एइस : एक छुपा शत्रू

Published by - डॉ. रचिता धुरत, M. D. (Skin) on   November 30, 2017 in   Health Mantra

आरोग्यदायी जीवनशैली हीच खरी स्वास्थाची गुरुकिल्ली आहे. HIV/एड्‌स या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो आहे. आगीच्या वणव्यासारखा पसरतो आहे. युवापिढी मोठ्या प्रमाणावर या आजाराला बळी पडत आहे. औषधांमुळे हा रोग पूर्णपणे बरा होत नाही व लसही उपलब्ध नाही. समाजामध्ये जनजागृती करून हा रोग टाळणे एवढे एकच साधन आपल्या हाती आहे.

अमेरिकेत १९८१ मध्ये एड्‌सची सुरुवात झाली तेव्हा आपण म्हणालो होतो की, असले रोग तिकडे होणार, आपल्याला त्याची भीती नाही. पण भारत हा आजचा सर्वाधिक एड्‌सचे रुग्ण असलेला देश आहे.

एच. आय. व्ही. चा इतिहास :


एड्‌सची सुरुवात बऱ्याच वर्षांपूर्वी आफिकेमध्ये झाली असावी, कारण या आजारासारखी लक्षणे असलेले रुग्ण आफ्रिकेमध्ये ( १९५० पासून) आढळले होते. एड्‌स विषाणूशी साम्य असलेल्या विषाणू आफ्रिकेतील माकडांमध्ये सापडल्यामुळे एड्‌सची उत्पत्ती आफ्रिकेतच झाली असावी असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे.

कथा HIV ची :


HIV मनुष्यामध्ये कसा आला याबद्दल अनेक तर्क-वितर्क शास्त्रज्ञांनी केले आहेत. चिपांझी माकडांमध्ये एच. आय. व्ही. व्हायरसशी साम्य असलेला विशिष्ट व्हायरस-सिमियन इम्युनो व्हायरस आढळला. अशा बाधित माकडांच्या कत्तलीतून हा विषाणू अनेक खाटिकांमध्ये पसरला.

दुसऱ्या एका सिद्धांतानुसार पोलिओ लशीच्या निर्मितीसाठी सिमियन इम्युनो व्हायरस बाधित माकडाच्या मूत्रपिंडाचा वापर करण्यात आला असावा आणि या लसीमुळे लाखो लोकांमध्ये एच. आय. व्ही. चा प्रसार झाला असावा.

एड्‌सविषयी सद्यपरिस्थिती :


जगाची स्थिती – २००७ वर्षाच्या अखेरीस संपूर्ण जगामध्ये एकूण ३. ०८ करोड प्रौढ व २५ लक्ष बालकांना एच. आय. व्ही. ची बाधा झालेली आहे. नुसत्या २००७ वर्षामध्ये २. ५ लक्ष नवीन एच. आय.व्ही.ग्रस्त रुग्ण आढळून आले व २. १ लक्ष रुग्ण एड्‌समुळे दगावले.

भारताची स्थिती :

भारतात २. ५ लक्ष लोक एच.आय.व्ही. बाधित आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मिझोराम व नागालँड या शहरात जास्त प्रमाणात एच. आय.व्ही. बाधित रुग्ण आहेत.

एच आय. व्ही म्हणजे :

H ह्यूमन : फक्त मानवांशी संबंधित असलेला

I इम्युनो डेफिशिएन्सी : संसर्गजन्य घटकांचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी होणारा! करणारा

V व्हायरस : आजार होण्यासाठी कारणीभूत असलेला विषाणू

एड्‌स म्हणजे :

A अॅक्वायर्ड – प्राप्त करणे

I इम्युनो – रोगप्रतिकारकशक्ती

D डिफिशिएन्सी – अभाव

S सिड्रोम – आजारांचा समूह

आपल्या शरीरात रोगजंतूंचा प्रतिकार करणारी एक कार्यपद्धती असते, जी जंतुसंसर्ग आणि आजारांशी वेळोवेळी लढते. याला रोगप्रतिकारकशक्ती म्हणतात. एच. आय.व्हीचे जंतू या महत्त्वाच्या रोगप्रतिकारकशक्तीला हळूहळू नष्ट करायचे काम करतात. रोगप्रतिकारक पेशीच्या कमतरतेमुळे व्यक्ती इतर आजारांना बळी पडतात.

जंक शरीरात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेलाच एच. आय.व्ही.ची लागण झाली असे म्हणतात. विशिष्ट रोगांच्या लक्षणांच्या समूहाला एड्‌स झाला असे म्हणतात. या रोगजंतूची लागण झाली याचा अर्थ असा कदापि होत नाही की रुग्ण तात्काळ एड्‌समुळे आजारी पडणार आहे. एड्‌सची अवस्था येण्यासाठी ३ – १२ वर्षांचा कालावधी लागतो. एच. आय.व्ही. संसर्गित व्यक्तींना एड्‌स किती दिवसांत होतो हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य आणि प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.

