ऑक्टोबर हीट

Published by Kalnirnay on   October 11, 2018 in   Health Mantra

ऑक्टोबर हीट पासून वाचण्यासाठी हे करुन पाहा –

  • उष्णतेमुळे शरीरातील क्षार आणि खनिजे कमी होतात. ही कमी भरून काढण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे घ्यावे.
  • गुलकंद, काळ्या मनुका, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल.
  • भाज्यांच्या रसात कोथिंबीर आणि सब्जा टाकावा. कोथिंबीर व सब्जा उष्णता कमी करण्यास हात भार लावतात तसेच यामुळे भाज्यांच्या रसातील उग्रपणा कमी होतो व तो चवदार होतो.
  • या दिवसांत आहारात रोज ताक घ्यावे. ताक जास्त आंबट असल्यास त्यात थोडे पाणी घालून बाजूला ठेवावे. थोड्या वेळाने वरवरचे पाणी
    टाकावे. यामुळे आंबटपणा कमी होतो आणि ताक पिण्याची गरजही पूर्ण होते.
  • प्रखर उन्हातून प्रवास करताना चक्कर येण्याची शक्यता असते. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे तसेच साखरेची पुडी, लिमलेटच्या गोळ्यांचे पाकीट किंवा गोड आवळा यासारखे तोंडात सहज विरघळणारे पदार्थ बरोबर ठेवावेत.
  • घामामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून जास्त घट्ट किंवा ताणून घालायचे स्ट्रेचेबल कपडे वापरू नयेत. घट्ट किंवा अति ताणलेले कपडे अंगाला चिकटून बसतात, त्यामुळे घामही तिथेच चिकटन बसतो. म्हणून सुती आणि थोडे सैलसर कपडे वापरावे.
  • पायात बूट घालत असाल तर या दिवसांत बुटांऐवजी चपला किंवा सॅन्डल्स घाला. पायाला हवा आणि वारा लागला पाहिजे. बुटात बराच वेळ पाय राहिला तर घामामुळे बोटांच्या मध्यभागी जंतुसंसर्ग होऊन खुपऱ्या होण्याची शक्यता असते.