आयुर्वेदाचे अच्छे दिन | वैद्य शैलेश नाडकर्णी | Good Days for Ayurveda | Dr. Shailesh Nadkarni

Published by वैद्य शैलेश नाडकर्णी on   December 1, 2021 in   Health Mantra

आयुर्वेद चे अच्छे दिन

गेल्या सात-आठ वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्राकडे पाहण्याचा रुग्णांचा दृष्टिकोन बदलला आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांनी हमखास लाभ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे आता रुग्णांना उमजू लागले आहे.

आयुर्वेदातील बहुतेक औषधे ही आजीबाईच्या बटव्यातील आहेत, पण अलीकडच्या काळात ‘आजीबाई’ सापडणे कठीण झाले आहे. त्यामुळे आयुर्वेदतज्ज्ञांची गरज भासू लागली आहे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यास आणि औषधे घेतल्यास निश्चितपणे त्रास टाळता येतो. पण  केवळ जाहिरातींना भुलून मित्र-मैत्रिणींना विचारून, कुठेतरी लिहिलेले वाचून स्वतःवर उपचार करण्याच्या भानगडीत कृपा करून पडू नका. ‘ऐकावे जनाचे’ नव्हे, तर ‘ऐकावे वैद्याचे’ हा मंत्र लक्षात ठेवून वागल्यास स्वास्थ्य अबाधित राहू शकते. आयुर्वेदामध्ये आणखी एक मोठे दालन आहे, ते म्हणजे पंचकर्म चिकित्सा आणि यातील इतर उपचारपद्धतींचे. या उपचारांमधील महत्त्वाची बाब म्हणजे औषधे पोटातून न देता कढत तेलांच्या मर्दनासहित संपूर्ण शरीरातील व शरीरावरील अनावश्यक मलस्वरूप त्याज्य भाग शरीराबाहेर, बाह्यत्वचेवर काढले जातात. या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीराची किंवा दुखऱ्या भागाची वेदना कमी करून संपूर्ण शरीराला / दुखऱ्या भागाला मूळ स्थितीत आणता येते. पंचकर्म चिकित्सेने व्याधीचे मूळ कारण नष्ट केले जाते.सांधेदुखी, स्थौल्य, अजीर्ण, आम्लपित्त, मूळव्याध अशा सातत्याने त्रास देणाऱ्या आजारांत आयुर्वेदिक उपचारांमुळे हमखास उपशय मिळतो.

आयुर्वेद औषधांची मागणी का वाढत आहे ?

आयुर्वेद उपचार पद्धती ही प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील दोष, इतर शारीरिक गरजा, वय, मानसप्रकृती या व अशा अनेक बाबींचा विचार करून ठरवलेली असते. आयुर्वेद उपचार हे नवीन काळाच्या भाषेत म्हणायचे, तर Personalised  असतात म्हणूनच त्यांची मागणी वाढत आहे.

आयुर्वेदिक उपचार करणारा वैद्यवर्ग आपल्या रुग्णांच्या आरोग्याविषयी जागृत आहे. रुग्णाने / एखाद्या व्यक्तीने दिवसभरात काय दिनक्रम ठेवावा, ऋतू बदलल्यावर दिनक्रम कसा बदलावा, सहा ऋतूंच्या संधिकालात कसे वागावे, प्रकृतीप्रमाणे कसा बदल करायला हवा, आपल्या शरीरातील धातूंचे सारमान कसे टिकवून ठेवावे, पथ्यपालन, आयुर्वेद उपचारपद्धती, रसायन, व्याधिप्रतिबंध, वाजीकर चिकित्सा प्रणालीचा अवलंब कसा करावा आदी गोष्टी यात (आयुर्वेदात) सांगितल्या जातात. आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार दीर्घायुषी, निरोगी आनंदमय आयुष्याचा स्वाद अनुभवता येतो, याची खात्री पटल्यामुळेच आयुर्वेद उपचार पद्धतीची मागणी आता वाढू लागली आहे.