एच.आय.व्ही.चा प्रसार :


एच. आय.व्ही.चा प्रसार संसर्गित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला खालील प्रकारे होतो –

  • असुरक्षित लैंगिक संबंध (८८%) – एच. आय.व्ही.चा  विषाणू वीर्य व योनी स्त्रावामार्फत पसरतो.
  • संसर्गित मातेकडून बालकांना ( ११%)
  • संसर्गित रक्ताद्वारे (१%)
  • एच. आय.व्ही. संसर्गित रक्त घेतल्याने, दूषित सुया, दूषित वैद्यकीय उपकरणाचा वापर.

एच.आय.व्ही. चा प्रसार कसा होत नाही :

  • स्पर्श करण्याने, हात मिळविल्यामुळे, मिठी मारण्यामुळे, चुंबन देण्याघेण्यामुळे किंवा अश्रूमुळे, खोकण्याने किंवा शिंकण्यामुळे एच. आय.व्ही.चा संसर्ग होत नाही.
  • एकाच तरणतलावाचा, शौचालयाचा, भांड्याचा, टॉवेलचा वापर केल्यामुळे एच. आयव्हीचा संसर्ग होत नाही.
  • एकाच घरात किंवा ऑफिसमध्ये एकत्र जमण्यामुळे.
  • कुत्रा, मांजर अथवा इतर पाळीव प्राणी यांमुळे.
  • मच्छर आणि इतर कीटक यांच्यामुळे.

पुरुषांमुळे स्त्रीला आणि स्त्रियांपासून पुरुषांना एच.आय.व्ही. संसर्गाचे प्रमाण भिन्न आहे का?

होय. पुरुषांद्वारे स्त्रियांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. लैंगिक संबंधातील एक छोटासा व्रण अथवा घर्षणसुद्धा शरीरातील जंतुसंसर्गाचा मार्ग प्रशस्त करतो.

एड्सची लक्षणे : –

  • हगवण
  • सतत ताप येणे
  • त्वचेवर पुरळ उठणे
  • वजनात घट ( कारण नसताना)
  • ग्रंथीची सूज
  • अतिशय घाम येणे
  • सतत खोकला येणे

क्षयरोग ( टी. बी.) लक्षणे


एच. आय.व्ही. संसर्गित व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने विविध संधिसाधू सांसर्गिक आजारांची शक्यता वाढते. क्षयरोग हा असाच एक संधिसाधू आजार आहे. क्षयरोग एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतो.

क्षयरोगाची काही लक्षणे –

  • तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असलेला खोकला
  • मानेतील काखेतील गाठीची वाढ
  • एक महिन्यापेक्षा जास्त काळ सतत बारीक ताप
  • वजनात लक्षणीय घट

एच. आय.व्ही. संसर्गित व्यक्तींमध्येदेखील क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. क्षयरोगासाठी तपासणी करून लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे. शंका आल्यास वैद्यकीय क्षयरोग ओपीडीमध्ये त्वरित येऊन सल्ला घ्या. क्षयरोगासाठी डॉटस केंद्रातून योग्य औषधोपचार घ्या.

एच.आय.व्ही. चे निदान


रक्ताच्या प्राथमिक चाचणीला एलायझा म्हणतात. निरनिराळ्या प्रकारचे ‘ अॅटिंजेन ‘ वापरून करण्यात येणाऱ्या रक्ताच्या तीन चाचण्यांद्वारे ‘ एच.आय.व्ही. ‘ संसर्गाचे निदान केले जाते. आपणास एच.आय.व्ही. आहे हे जाणल्यामुळे आपल्या जीवनात उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे स्वतःचे रोगनिदान करून येण्यापूर्वी ओळखीचा डॉक्टर किंवा आरोग्य सल्लागार यांच्याबरोबर बसून त्यांचा सल्ला घेणे हे केव्हाही उपयुक्तच ठरेल.

एड्सविषयी शंकानिरसन –

ठिकठिकाणी आहे समुपदेशन. आपल्या एच. आय. व्ही. निदानाविषयी अत्यंत गोपनीयता बाळगणे हा प्रत्येक एच. आय.व्ही. ग्रस्त व्यक्तीचा अधिकार आहे.

परीक्षणाचा निकाल आपणास काय सुचवितो?


