गर्भवती अवस्था आणि स्तनपानाचा काळ यामध्ये आईचे पोषण फार महत्त्वाचे असते. बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ त्यावर अवलंबून असते, हा विचार तसा सर्वत्र आढळणारा आणि पारंपरिक. परंतु त्याची शास्त्रोक्त माहिती आज प्रत्येक सुजाण व्यक्तीला असायला हवी. जागतिक आरोग्यसंघटना आणि युनिसेफ यांनी नेमका हाच विचार मांडला आहे. त्यांच्या मते बाळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी १००० दिवस मोलाचे असून त्यात गर्भावस्थेतील २७० दिवस आणि जन्मानंतरची पहिली दोन वर्षे याचा समावेश होतो. या दरम्यान जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर देशाची पुढची पिढी बहुतांशी स्वस्थ आणि निरोगी बनेल. मात्र सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की, समाजाच्या तळागाळातल्या मुली गरिबी आणि अज्ञान यामुळे कुपोषित आहेत, तर ‘ आहे रे ‘ गटातल्या मुली चुकीच्या जीवनशैलीमुळे आहारमूल्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
दोन जीवांच्या स्त्रीचा आहार:
गर्भधारणा झाल्यानंतरचे पुढचे ९ महिने स्त्री ‘दोन जीवांची’ असते. साहजिकच तिच्या आहाराच्या गरजा वाढत वाढत जातात. नऊ महिन्यांच्या काळात तिच्या वजनात सुमारे १० ते १२ किलो वाढ व्हायला हवी. यासाठी तिने आहारातले ऊष्मांक २२०० वरून २९०० पर्यंत नेले पाहिजेत. गर्भाशय, वार आणि गर्भ यांच्या प्रचंड वेगाने चाललेल्या वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिने पाहिजेत. त्यात सर्व ‘इसेन्शियल अॅमिनो अॅसिड्स ‘ (ही शरीरात बनत नाहीत, आहारातूनच मिळवावी लागतात.) यांचा अंतर्भाव झाला पाहिजे. किमान ७० ग्रॅम प्रथिने रोज मिळण्यासाठी दूधदुभते, मोडाची कडधान्ये, डाळी आणि मांसाहारी असल्यास अंडी, चिकन, मटण यांचे सेवन नक्की केले पाहिजे. विशेषतः पनीर, चीज यामध्ये उत्तम प्रथिने असतात. माशांमधून मात्र जलप्रदूषणामुळे पाऱ्या (मर्क्युरी) सारखे विषारी पदार्थ पोटात जाऊ शकतात, म्हणून गर्भवतीला मासे खायचे असल्यास त्या पाण्याची शुद्धता माहीत असावी.
बाळाच्या शरीरात प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी लायसिन या अॅमिनो अॅसिडची गरज असते, जे तृणधान्यातील प्रथिनातून मिळते. बाळाच्या आणि मजासंस्थेच्या निकोप वाढीसाठी ओमेगा ३ स्निग्धाम्लाचे स्त्रोत आहारात असलेच पाहिजेत. (जवस, तीळ, बदाम, अक्रोड, सोया तेल, मोहरी तेल, कड लिव्हर ऑईल, ब्रोकोली, पालक, साजूक तूप.)
लोहाची दैनंदिन गरज रोज २७ मिलिग्रॅम इतकी आहे. त्यासाठी गर्भवतीने हिरव्या आणि गर्द रंगाच्या भाज्या, मनुका, नाचणी हे आवर्जून घ्यावे. फोलिक अॅसिड (रोज ६०० मायक्रोग्रॅम) आणि व्हिटॅमिन बी १२ (रोज ५०० मायक्रोग्रॅम) हे तर हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी, मजासंस्थेसाठी आणि प्रत्येक पेशीच्या डीएनएसाठी अत्यावश्यक आहे. बाळाची हाडे मजबूत बनण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीसुद्धा पाहिजे. ते गर्भारपणी घेतले नाही तर आईची हाडे कमकुवत बनायला सुरुवात होते. त्यामुळे गर्भधारणेनंतरच्या पहिल्या काही दिवसांतले ‘ डोहाळे ‘ कमी झाले की, गर्भवतीने कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लोह, फोलिक अॅसिड आणि बी १२ च्या पूरक गोळ्या नियमित घेतल्या पाहिजेत. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी चोथायुक्त तंतुमय पदार्थसुद्धा खाण्यात असावेत. तसेच रोज ८ ते १० पेले (दोन लिटर) घ्यावे आणि स्तनपानाच्या काळात तीन लिटरपर्यंत वाढवावे.
