाहू नका.
४) नायट्रोग्लिसरीनसारख्या औषधाशिवाय काही देऊ नये.
प्रतिबंधात्मक उपाय :
१) धूम्रपान वर्ज्य॒- धूम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो.
२) रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मेदाम्ले व मधुमेह नियंत्रित ठेवा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत व आहारविहाराबाबत दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.
३) वजन नियंत्रित ठेवा.
४) नियमित व्यायाम करावा, परंतु कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५) मद्यसेवनाचे प्रमाण कमी करा.
६) आहारातील रेड मीट, सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचे प्रमाण अत्यल्प असावे. चिकन, मासे, तृणधान्ये, ताजी फळे, पालेभाज्यायुक्त आहार घ्यावा.
७)॒महत्त्वाचे म्हणजे मानसिक ताण अजिबात घेऊ नये. मनोरंजन, अध्यात्म याकडे मन वळवावे.
स्ट्रोक म्हणजे काय? स्ट्रोक येण्याची कारणे काय?
स्ट्रोकला ब्रेन अॅटॅक किंवा बोली-भाषेत पक्षाघात असेही म्हटले जाते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा मेंदूच्या काही भागात जेव्हा अचानकपणे थांबतो तेव्हा मेंदूच्या त्या भागाचे कार्य थांबते. त्यावेळी दिसणाऱ्या लक्षणांना स्ट्रोक आला असे म्हणतात. याची कारणे पुढीलप्रमाणे॒:
१)॒मेंदूतील रोहिणीमध्ये चरबीचे थर साठून रक्तवाहिनी निमुळती होते. त्यातच रक्ताची गुठळी अडकल्यास रक्तपुरवठा खंडित होऊन स्ट्रोक येतो.
२)॒शरीराच्या इतर कुठल्या भागामध्ये रक्ताची गुठळी तयार होते आणि रक्तप्रवाहाद्वारे ती मेंदूच्या काही भागांतील रक्तवाहिनीमध्ये अडकून त्या भागाचा रक्तप्रवाह खंडित होतो आणि पक्षाघाताची लक्षणे दिसू लागतात.
३)॒काही वेळा उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात किंवा जन्मजात असणाऱ्या रक्तवाहिन्यांतील फुगीरपणासारख्या (ष्टद्गह्म्द्गड्ढह्म्ड्डद्य ्नठ्ठद्गह्वह्म्द्बह्यद्व) वैगुण्यामुळे रक्तस्राव होऊन स्ट्रोक येऊ शकतो. याला रक्तस्रावी स्ट्रोक म्हणतात.
४)॒काही वेळा विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी आकुंचन पावून मेंदूचा रक्तपुरवठा तात्पुरता कमी होऊन पक्षाघाताची सौम्य लक्षणे जाणवतात. परंतु काही वेळाने रक्तपुरवठा नियमित होऊन अशी लक्षणे कमी होतात.
स्ट्रोक (मेंदूघात/पक्षाघात) ची सर्वसामान्य लक्षणे:
१) अचानक भोवळ येणे, शारीरिक हालचालींमध्ये असंतुलन.
२) हाता-पायांमध्ये व चेहऱ्याच्या एका भागामध्ये अशक्तपणा जाणवणे.
३) तीव्र डोकेदुखी, एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये असाधारण स्वरूपाचा अंधुकपणा.
४) बोलण्यास अडचण जाणवणे.
५) चेहरा पडणे, दंडामध्ये अशक्तपणा जाणवणे.
स्त्रियांमध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत अधिक असते. तसेच सर्वसामान्य लक्षणांहून काही लक्षणे स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात :
मळमळणे किंवा उलटी होणे, संभ्रमावस्था, डोक्यामध्ये वेदना, अशक्तपणा, धाप किंवा श्वास लागणे,
मूर्च्छा किंवा बेशुद्ध पडणे, आकडी येणे, भ्रमित होणे किंवा प्रतिसाद न देणे, वर्तनात बदल होऊन क्षोभ वाढणे.
पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू येण्याचे प्रमाण अधिक असते. तर स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तरुण वयात स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते, परंतु मृत्यूचे प्रमाण कमी असते. तसेच पुरुषांमध्ये खालील काही लक्षणे अधिक प्रमाणात दिसतात:
१)॒चेहरा एका बाजूस झुकणे किंवा असम हास्य.
२)॒अस्पष्ट बोलणे, बोलण्यास त्रास आणि दुसऱ्याचे बोलणे समजण्यास कठीण होणे.
