डोळ्याचा नंबर

Published by Dr. Sudha Surlikar on   October 4, 2018 in   Health Mantra

सर्वप्रथम हे लक्षात घेणे जरुरीचे आहे, की डोळ्याचा नंबर हा आजार नसून ते डोळ्याच्या लांबीचे नॉर्मल प्रकार आहेत. जशी माणसांची उंची कमी-जास्त असते आणि माणूस पाच फुटी असो अथवा सहा फुटी तो नॉर्मलच गणला जातो, त्याप्रमाणे मायनस किंवा प्लस नंबरचे डोळे नॉर्मल समजले जातात.

डोळ्याला येणारे नंबर हे दोन प्रकारचे असतात. एक दूरच्या नजरेचा नंबर आणि दुसरा जवळच्या नजरेचा नंबर. दूरची नजर अस्पष्ट असण्याची खालील दोन कारणे आहेत –
१) मायोपिया – Myopia ( मायनस नंबर) २) हायपरमेट्रोपिया – Hypermetropia (प्लस नंबर)

यात मायनस नंबर असणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. आशियाई देशांमध्ये हे प्रमाण ६० टक्के आहे.

मायोपिया (Myopia) :

मायनस नंबरला मायोपिया असे म्हणतात. यामध्ये माणसाच्या डोळ्यामधील बुबुळापासून दृष्टिपटलापर्यंतची लांबी सर्वसाधारण माणसापेक्षा जास्त असते. त्यामुळे वस्तूंमधून येणारी प्रकाशाची किरणे दृष्टिपटलावर न पडता त्याच्या आधीच फोकस होतात. त्यामुळे दृष्टिपटलावर पडणारी प्रतिमा अस्पष्ट असते. म्हणूनच अशा माणसांना लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. ढोबळमानाने जसजशी उंची वाढत जाते तसतसा नंबर वाढत जातो आणि उंची वाढायची थांबल्यावर नंबर वाढायचा थांबतो. दृष्टी सुधारण्यासाठी मायनस नंबर असणाऱ्या अंतर्गोल काचांचा चश्मा वापरावा लागतो.

कारणे :

  • हा दृष्टिदोष आनुवंशिक असला तरी डोळ्याला प्रत्यक्ष नंबर येण्यास इतरही गोष्टी कारणीभूत ठरतात. यात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइल इ. प्रकाशित स्क्रीन असणाऱ्या यंत्रांचा वापर! हा मायनस नंबर सर्वसाधारण वय वर्षे ५ ते १५ यामध्ये सुरू होऊन मुलींमध्ये २२ वर्षापर्यंत तर मुलांमध्ये २४ वर्षापर्यंत वाढत राहू शकतो, म्हणूनच या वयात वरील यंत्रांचा वापर कमीतकमी ठेवावा.

मायनस नंबरचा प्रतिबंध :

  1. आनुवंशिकतेबद्दल काहीही उपाय नसल्यामुळे थोड्याफार प्रमाणात नंबर अटळ असतो. पण हा आजार नसल्याने त्याबद्दल काळजी करू नये
  2. प्रकाशित स्क्रीन असलेली यंत्रे जसे की टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइल यांचा वापर वय वर्षे २४ पर्यंत अगदी आवश्यक असेल तेवढाच करावा.
  3. संतुलित आहार
  4. मैदानी खेळ खेळावेत, ज्यामुळे नंबर वाढण्याचे प्रमाण कमी राहते.
  5. चश्मा पूर्ण वेळ वापरणे. वाढत्या वयात चश्मा पूर्ण वेळ न वापरल्याने दृष्टी कायमची कमकुवत होऊ शकते. याला अॅब्लोपिया अथवा लेझी आय असे म्हणतात.

हायपरमेट्रोपिया (Hypermetropia) :

प्लस नंबरला हायपरमेट्रोपिया असे म्हणतात. यामध्ये माणसाच्या डोळ्यामधील बुबुळापासून दृष्टि- पटलापर्यंतची लांबी सर्वसाधारण माणसापेक्षा कमी असते. त्यामुळे वस्तूंमधून येणारी प्रकाशाची किरणे दृष्टिपटलावर न पडता त्याच्या मागे फोकस होतात. त्यामुळे दृष्टिपटलावर पडणारी प्रतिमा अस्पष्ट असते म्हणूनच अशा माणसांना लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. हा दृष्टिदोष सुधारण्यासाठी प्लस नंबर असणाऱ्या बहिर्गोल काचांचा चश्मा वापरावा लागतो.

कारणे :

हा दृष्टिदोष केवळ आनुवंशिक असून वय वर्षे ५ पर्यंत अथवा चाळिशीनंतर उद्‌भवतो. लहान वयात प्लस नंबर आल्यास जसजशी उंची वाढत जाते तसतसा हा नंबर थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

प्लस नंबरचा प्रतिबंध :

आनुवंशिकता हे एकमेव कारण असल्याने हा दोष टाळता येत नाही.

जवळच्या नजरेचा नंबर (Presbyopia):

हा प्रत्येक व्यक्तीत साधारणत : चाळिशीनंतर होतो, म्हणून प्रेसबायोपिया नावाच्या या दृष्टिदोषाला चाळिशी असेही म्हणतात. याची कारणे दूरच्या नंबरच्या कारणांपेक्षा फार वेगळी असतात. डोळ्याच्या बाहुलीच्या मागे एक बहिर्गोल भिंग असते. ( हे पांढरे पडले की मोतीबिंदू झाला असे म्हणतात.) हे भिंग एका पाणीदार पदार्थाचे बनलेले असते आणि वय वाढत जाते तसतसे हे भिंग जाडसर आणि घट्ट होत जाते आणि जवळची दृष्टी कमी होत जाते. त्यामुळेच चाळिशीनंतर वाढत्या वयाबरोबर जवळचा नंबर वाढवावा लागतो. यासाठी प्लस नंबर घ्यावा लागतो. पण फक्त जवळच्या नजरेसाठी असल्याने त्यास बायफोकल चश्म्यात खालील भागात ठेवावे लागते. हल्लीच्या संगणकयुगात मात्र बायफोकलपेक्षा चांगला म्हणजे प्रोग्रेसिव्ह ग्लास वापरल्यास लांबच्या आणि जवळच्या नजरेसाठी उपयोगी पडतोच आणि मधल्या (कॉम्प्युटरसाठी) नजरेसाठीही उपयोगी पडतो. जवळच्या नजरेसाठीचा नंबरसाठी- सत्तरीपर्यंत वाढत वाढत जास्तीत जास्त प्लस तीन होतो. जवळचा नंबर आणि लांबचा नंबर यांची बेरीज करुन काच बनवली जाते.

अेस्टीगमॅटिझम (Astigmatism):

मायोपिया व हायपरमेट्रोपियाचा आणखी एक प्रकार असतो त्याला अेस्टीगमॅटिझम म्हणतात. यात बुबुळाचा गोलाकार ( वक्रता) सगळ्या दिशांना समान नसल्याने अशा डोळ्याना चश्मा देताना सिलिंडर किंवा सिलिंड्रीकल लेन्सचा चश्मा द्यावा लागतो. ही सिलिंड्रीकल लेन्स मायनस किंवा प्लस ह्यापैकी कोणतीही असू शकते.

निरोगी डोळ्यांसाठी : 

  1. जिरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
  2. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
  3. दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.
  4. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.
  5. रोज रात्री ६ -७ बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा.
  6. ३ -४ हिरव्या वेलची एक चमचा बडीशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
  7. गाजराचा ज्यूस नियमित घ्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
  8. एक चमचा बडीशेप, २ बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.