दोन लिटर पाण्यात एकएक चमचा साळीच्या लाह्या, धणे, जिरे आणि खडीसाखर आदल्या रात्री घालून ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी घ्यावे. या काळात दूध भरपूर यावे म्हणून पुढे दिलेल्या यादींपैकी आवडीनुसार निवड करून आळीपाळीने हे पदार्थ जरूर सेवन करावेत.लसूण , मेथी दाणे, हिरवी मेथीची, शेपू खसखस, हळीव, डिंक, शतावरी, आवळा, तुळस, बाजरी, हिरवे मूग, तीळ, जवस, मासे इत्यादी.
ताजे चौरस भोजन, शांत एकांत वातावरण, आवश्यक तेवढी विश्रांती, पुरेसे पाणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाळाला पाजण्याची इच्छा, या सर्व गोष्टी स्तनपानासाठी उपयोगी पडतात.
बाळाचा आहार:
आता बाळाच्या आहाराची माहिती घेऊ. आज वैद्यक आणि आहारशास्त्रातील तज्ज्ञ मंडळींच्या मते बाळाला जन्मानंतर ६ महिने फक्त स्तन्य द्यावे, कारण बाळाची आतडी परिपक्व व्हायला तेवढा काळ लागतो. नंतरसुद्धा शक्य तितके दिवस, अगदी बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत पाजत राहावे, इतके स्तनपानाचे अगणित फायदे आहेत. आईच्या दुधात बाळाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी सर्व अन्नघटक आहेतच, शिवाय अॅलर्जी आणि जंतुसंसर्ग यांना प्रतिबंध करणारी महत्त्वाची द्रव्ये (अॅण्टिबॉडिज) आहेत. आईचे दूध भरपूर मिळालेल्या बाळाला भविष्यकाळातही स्थूलपणा, मधुमेह इत्यादी विकारांची शक्यता कमी असते. याखेरीज इतर फायदे म्हणजे हे दूध हवे तेव्हा, हवे तितके, पचायला सोपे, सुखद तपमानाचे निकटच्या स्पर्श सहवासामुळे इंटर, नाते अधिक गहिरे व्हायला मदत होते. दररोज सुमारे ७५० मिलि. दूध या काळात स्त्रवत असते आणि तेवढे बाळाला लागते.
पावडरचे दूध : योग्य की अयोग्य?
काही कारणांमुळे आईला पुरेसे दूध येत नसेल किंवा आजारपणामुळे ‘दूध पाजायचे नसेल’ तर आजकाल ‘फॉर्म्युला’ ऊर्फ पावडरचे दूध दिले जाते. यात बाळाच्या आहाराच्या मुख्य गरजा पुरवल्या जातातच, शिवाय लोह, झिंक इत्यादी पोषक द्रव्ये सुक्ष्म प्रमाणात घातली जातात. मात्र फॉर्म्युला बराच महाग असल्याने सर्वांना परवडणार नाही, तर अशा वेळी ‘वरच्या’ दुधाला पर्याय नसतो. गाईचे दूध आपल्याकडे मुद्दामहून बाळाला देतात. परंतु त्यातल्या ‘बीटा लॅक्टोग्लोब्युलिन’ नावाच्या प्रथिनाची अॅलर्जी ५ ते १० टक्के मुलांना असते आणि त्यांना पोटदुखी, जुलाब असे त्रास होतात. म्हशीचे दूध चांगले उकळून व गाळून देणे सुरक्षित आहे. सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार द्यायला सुरुवात करावी. आजकाल तयार सीरियल्स सर्वत्र मिळतात. पण स्वच्छता, ताजेपणा, खर्च आणि पोषणमूल्य या सर्वांचा विचार करता आपण घरीच दैनंदिन वापराच्या गोष्टींतून पूरक आहार दिलेला चांगला. सुरुवातीला तांदूळ धुऊन, सुकवून, भाजून त्याची पावडर (बारीक रवा) बनवावी आणि मऊ शिजवून दुधात मिसळून द्यावी. ती पचू लागल्यावर त्याच पद्धतीने तयार मूग किंवा मसूर डाळीची पावडरसुद्धा तांदळात मिसळून द्यावी. केळी, सफरचंद, पेअर, स्ट्रॉबेरी, चिक्कू,आंबा, कलिंगड अशी कोणतीही मोसमी फळे, स्वच्छ धुऊन, साली काढून, वाफवून त्यांचा लगदा (प्यूरी) करून द्यावी. भोपळा, टोमॅटो, कोहळा, गाजर, बटाटा, फ्लॉवरसारख्या भाज्याही अशाच मऊ शिजवून लगदा करून द्याव्यात.