एच. आय.व्ही. परीक्षणाचे निदान निगेटिव्ह आल्यास त्याचा अर्थ रक्तात एच.आय.व्ही.चे प्रतिरोधक तत्त्व (Antibodies) अस्तित्वात नाही. एच. आय. व्ही. मुळे संसर्ग झाल्यानंतर प्रतिरोधक तत्त्व उत्त्पन्न होण्यासाठी पूर्ण दोन ते तीन महिने किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधी जावा लागतो. ( ज्यास विन्डो पीरियडसुद्धा म्हटले जाते) या कालावधीनंतर पुन्हा एलायझा चाचणी निगेटिव्ह आली तरच आपण संसर्गित नाही असे समजावे. विंडो पीरियडमध्ये एच. आय. व्ही. ची लागण झाली आहे किंवा नाही यासंबंधी सध्या तपासणी मोठ्या तपासणी केंद्रात उपलब्ध झाली आहे. निगेटिव्ह परीक्षणाचा निष्कर्ष असा बिलकूल नाही की आपण भविष्यकाळात जरी स्वत : साठी धोकादायक स्थिती निर्माण केली असेल तरी ही आपल्याला एच. आय.व्ही.चा संसर्ग होणार नाही. एच. आय.व्ही.ची तपासणी सर्व शासकीय व महानगरपालिका केंद्रांत विनामूल्य व ऐच्छिक समुपदेशनाद्वारे केली जाते.

एच.आय.व्ही. च्या चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यास…


  • चाचणीचा निकाल सोबत घेऊन ए. आर. टी. केंद्रात जाऊन सल्ला घ्या.
  • ए. आर. टी. केंद्राच्या सल्ल्यानुसार सीडी-४ चाचणी करावी.
  • स्वत : ला व इतरांना निरोगी कसे राखता येईल याची माहिती घ्या.
  • असुरक्षित लैंगिक संबंध टाळून एच. आय. व्ही. पुनर्संसर्ग अथवा संधिसाधू आजारांचा संसर्ग होण्यापासून सांभाळा.
  • प्रत्येक लैंगिक संबंधाच्या वेळेस कंडोमचा वापर करा.
  • रक्तदान करू नका.
  • आपल्याला मूल हवे असल्यास पालवी केंद्रास भेट द्या.
  • जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
  • सर्वच एच. आय.व्ही. संसर्गित व्यक्तींना ए. आर.टी. ची गरज नसते. ए. आर. टी. कें द्रातील आरोग्य अधिकारी योग्य तो निर्णय घेऊ शकतात.

एच.आय.व्ही./एड्सपासून मुक्त राहण्यासाठी


  • संसर्गित गर्भवती स्त्रीच्या होणाऱ्या बाळाला होणारा संसर्ग औषधाने रोखू शकतो.
  • अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा.
  • एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ राहा.
  • प्रत्येक लैंगिक संबंधाच्या वेळी नवीन कंडोम योग्य रीतीने वापरा.
  • जर आपण एखादवेळी जोखमीचा लैंगिक संबंध ठेवला असेल अथवा आपल्या गुप्तरोगाची लक्षणे दिसत असतील अथवा गुप्तरोग झाल्याची शंका आली तर तात्काळ शासकीय महानगरपालिका इस्पितळात जाऊन तपासणी करून घ्या व योग्य औषधोपचार घ्या.
  • इंजेक्शन घेताना सुई, सिंरिजेस निर्जंतुक असल्याची खात्री करा.
  • रक्त घेताना ते एच. आयव्ही निगेटिव्ह आहे का ते तपासून पाहाणे गरजेचे आहे.

सामाजिक दृष्टिकोन :


एच. आय. व्ही. व एड्सबद्दल असलेल्या गैरसमजुतीमुळे व अपुऱ्या माहितीमुळे एच. आय. व्ही. ग्रस्त लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वाईट आहे. अशा लोकांना खूप वेळा आपल्या मूलभूत सामाजिक अधिकारांनाही मुकावे लागते. परंतु आता परिस्थिती सुधारत आहे. एच.आय.व्ही. व एड्सबद्दल शासनाने राबवत असलेल्या माहिती कार्यक्रमांमुळे व प्रसारमाध्यमांमुळे या गैरसमजुती दूर होण्यास मदत होत आहे. एच.आय.व्ही. साठी प्रतिबंध हा एकच उपाय असल्याने त्याबद्दलच्या गैरसमजुती दूर केल्यानेच एच.आय.व्ही.च्या वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. पुष्कळ एच. आय.व्ही. ग्रस्त लोक हे तरुण वयोगटातील असल्यामुळे त्याबद्दलचे योग्य शिक्षण शाळा व कॉलेजांमध्येच सुरू केले पाहिजे.
नियमित सकस आहार डॉक्टरांचा सल्ला, औषधांचे सेवन, नियमित तपासण्या व प्रेमळ कौटुंबिक आणि व्यावसायिक वातावरण यामुळे असे लोकसुद्धा एका सामान्य माणसासारखे जगू शकतात. त्यांना आपल्या कामापासून व कुटुंबापासून दूर राहण्याची काहीही गरज नसते. त्यांनासुद्धा इतरांप्रमाणे प्रेम, आदर घेण्याचा व देण्याचा तितकाच हक्क आहे.

नव्या जीवनाची नवी दिशा

एड्सबाधितांना द्या जगण्याची आशा!


 – डॉ. रचिता धुरत, M. D. (Skin) – कालनिर्णय आरोग्य नोव्हेंबर २००९