आहारातून सौंदर्य

Published by Dr. Sarita Davare on   September 26, 2018 in   2018Health Mantra

आहार म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ खाणे एवढेच नव्हे तर प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ यांचा समतोल तुमच्या आहारातून साधला जातो आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. जर मी खाल्ले तर रात्री खिचडी खाईन म्हणजे मी समतोल आहार घेतला असे नाही. ज्वारी पौष्टिक आहे. म्हणून ज्वारीच्या एका वेळेला चार-पाच भाकऱ्या खाल्ल्या असे चालत नाही. संतुलित आहार हा शरीराला आवश्यक आहे पण त्याचा अतिरेक झाल्यास तो शरीराला घातकसुद्धा ठरू शकतो. म्हणून समतोल राखून थोड्या थोड्या वेळाने खाणे गरजेचे असते. आहारात फळांचा समावेश केला पाहिजे, पण ती किती प्रमाणात खायची याचेसुद्धा गणित आहे. समजा, कलिंगड तुमचे आवडीचे फळ आहे. तुम्ही अख्खे कलिंगड दोन दिवसात संपवले तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार हे नक्की आहे. मग जेवढे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल तितका जर तुम्ही व्यायाम केला नाही तर ती साखर तुमच्या शरीरात तशीच साठून राहणार हे नक्की. कलिंगडाचा पर्याय चांगला असू शकतो पण ते अतिप्रमाणात खाल्ले तर अपायकारक ठरू शकते. म्हणूनच आहारातील समतोल हा अतिशय महत्त्वाचा आहे.

डीटॉक्स

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि पाव चमचा हळद टाकून उकळवून घ्यावे आणि कोमट झाल्यावर ते प्यावे. काही लोक गरम पाण्यात मध टाकतात पण मधुमेहींनी मध टाकू नये, कारण त्यात साखर असते. सकाळी उठल्यावर हे प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे. तेथून डिटॉक्सिंगची (शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकणे) प्रक्रिया सुरू होते. कोमट पाणी आणि हळद पोटात गेल्यावर त्याचा पहिला परिणाम होतो तो पोटातील जीवजंतूंवर. हळद जंतुनाशक आहे. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पोट साफ होते. लिंबू हे व्हिटॅमिन-सी आणि अॅन्टीऑक्सिडंटने युक्त आहे. लिंबामुळे पोटातला चिकटपणा दूर होण्यास मदत होते. जसे की दुधाचे पातेले तेलकट राहिले तर आपण लिंबाची साल घेऊन ते स्वच्छ करतो. तसेच पोट पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो. पण लिंबाचा रस जास्त झाला तर त्याने अॅसिडिटी होऊ शकते किंवा घसा बसू शकतो. म्हणून लिंबाचे मोजकेच थेंब पाण्यात टाकावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिणे अतिशय चांगले असते. कोमट पाण्याने रक्ताभिसरण वाढते. लिंबामुळे नवीन पेशींना उत्तेजन मिळते आणि शरीराला ऑक्सिजन पुरविण्याची प्रक्रिया जलद गतीने होऊ लागते. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी घेतलेले कोमट पाणी, लिंबू व हळदीला महत्त्व आहे.

सकाळी कोरा चहा किंवा ग्रीन टी घ्यावा. ग्रीन टी नसेल तर तुळशीचा किंवा धणे-जिऱ्याचा चहासुद्धा चालेल. काही जणांना ब्लॅक कॉफी खूप आवडते. ब्लॅक कॉफीने BMR (BASAL METABOLIC RATE) चांगला होतो, मेटॅबॉलिझम वाढतो असे म्हणतात. परंतु ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी ब्लॅक कॉफी रिकाम्या पोटी घेऊ नये, कारण त्याने रक्तदाब वाढण्याची भीती असते. तिसरा डिटॉक्स म्हणजे कच्च्या भाज्यांचा रस. जसे की दुधी, आवळा, टोमॅटो, पालक, पुदिना इत्यादी. पुदिना अॅन्टीऑक्सिडंट आहे आणि चयापचय वाढवतो. रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. पुदिना, जिरे, धणे, कोथिंबीर, लेट्युसची पाने यांचा तुम्ही एकत्रित वापर करू शकता. पुदिन्याच्या रसामध्ये जिरे, लिंबाचे दोन-तीन थेंब चवीसाठी आणि पोषक म्हणून सेलेरीची पाने किंवा कोथिंबीर टाकू शकता. दोन हिरवेपाले एकत्र केले की त्यातून जास्त फायबर शरीराला मिळते.