सुरुवातीला एक-एकच पदार्थ द्यावा, तो पचतो असे लक्षात आले की, मिश्र स्वरूपात द्यायला हरकत नाही. बाळ आठ महिन्यांचे होईपर्यंत त्याला थोडे दात येतात, आतडी परिपक्व होतात. तेव्हा त्याला हा आहार मिक्सरमधून न काढता चमच्याने घोटून द्यावा. आता त्याला पालकासारख्या पालेभाज्याही द्यायला हरकत नाही. चिकन सूप, अंड्याचा पिवळा बलक, नाचणी सत्त्व, तांदळाची उकड असे पदार्थही आता चालू करावे. चवीसाठी सुंठ, जिरेपूड, पुदिना, हळद, कांदा, लसूण पावडर करून घालू शकता. मात्र गरम मसाला, हिरवी मिरची, मिरे असे टाळावे. बाळाला बोटांनी उचलून खाता येतील असे पदार्थ वाफवलेले गाजर, बीट, पातळ चिरलेले सफरचंद देता येईल. नऊ महिन्यांच्या पुढे पोषणमूल्य वाढविण्यासाठी पदार्थांत खजूर, मनुका, बदाम, काजू, शेंगदाणे इत्यादी पदार्थ पूड करून मिसळावे. तसेच लोणी, तूप, तेलसुद्धा घालू शकता. गूळ चालेल पण बाळ वर्षाचे होईपर्यंत मीठ, साखर, मध, चहा, कॉफी, कोला, तळणीचे पदार्थ देऊ नयेत. दहाव्या महिन्यात गालगुंड, गोवरची लस (एमएमआर) दिली जाते. ही लस बनविण्यासाठी अंड्याचा उपयोग केला जातो. बाळाला अंड्याच्या पांढऱ्या भागाची अॅलर्जी नाही ना, हे कळण्यासाठी त्याला उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग आधी द्यावा व तो पचत असेल तर एमएमआर लस द्यावी.
बाळाचा आहार : एक वर्षानंतर
एक वर्षानंतर बाळाला घरात बनणारे सर्वपदार्थ (तिखट न घालता) द्यावेत. उपमा, शिरा, घावन, इडली, डोसा, तूप लावून पोळी भाकरी, गुरगुट्या भात, वरण, उकडलेले अंडे असे वैविध्य असलेले जेवण द्यावे. यात शेवयाची किंवा दलियाची खोबरे घातलेली खीर अधूनमधून समाविष्ट करावी. आणि त्याला सर्व कुटुंबीयांच्याबरोबरच जेवायला बसवावे. आपल्या हाताने खायला उत्तेजन द्यावे. बाळ वरचे पदार्थ खाऊ लागले तरी त्याला दुधाची गरज असतेच, त्यामुळे त्याला अंगावर पाजणे चालूच ठेवावे. ते शक्य नसेल तर दिवसातून सुमारे ६०० मिलि. दूध त्याच्या पोटात जावे. बाळाला मल्टीव्हिटॅमिन्स थेंब पहिल्यापासून द्यावेत. कॅल्शियमचे सिरप द्यावे, चार महिन्यांनंतर लोहाचे थेंबही आवश्यक आहेत.