३) शरीराच्या एका बाजूस दंडामध्ये किंवा स्नायूमध्ये अशक्तपणा जाणवणे.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये स्ट्रोकची काही लक्षणे वेगळी असली, तरी मेंदूला कायमची इजा होणे, दीर्घकालीन व्यंग येणे किंवा मृत्यू हे होणारे परिणाम एकच असतात. त्वरित निदान होण्यासाठी खालील लक्षणांवर लक्ष ठेवा :
F – फेस (चेहरा): व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहा. त्याला स्मित हास्य करण्यास सांगा. व्यक्ती तोंडाच्या एकाच बाजूने स्मित करीत असेल तर, ही स्थिती सामान्य नाही.
A- आर्म्स (दंड): व्यक्तीला दोन्ही हात वर उचलण्यास सांगा. व्यक्ती एकच हात वर उचलू शकत असेल, तर स्ट्रोकचे लक्षण आहे असे समजावे.
S – स्पीच (वाणी): रुग्णास बोलण्यास सांगा. जर रुग्ण व्यवस्थित बोलू शकत नसेल तर ही सामान्य स्थिती नाही.
T – टाइम (वेळ): सर्व लक्षणे दिसत असताना तातडीने वैद्यकीय मदत बोलवा.
प्रथमोपचार: स्ट्रोक या आजारात वेळ अत्यंत महत्त्वाची असते. ऑक्सिजन नसण्याची परिस्थिती मेंदू तीन ते सहा मिनिटे सहन करू शकतो. पण हे व्यक्तिसापेक्ष असते. मेंदूला याहून अधिक काळ ऑक्सिजन मिळाला नाही, तर गंभीर स्वरूपाचे नुकसान होऊ शकते. म्हणून स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येत आहे, अशी शंका वाटल्यास रुग्णाला तात्काळ रुग्णालयात न्या. जेवढ्या लवकर रुग्णावर उपचार होतील, तेवढा रुग्णाचा जीव वाचण्याची व रुग्ण बरा होण्याची शक्यता जास्त असते.
रुग्ण शुद्धीत असेल तर:
* रुग्णाचे डोके वर उचलून किंवा खांदे उचलून त्याला आधार द्या. यासाठी उशीचा वापर करू शकता.
* तापमान आरामदायी असू द्या.
* रुग्णाचे कपडे घट्ट असल्यास सैल करा.
* मोकळी हवा येऊ दे.
* काहीही खायला किंवा प्यायला देऊ नका.
व्यक्ती बेशुद्ध असेल तर:
* श्वासोच्छवासावर लक्ष ठेवा.
* डोके मागील बाजूस धरा व रुग्णाची हनुवटी उचला.
* रुग्णाची छाती वर येत आहे का, ते तपासा.
व्यक्ती श्वासोच्छ्वास करत नसेल तर..?:
* सीपीआर देण्यास तयार राहा.
* रुग्णाला पाठीवर झोपवा.
* त्या व्यक्तीच्या बाजूला गुडघ्यावर बसा व छातीवर ३० वेळा जोरात आणि वेगाने दाब द्या.
* दोन रेसक्यू ब्रेथ द्या. डोके मागील बाजूस नेऊन हनुवटी उचलून ही कृती करा. नाक दाबून आणि तोंडातल्या तोंडात श्वास भरून रेसक्यू ब्रेथ द्या.
* छातीवर दाब देऊन रेसक्यू ब्रेथ देण्याची कृती वैद्यकीय मदत येईपर्यंत सुरू ठेवा.
* वय आणि कौटुंबिक आरोग्याची पाश्र्वभूमी यांसारख्या घटकांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. पण तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली अवलंबू शकता, जेणे करून हृदयविकाराचा झटका व स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होईल.
अधिक घातक कोण?
हृदयविकाराचा धक्का बसून आकस्मित मृत्यू होऊ शकतो पण स्ट्रोकच्या बाबतीत तशी शक्यता कमी असते. हार्ट अॅटॅक च्या समस्येत वेळेवर उपचार मिळाल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास रुग्णाला पुढील आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगणे शक्य होते. परंतु स्ट्रोकच्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास किंवा आलेला धक्का फार तीव्र असल्यास पुढील आयुष्यभर अंथरुणात खिळून राहायची वेळ येऊ शकते. यातून निर्माण होणाऱ्या/वाढणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे रुग्णाला कायमस्वरूपी त्रास सहन करावा लागू शकतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
डॉ. उल्हास कुलकर्णी
(लेखक जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत.)