गाजर आणि बीट हेसुद्धा एकत्र घेतले तर उत्तम. गाजर, बीट यामध्ये फोलिक अॅसिड आहे. दुधीबरोबर अॅलोवेरा ज्यूस किंवा आवळा ज्यूस घेता येईल. ते डिटॉक्सचे काम करतात. पण या रसांमध्ये मीठ घालू नये.

मल्टीव्हिटॅमिन्सचे महत्त्व:

मल्टीव्हिटॅमिन्सना फार महत्त्व आहे. आहारातून हे जास्त जात नाहीत किंवा आपल्या शरीरात व्हिटॅमिन्सच्या सप्लीमेंट तयारही होत नाहीत. त्यामुळे ती गरज अपूर्ण राहते म्हणून मग ते बाहेरून घ्यावे लागते. डिटॉक्स झाले की कॅल्शियम सप्लीमेंट सकाळी घ्या. आपण म्हणतो, ‘‘मी व्यवस्थित खातो. माझा खाण्या-पिण्याचा काही प्रॉब्लेम नाही.’’ पण मग रक्ततपासणी केली की कॅल्शियम, व्हिटॅमिन किंवा बी-कॉम्प्लेक्सची कमतरता निर्माण झाल्याचे दिसून येते. याची लक्षणे काहींमध्ये दिसतात तर काहींमध्ये दिसत नाहीत. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घेणे चांगले असते. बी-१२ या घटकामधून शरीराला लोह आणि फोलिक अॅसिड मिळते. खूप प्रमाणात थकवा, प्रचंड केस गळती, पायात गोळे येणे, निद्रानाश, त्वचेवर काळे डाग येणे ही सर्व बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत. त्यासाठी गाजर, बीट, लाल सिमला मिरची, टोमॅटो, पपई, लाल भोपळा, लालमाठाची भाजी यांचा आहारात समावेश करावा. लाल मांस खाल्ल्याने बी-१२ वाढत नाही. बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी समतोल आहाराबरोबरच फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊ शकता. बी-१२ प्रमाणेच व्हिटॅमिन डी-३ सुद्धा महत्त्वाचे आहे. कोवळ्या उन्हात फिरायला, चालायला गेल्याने व्हिटॅमिनची पातळी चांगली राखली जाते. आपल्या धर्मात सकाळी सूर्याची पूजा करण्यामागे हीच संकल्पना आहे. कोवळे ऊन अंगावर घेताना हातापासून कोपऱ्यापर्यंतचा भाग आणि चेहरा उघडा ठेवावा. हात, चेहरा झाकल्याने किंवा रणरणत्या उन्हात वॉक केल्याने व्हिटॅमिन-डी शोषले जाणार नाही.

भरपूर पाणी प्या:

बी-१२ आणि व्हिटॅमिन-डी इतकेच महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाणी पिणे. सर्वसाधारणपणे ४ ते ५ लिटर पाणी पोटात गेले पाहिजे. शरीरात ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, जसे की क्रीएटीन किंवा ब्लड युरिआ, नायट्रोजन इत्यादी विषारी द्रव्य बाहेर पडली पाहिजेत. त्यासाठी पाणी हे आवश्यक आहे. लोकांना अर्धशिशीचा अॅटॅक येतो, कारण पाणी पिणे कमी झालेले असते. आपले शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. चहातून पाणी किंवा इतर द्रव्यातून शरीरात पाणी जात असले तरी त्याशिवाय साधे पाणीसुद्धा तीन ते साडेतीन लिटर पोटात गेलेच पाहिजे आणि दीड ते दोन लिटर द्रव्ये गेली पाहिजेत. लिक्विडचे प्रमाण हळूहळू साडेचार ते पाच लिटरपर्यंत वाढवायचे. म्हणजे दर पंधरा मिनिटांनी एक कप पाणी प्यायचे.

डाएट म्हणजे काय रे भाऊ?