आयुर्वेदिक औषधांचे प्रकार

या औषधांमध्ये दोन प्रमुख विभाग आहेत. पहिला विभाग हा वनौषधींचा. वनौषधी ह्या मनुष्य शरीराला अधिक सात्म्य, सर्वसाधारण तक्रारींकरिता उपयुक्त ठरतात. अपेक्षित आरोग्यविषयक सुधारणा वनौषधींद्वारे पार पाडल्या जातात. दुसरा गट हा खनिज औषधांचा असतो. दीर्घकालीन व तीव्र आजार दूर करण्यासाठी खनिज घटकांचा वापर असलेली औषधे अधिक व लवकर लाभ मिळवून देण्यात उपयुक्त ठरतात. या औषधांची मात्रा वनौषधींच्या तुलनेत कमी असते.

२१व्या शतकात म्हणजेच आता बाजारात उपलब्ध असलेली सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधे ही त्ररूक्क GMP (Good manufacturing practices) व  ISO Certified या व इतर अनेक जागतिक नियमांनुसार निर्माण होत असतात. आयुर्वेदीय औषधांचे मानकीकरण (Standardization) झालेले आहे. आजकाल प्रत्येक औषध, त्यातील घटक व या घटकांचे प्रमाण, कोणत्या दिवशी-महिन्यातील निर्मिती आहे, औषध किती मात्रेत घ्यावे, औषध घेताना घ्यावयाची काळजी, ही औषधे कोण घेऊ शकते, औषध कोणत्या अवस्थेत घेऊ नये असा सर्व प्रकारचा माहितीवजा तक्ता औषधासोबत दिला जातो.

प्रत्यक्षात चव वाईट आहे म्हणून आयुर्वेदिक औषध नको, अशी समाजधारणा आता कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी पाण्यात विशिष्ट प्रमाणात भरड भिजत घालणे, सकाळी ती उकळविणे, योग्य प्रमाण शिल्लक राहिल्यावर हे औषध गाळून पिणे अशा प्रक्रिया १८-१९ व्या शतकात शक्य होत्या. पण आता २१ व्या शतकात हे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणजे आता आयुर्वेदिक वनौषधींच्या काढ्यांच्या गोळ्या (Kwath Tablets)  उपलब्ध आहेत.यापुढील टप्पा म्हणून काढ्यांच्या गोळ्या Dispersing  स्वरूपातही मिळतात. अशा गोळ्या काही क्षणात गरम पाण्यात विरघळून काढा तयार होतो.खनिज औषधेसुद्धा विशिष्ट शुद्धीप्रक्रियेनंतर भस्म स्वरूपात मिळतात. अर्थात, या औषधांचेही मानकीकरण केलेले असते. अल्प मात्रेत वापरण्यात येणारी ही औषधेसुद्धा गोळ्यांच्या रूपात उपलब्ध असल्याने यांची मागणी वाढली आहे.

हर्बल उत्पादने 

वैद्य वर्ग औषधांची योजना करत असताना, विभिन्न मार्गाने आयुर्वेदिक औषधांचा कार्यकारी अंश शरीरात सुलभरीत्या, योग्य काळात कसा जाईल याची योजना करतो. याचाच परिणाम म्हणून आज बाह्य वापर करता येण्याजोगी आयुर्वेदिक उत्पादन जसे की हर्बल सोप, हर्बल शाम्पू, फेसपॅक, वेगवेगळ्या प्रकारची Liniment Solution (तेल), क्रीम, टूथपेस्ट, परफ्युम आदी सहजगत्या उपलब्ध होऊ लागली आहेत. रासायनिक घटकांपासून मुक्त असल्यामुळे अशा हर्बल उत्पादनांकडे अनेकांचा ओढा वाढू लागला आहे. थोडक्यात सांगायचे तर आयुर्वेद औषधे, उपचारपद्धती आणि उत्पादनांची एकूणच मागणी वाढली आहे. विविध आजारांवर हितकारक, परिणामकारक आणि वाजवी दरात उपलब्ध असणारी, तसेच पूर्ववत कार्यप्रवण होण्यास मदत करणारी अशी निर्धोक औषधे कोणाला नको वाटतील?

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


वैद्य शैलेश नाडकर्णी 

(लेखक एम.डी. आयुर्वेद आहेत.)