शरीराला जे जे आवश्यक आहे ते ते सर्व खाणे म्हणजे ‘डाएट’ असे माझे मत आहे. तुम्ही नुसती फळे खा किंवा तुम्ही सॅलेडवर राहा, असे डाएट होऊच शकत नाही. समतोल आहार म्हणजे तुमच्या शरीराला प्रोटीन, फायबर, कार्बस्ची गरज आहे. पण खाल्लेल्या अन्नातून जमा होणारे फॅट निघून जाणेसुद्धा गरजेचे आहे. अन्यथा ते साठून राहते. त्याचा पहिला परिणाम यकृतावर होतो आणि मग मूत्रपिंडावरही होतो. तुम्ही एक्स्ट्रा फॅट खाल्लेल्या व्यक्तीला सांगता की जॉगिंग कर. पण व्हिटॅमिन-डीची कमतरता असलेला माणूस जॉगिंग करू शकेल का? त्याचे कार्बस् जास्त प्रमाणात आहेत, शरीर वजनदार आहे. ज्या व्यक्तीला शरीराकडून साथ मिळत नाही तो साठलेले फॅट कसे घालवणार? मग ते तसेच राहणार आणि साठत जाऊन कोलेस्ट्रोल वाढल्याचे रिपोर्ट येणार… पचन होईल असेच खाद्य शरीराला द्या. तरच नैसर्गिक रीत्या शरीर चयापचय करेल. अन्न शोषले जाण्याच्या प्रक्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो. आज मी संध्याकाळी खाल्ले तर उद्या संध्याकाळपर्यंत मला वेळ आहे ते बर्न करायला. पण मी जर बर्न नाही केले किंवा परवा करू म्हटले तर असे परवा परवा करेपर्यंत शरीरात ३०० ते ४०० ग्रॅम फॅट डिपॉझिट झालेले असते, हे आपण लक्षात घेत नाही. ह्याचा परिणाम आत जसा होतो तसाच तो बाहेरही होतो. तुमचे शरीर फुगलेले (बॉडी ब्लोटेड) असेल तर चेहरा फुगवटा आल्यासारखा दिसतो. याशिवाय डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे, टाचांना सूज येणे, झोप न लागणे इत्यादी मानसिक आणि शारीरिक परिणाम दिसू लागतात, कारण तुमच्या खाण्याचा या दोन्हीशी संबंध असतो.

अंतर्बाह्य सुंदर दिसा:

प्रत्येक स्त्रीला वाटत असते की माझे पोट सपाट असावे. आपल्याला ३६-२६ या मापात अडकून पडायचे नाहीये. तुम्हाला जी फिगर चांगली कॅरी करता येते आणि तुम्हाला स्वतःला समजते की मी ‘परफेक्ट’ दिसतेय, बॉडी हलकी वाटते ती तुमची चांगली फिगर. वजन कमी झाल्यावर खूप सकारात्मकता येते. यासाठी प्रोटीन्स व्यवस्थित घेतले पाहिजेत. चरबी नियंत्रणात राहिली पाहिजे. चयापचय क्रिया चांगली पाहिजे. हे सर्व चांगले झाले म्हणजे तुम्हाला चांगली झोप येणार, पोट नीट साफ होणार, नैसर्गिकरीत्या भूक लागणार. गृहिणींना मी सांगेन की तुम्ही फिट, तर तुमचे कुटुंब फिट!

सगळ्यांचे करा पण सगळ्यांसाठी जे केले आहे त्यातले तुम्हीसुद्धा खा. पोहे खा, आमलेट खा, फळ खा. जे तुम्हाला सोयीचे आहे ते खा. पण ती भुकेची वेळ जाऊ नका देऊ. दिवसातून ३ फळे खायची तर १ फळ सकाळी खायचे. घरात पाच, दहा लोक किंवा पन्नास पाहुणे असो; नारळ पाणी किंवा एक फळ उभ्या उभ्या खाऊ शकता. तुमच्या खाण्याबद्दल तुम्ही स्वतः जागरूक असणे महत्त्वाचे आहे. मन आणि आहार या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन तुमची संपूर्ण जीवनपद्धती योग्य झाली तर तुम्ही नैसर्गिकरीत्या चांगले दिसता. अंतर्बाह्य सुंदर दिसता. आंतरिक सौंदर्य, आंतरिक प्रेरणा आणि शांत मन याचे प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर दिसतेच… त्यासाठी दुसरे काही करण्याची गरज नाही. प्रत्येकाने मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे….. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हेच गरजेचे आहे.